Healthy Drink For Weight Loss : राज्यातील अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सकाळपासूनच नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळात घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. या तीव्र उष्णतेमुळे लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारातही बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात थंड आणि हायड्रेटिंग राहण्यासाठी अनेक जण कलिंगडाचा रस पितात. या कलिंगडाच्या रसाने ताजेतवाने तर वाटतेच; त्याशिवाय तुमची तहानही भागते.
होलिस्टिक हेल्थ कोच ईशा लाल यांनी सांगितले की, कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, जे व्हिटॅमिन सी, ए, बी६ व पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट या कॅल्शियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे.
हेल्थ कोच ईशा लाल यांनी सांगितले की, कलिंगडाच्या सेवनाने तहान भागते आणि थकवा दूर करण्यास मदत होते. शरीरातील जळजळ कमी करता येते, वेदनादायक लघवीपासून आराम मिळतो आणि मूत्राशयाशी संबंधित आजारांशी लढण्यास मदत होते. त्यामुळे सूज आणि जळजळदेखील दूर होते. पण, जेव्हा तुम्ही कलिंगडाच्या ज्यूसमध्ये डिंक मिसळून पिता तेव्हा ते एक पौष्टिक पेय बनते.
कलिंगडच्या ज्यूसमध्ये डिंक मिसळून प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, ज्यामुळे आतडे गुळगुळीत होते आणि वजन कमी होते. तुम्हाला आणखी काही आरोग्यदायी फायदे मिळवायचे असतील, तर तुम्ही कलिंगडाऐवजी उन्हाळ्यात मिळणाऱ्या कोणत्याही फळाचा वापर करू शकता.
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार, फिजिशियन व मधुमेहतज्ज्ञ डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, डिंकात दाहकविरोधी गुणधर्म आहेत, जे शरीराच्या आतील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. तसेच यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, जे त्वचा हायड्रेट ठेवण्यासह त्वचेचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात, त्वचेचा रंग सुधारतो. कलिंगड आणि डिंक यांचे मिश्रण शरीरास नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे उन्हाळ्यासाठी हे एक परिपूर्ण ड्रिंक आहे.
परंतु, डॉ. गुप्ता यांनी कलिंगडाच्या ज्यूसमध्ये किती प्रमाणात डिंक घालावे याबाबत काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. कारण- डिंकाचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने पोटफुगी किंवा अतिसार होऊ शकतो. काही लोकांना हिरड्यांच्या बाबतीत ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे डिंकाचे नियमितपणे सेवन करण्यापूर्वी कोणत्याही संभाव्य ॲलर्जीविषयी माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात डिंकाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
हे पेय कधी प्यावे?
होलिस्टिक हेल्थ कोच ईशा लाल यांनी सांगितले की, तुम्ही डिंक घालून बनविलेला कलिंगडाचा ज्यूस सकाळी १० ते दुपारी १२ च्या दरम्यान म्हणजे नाश्त्यात दुपारच्या जेवणादरम्यान पिऊ शकता. किंवा तुम्ही ते संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी संध्याकाळच्या नाश्त्यातदेखील पिऊ शकता. पण, रात्री किंवा जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर पिऊ नका.
उन्हाळ्याच्या महिन्यांत चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली जगणे फार महत्त्वाचे आहे. तसेच विविध प्रकारच्या थंड पेयांचे मर्यादित प्रमाणात सेवन करूनही तुम्ही आराम मिळवू शकता.