६४ वर्षांची अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. नीना गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी पराठ्याची एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. या स्टोरीवर नीना गुप्ता यांनी कॅप्शन लिहिले होते, “मूग डाळ पराठा.”
खरंच मूग डाळ पराठा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’नी तज्ज्ञांकडून जाणून घेतले. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
मूग डाळीपासून बनवलेला पराठा हा अत्यंत पौष्टिक असतो. मुंबईच्या डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ ऋचा आनंद सांगतात, “मूग डाळ पराठा अत्यंत पौष्टिक असतो आणि पचनक्रिया सुधारण्यापासून हृदयाच्या चांगल्या आरोग्यापर्यंत याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मूग डाळीच्या पराठ्यात प्रोटिन्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरची भरपूर मात्रा असते.
हेही वाचा : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
प्रोटिन्स – शाकाहारी लोक त्यांच्या आहारात मूग डाळ आवडीने खातात, कारण मूग डाळ ही प्रोटिन्सचा खूप चांगला स्त्रोत आहे. दररोज एक मूग डाळ पराठा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक ते प्रोटिन्स मिळतात. स्नायूंच्या चांगल्या आरोग्यासाठी हे अधिक फायदेशीर आहे.
फायबर – मूग डाळ आणि गव्हाच्या पीठामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. आहारतज्ज्ञ ऋचा आनंद सांगतात, “वजन कमी करण्यासाठी मूग डाळीचा पराठा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय या पराठ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करता येते आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात.”
जीवनसत्त्वे आणि खनिजे – मूग डाळीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पौष्टिक घटक असतात. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला निरोगी राहण्यास मदत करतात.
ग्लायसेमिक इंडेक्स – मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यावरून तुम्हाला कळेल की, मूग डाळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्यासाठी मूग डाळीचा पराठा खाणे चांगले आहे.
हृदयाचे आरोग्य – मूग डाळीत फायबरचे प्रमाण जास्त असते आणि फॅट कमी प्रमाणात असते. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी मूग डाळीचा पराठा चांगला पर्याय आहे. ऋचा आनंद सांगतात, “मूग डाळीचा पराठा नियमित खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.”
वजन – ऋचा आनंद पुढे सांगतात, “मूग डाळीच्या पराठ्यामध्ये प्रोटिन्स आणि फायबर अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे हा पराठा नियमित खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.”
हेही वाचा : महिलांना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…
किती पराठे खावेत?
ऋचा आनंद सांगतात, “प्रत्येक व्यक्तीची आहाराची गरज व जीवनशैली वेगवेगळी असते. शरीराला पौष्टिक अन्न मिळेल या अनुषंगाने विचार केला तर दररोज एक किंवा दोन पराठे तुम्ही खाऊ शकता. आहार हा नेहमी संतुलित असावा. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या इतर पदार्थांचासुद्धा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.”