तमन्ना भाटिया तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. ती तिच्या फिटनेससाठीसुद्धा ओळखली जाते. एका मुलाखतीत तमन्ना सांगते की, तिला सकाळची कॉफी अतिशय प्रिय आहे आणि ती सकाळी कॉफी पिणे सोडू शकत नाही. तमन्ना सांगते, “मला सकाळी उठल्यानंतर एक कप कॉफी पाहिजे असते. माझ्या आहारतज्ज्ञ यामुळे खूश नसतील, पण मी कॉफी पिते, ते माझं आवडतं ड्रिंक आहे.”
ती पुढे सांगते, “हा माझा वेळ असतो, जेव्हा मी कॉफी पिते तेव्हा संपूर्ण दिवसाचे नियोजन करते.” तमन्नाने फॅशन इन्फ्लुन्सर मासूम मीनावालाच्या पॉडकास्टवर याविषयी सांगितले आहे.
तमन्नाने कबुल केले की सकाळी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. आज आपण सकाळची कॉफी शरीरावर कसा परिणाम करते, ते जाणून घेऊ या.
मुंबईतील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल (Jinal Patel) सांगतात, “काही लोक दररोज सकाळी उठून सर्वात आधी कॉफी पितात, यामुळे त्यांना दिवसभर उत्साही वाटते आणि ते संपूर्ण दिवसासाठी तयार होतात.”
उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने आतड्यांच्या आरोग्यावर दीर्घकाळासाठी परिणाम दिसू शकतो. कॉफीमध्ये अॅसिड असते आणि उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने आतड्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ वाटू शकते. “काही लोकांना अॅसिडिटी होऊ शकते, कारण यामुळे पोटात अॅसिड तयार होते. छातीत जळजळ वाटणे, ढेकर येणे, अपचन होणे इत्यादी समस्या जाणवतात”, असे पटेल पुढे सांगतात.
गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या आहारतज्ज्ञ दृश्या अले (Drishya Ale) सांगतात, “कोणत्याही प्रकारच्या अन्नाचे सेवन केल्याशिवाय कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि त्यानंतर रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी अचानक कमी होऊ शकते, यामुळे लोकांना थकवा जाणवू शकतो.
“उपाशी पोटी कॉफी प्यायल्याने काही लोकांच्या शरीरात कॉर्टिसोलची पातळीदेखील वाढू शकते, ज्यामुळे तणाव आणि ऊर्जेची पातळी बिघडू शकते,” असे अले सांगतात.
पटेल सांगतात, “कॉफी पिण्यापूर्वी काहीतरी खाण्याचा प्रयत्न करा, यामुळे रक्त प्रवाहात कॉफीचे शोषण कमी होते, ज्यामुळे आतड्यांशी संबंधित आजार कमी होतात.”
तुम्हाला दिवसाची सुरुवात एखाद्या हेल्दी पेयाने करायची असेल तर तुम्ही कॉफीऐवजी नट मिल्क किंवा ग्रीन टीचे सेवन करू शकता.