गव्हाच्या पिठापासून बनविलेली पोळी किंवा चपाती हा प्रत्येक भारतीय घरातील रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. फायबर आणि प्रथिने यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध पोळी विविध आरोग्यदायी फायदे देते. पण, जर तुम्हाला साधी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही आरोग्याशी तडजोड न करता, त्याची चव वाढवू शकता.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम यांनी आपल्या नियमित आहारात वापरता येतील अशा कार्बोहायड्रेट्सचा पौष्टिक स्रोत असलेल्या पोळीच्या काही प्रकारांची यादी दिली आहे आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. चला तर त्यांचे फायदे जाणून घेऊ…

७ प्रकारच्या पोळी किंवा भाकरी आणि त्यांचे फायदे (7 Types Of Bread Or Polī And Their Benefits)

गव्हाची पोळी (Whole Wheat Roti)

संपूर्ण गव्हाची पोळी हा आहारातील फायबरचा समृद्ध स्रोत आहे, जो पचनास मदत करतो आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतो. ही पोळी हृदयाच्या आरोग्यासदेखील समर्थन देते आणि रक्तातील साखर स्थिर करते. ती दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि लोह व व्हिटॅमिन बी यांसारखी आवश्यक पोषक घटक प्रदान करते.

ज्वारीची भाकरी (Jowar Roti)

ग्लुटेनमुक्त ज्वारीच्या भाकरीमध्ये प्रथिने, फायबर व अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ती पचन आणि वजन कमी करण्यासाठी आदर्श बनते. ती कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून,हृदय निरोगी ठेवते.

मक्क्याची भाकरी (Makka Roti)

मक्याच्या पिठापासून बनवलेली ही भाकरी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जसे की कॅरोटीनॉइड्स, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. ही भाकरी ऊर्जेने समृद्ध आहे आणि त्यात अघुलनशील फायबरचे प्रमाण त्यात जास्त असल्याने ती पचनास मदत करते.

नाचणीची भाकरी (Ragi roti)

बंगळुरू येथील एस्टर व्हाइटफील्ड हॉस्पिटलच्या चीफ क्लिनिकल डायटिशियन वीणा व्ही. यांच्या मते, “नाचणीची भाकरी ही लोह आणि कॅल्शियमच्या सर्वोत्तम वनस्पती-आधारित स्रोतांपैकी एक आहे. हे पोषक घटक हाडांची ताकद वाढवतात आणि शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करतात. रागी भाकरीमध्ये फायबर हा घटक उच्च प्रमाणात असतो. त्यामुळे पचन, वजन व्यवस्थापन व रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत होते.

बाजरीची भाकरी ( Bajra Roti)

बाजरी (pearl millet)मध्ये मॅग्नेशियम असते, जे हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाबाचे व्यवस्थापन सुनिश्चित करते. बाजरीची भाकरी ग्लुटेनमुक्तही आहे. ती पचनास प्रोत्साहन देते आणि रक्तातील साखरेची पातळी राखून मधुमेह नियंत्रित करते.

बेसन पोळी (Besan Roti)

चण्याच्या पिठापासून बनवलेली बेसन पोळी प्रथिनांनी समृद्ध असते आणि स्नायूंच्या वाढीस व चयापचयाला चालना देते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

ओट्सची पोळी (Oats Roti)

ओट्सच्या पोळीमध्ये विरघळणारे फायबर (बीटा-ग्लुकन) जास्त असते आणि ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, पचनक्रिया निरोगी ठेवण्यास व रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात प्रथिने आणि ट्रेस मिनरल्सदेखील जास्त असतात.