जेवणात मीठ आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपल्या दररोजच्या आहारात वापरतो. बहुतेक लोकांना हे माहित आहे की, आहारात मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे. कारण, आहारातील मिठाचा अतिरेक शरीरासाठी हानीकारक ठरतो.
पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केलाय की, क्रॅश डाएटच पालन करताना श्रीदेवी जेवणात मिठाचा समावेश करत नव्हत्या. त्यांना डॉक्टरांनी कमी रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे मीठ सेवन करण्याचा सल्ला दिला होता. श्रीदेवी यांनी हे गांभीर्याने घेतलं नाही. श्रीदेवी याचं जेव्हा निधन झालं त्यावेळी त्या स्ट्रिक्ट डाएटवर होत्या. त्यांना काही वेळा ब्लॅकआउटची समस्या देखील होती. त्या डाएट म्हणून खूप वेळ उपाशीही राहायच्या. सुंदर दिसण्याच्या नादात श्रीदेवी यांनी आपला जीव गमावला. शरीरात मीठ किंवा सोडियम कमी होणे हे देखील धोक्याचे आहे. मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू यांनी सोडियमच्या कमतरतेमुळे शरिरावर कसे गंभीर परिणाम होऊ शकतात, याविषयी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली आहे.
डॉक्टर सांगतात, मिठात असणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोडियम. आपल्या आहारातील मीठ आपल्या शरीराला हवे असलेले सोडियमची गरज पूर्ण करते. ज्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. मीठ पूर्णपणे टाळणे हानीकारक असू शकते, असेही ते सांगतात. मीठ न खाल्ल्यास त्याचा परिणाम तुमच्या पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनास समस्या येऊ शकतात. जेव्हा रक्तामध्ये सोडियमची कमतरता असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू लागते आणि त्यामुळे शरीरावर सूज येते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मीठ न खाल्ल्याने त्याचा परिणाम विविध अवयांवरही होऊ शकतो. त्यामुळे एकदम मीठ खाणं बंद करु नये. तुम्ही तुमच्या आहारात मीठाचं सेवन कमी करणे योग्य आहे, असे डॉक्टर नमूद करतात.
हायपोनेट्रेमिया म्हणजे काय?
हायपोनेट्रेमिया हे आपल्या रक्तातील सोडियम एकाग्रतेची कमतरता ठरवते. हायपोनेट्रेमिया उद्भवते जेव्हा शरीरात द्रवपदार्थांच्या प्रमाणात खूप कमी सोडियम असते. रक्तामध्ये सोडियमची कमतरता हायपोनेट्रेमिया म्हणून ओळखली जाते. जेव्हा पाणी आणि सोडियम शिल्लक नसतात तेव्हा असे होते. सोडियमची सामान्य पातळी प्रति लिटर १३५ ते १४५ मिली समतुल्य असावी. जेव्हा सोडियमची पातळी १३५ mEq/L च्या खाली येते तेव्हा हायपोनाट्रेमिया होतो.
हायपोनेट्रेमियामध्ये, रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी असते. कमी सोडियम पातळीची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये जास्त द्रवपदार्थांचे सेवन, मूत्रपिंड निकामी होणे, हृदय अपयश, सिरोसिस आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ वापरणे समाविष्ट आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेमुळे लक्षणे दिसून येतात.
सोडियमच्या कमतरतेची लक्षणे
मळमळ आणि उलटी
सतत डोकेदुखी
अस्वस्थ होणे
थकवा जाणवणे
अस्वस्थता आणि चिडचिड
स्नायू कमकूवत होणे
या लक्षणांव्यतिरिक्त इतर लक्षणे देखील असू शकतात, परंतु जर अशी लक्षणे तुमच्या बाबतीत दिसून येत असतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे हे अधिक चांगले आहे, असेही डाॅक्टर सांगतात.
मिठाची कमतरता दूर करण्यासाठी काय करावे?
मिठामुळे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते. त्यामुळे आहारात मीठ असणं गरजेचं आहे. निरोगी राहण्यासाठी ताजी फळे आणि भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. आपलं आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात मिठाचे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक आहे. तुमच्या आहारात सूप, सॅलड्सचा सेवन करणे अधिक चांगले. भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.