How ageing affects your stomach: आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन, पोषण घटकांचे शोषण कमी होऊ शकते.
कनिक्का मल्होत्रा, कन्सल्टंट डाएटिशियन आणि डायबेटिस एज्युकेटर यांच्या म्हणण्यानुसार, या बदलांना समजून घेणे आवश्यक आहे. कारण- त्यामुळे वयाशी संबंधित पचनाच्या समस्यांचा सामना करणे आणि पचनसंस्थेची योग्य तंदुरुस्ती राखणे सोपे होते.
वय वाढल्याने पचनावर कसा प्रभाव पडतो?
तुमचे वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर कसा परिणाम होतो त्याबाबत मल्होत्रा यांनी स्पष्ट केल्या बाबी खालीलप्रमाणे :
पचनसंस्थेतील हालचाली कमी होणे : वय वाढल्यावर पचननलिकेतील स्नायू, विशेषतः आतड्यांतील स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे अन्नाचे पचनसामर्थ्य व आतड्यांची हालचाल कमी होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा काही वेळा अतिसार होऊ शकतो. आतड्यांतील स्नायूंचा कमी ताणही अस्वस्थता आणि मंद पचनास कारणीभूत होऊ शकतो.
लाळेचे स्राव कमी होणे : अन्न तोडणे आणि सहजपणे गिळणे यांसाठी लाळ वंगणाच्या कार्याची महत्त्वाची भूमिका बजावते. वय वाढल्यावर लाळ स्रवणे कमी होते. मग त्यामुळे अन्न चावणे आणि गिळणे या क्रिया कठीण होऊ शकतात. त्यामुळे स्वाभाविकत: पचन आणि पोषक द्रव्ये शोषण्यात अडचणी येऊ शकतात.
पोटातील आम्ल उत्पादनात बदल : वयस्कर लोकांमध्ये पोटातील आम्ल उत्पादन कमी होऊ लागते, जे अन्न पचवण्यास आणि प्रथिन, कॅल्शियम व व्हिटॅमिन बी-१२ सारख्या पोषण घटकांच्या शोषणासाठी आवश्यक आहे. पोषण घटकांचे शोषण कमी होणे पचनात अडचणी, ब्लोटिंग व गॅस यांसारख्या समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकते.
पोषण घटकांचे शोषण कमी होणे : वय वाढल्यावर पोषण घटक शोषण्याची क्षमतादेखील कमी होते. त्यामुळे आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजांची विशेषतः व्हिटॅमिन डी, कॅल्शियम व लोहाची कमतरता भासू शकते..
कमकुवत रोगप्रतिकार प्रणाली : वयानुसार रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे पचनसंस्थेला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या आणखी वाढू शकतात.
आतड्यांची हालचाल : आतड्यांतील स्नायू कमकुवत होण्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावू शकते आणि बद्धकोष्ठता निर्माण होऊ शकते. अन्न पचननलिकेतून पुढे नेण्यासाठी जी गतीने होणारा संकुचन क्रिया आहे, ती कमी प्रभावी होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणखी वाढू शकते.
हेही वाचा… तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे? मग होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
काही प्रकरणांमध्ये, पेल्विक फ्लोअर स्नायू कमकुवत होण्यामुळे मलोत्सर्गावर नियंत्रण ठेवण्यात अडचण होण्याचा त्रास विशेषतः वृद्ध महिलांना होऊ शकतो, असे मल्होत्रा यांनी सांगितले.
वयाशी संबंधित पचनातील बदल कसे नियंत्रणात ठेवावेत
वय वाढल्यामुळे पचनात काही बदल होतात; पण काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही हे परिणाम कमी करू शकता आणि तुमची पचनक्रिया चांगली राखू शकता.
जीवनशैलीत बदल
नियमित शारीरिक क्रियाकलाप : नियमित व्यायाम पचननलिकेतील स्नायूंचा योग्य तो ताण कायम ठेवण्यास मदत करतो आणि आतड्यांची हालचाल सुधारतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो.
हायड्रेटेड राहा : पुरेसे पाणी पिणे (दिवसातून ८-१० ग्लास) पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
ताण नियंत्रणात ठेवा : दीर्घकालीन ताण पचनात अडचणी निर्माण करू शकतो. योगा, दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव व ध्यानधारणा केल्याने शरीराला आराम मिळतो आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते.
धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळा : या दोन्ही गोष्टी पचननलिकेला त्रास देऊ शकतात आणि त्यामुळे पचनाच्या समस्या आणखी वाढू शकतात.
आहारातील बदल
फायबरसमृद्ध आहार : नियमित मलविसर्जनासाठी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य व शेंगा यांचा समावेश करा.
प्रो-बायोटिक खाद्यपदार्थ : दही आणि केफिरसारखे आंबवलेल्या पदार्थांमुळे आतड्यांतील जीवाणूंचे आरोग्यदायी संतुलन राखण्यास मदत होते.
कमी प्रमाणात, वारंवार जेवण : कमी प्रमाणात आणि अधिक वेळा आहार घेतल्यामुळे ब्लोटिंग आणि पचनासंबंधीच्या अडचणी टाळता येतात.
स्निग्ध व तिखट पदार्थांच्या सेवनावर मर्यादा : तेलकट, तुपकट व तिखट अन्नपदार्थ पचनात अडचणी आणू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर कमी प्रमाणात करावा.
जास्त कॅफिन आणि कार्बोनेटेड पेये टाळा : त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स आणि ब्लोटिंगचा धोका वाढू शकतो.