Tea Causing Acidity : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग नवनवीन चित्रपटांमुळे सतत चर्चेत येत असते, पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रकुलने तिच्या आईला चहाचे सेवन करण्यास मनाई केली आहे. रकुल प्रीत सिंग तिच्या डाएटबाबत खूप गंभीर असते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण, रकुल तिच्या आई-वडिलांच्या आरोग्याविषयीसुद्धा तितकीच सतर्क असते. रकुलच्या आईला ॲसिडिटीची समस्या होती म्हणून तिने चक्क आईचा चहा पिणे बंद केले.
‘झुम’ला दिलेल्या एका मुलाखतीत रकुल सांगते, “तिला सतत ॲसिडिटी होते, त्यावर मी तिला चहाचे सेवन कमी करू नको तर चहा पू्र्णपणे सोडून टाकण्यास सांगितले. जर तुमच्या शरीरासाठी चहा विष असेल तर काही कालावधीसाठी चहा सोडून द्यावा आणि त्यानंतर पुन्हा सुरू करावा, म्हणजेच डिटॉक्स करा.”
डिटॉक्स म्हणजे जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत काही ठराविक कालावधीसाठी शरीरास उपयुक्त नसलेले हानिकारक पदार्थांचे सेवन करू नये
ॲसिडिटी का होते?
यूटोपियन ड्रिंक्सच्या प्रमुख न्यूट्रिशनल सल्लागार डॉ. नंदिनी सरवटे द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात की, खालील गोष्टींमुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते.
- मसालेदार आणि फॅटयुक्त पदार्थ
- कॅफिन आणि अल्कोहोल
- अति प्रमाणात खाणे
- बैठी जीवनशैली – शारीरिक हालचाल करत नसल्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि ॲसिडिटीचा धोका वाढतो
- लठ्ठपणा
- धूम्रपान
- ताण
या गोष्टी लक्षात ठेवा
सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा चहाचे सेवन करणे टाळावे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच किंवा जेवणाच्या बदली चहा पिणे टाळला पाहिजे. उपाशी पोटी चहा घेण्याऐवजी एक ग्लास पाणी, फळे, दही किंवा ज्यूस प्या. उपाशी पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ निर्माण होते आणि तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात,” असे डॉ. सरवटे सांगतात.
डॉ. सरवटे पुढे सांगतात, “तुम्ही जर मर्यादित प्रमाणात चहाचे सेवन केले तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत नाही. दिवसातून दोन कप चहा पिणे चांगले आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला सतत ॲसिडिटीची समस्या जाणवत असेल तर बैठी जीवनशैली किंवा इतर आरोग्याच्या समस्या यास कारणीभूत आहेत.
ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी चहाचे सेवन करू नये?
डॉ. सरवटे सांगतात, “फक्त चहा कमी केल्याने तुम्हाला काही बदल दिसू शकतात, पण तुमच्या आरोग्याच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार नाहीत. ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी याच्या मुख्य कारणांवर लक्ष देणे आणि जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे.”
“ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी जीवनशैली बदला आणि आरोग्यदायी अशा चांगल्या सवयी अंगीकारा. उपाशी पोटी चहा पिणे टाळा. याशिवाय एका दिवसातील तुमचे चहाचे सेवन कमी करा. त्याऐवजी फळे खा आणि ज्यूस प्या”, असे डॉ. सरवटे पुढे सांगतात.