दिल्लीमधली घटना. एका ज्येष्ठ नागरिक महिलेला एक व्हॉट्सअॅप कॉल येतो. नंबर त्यांच्या ओळखीचा नसतो. पण बोलणारा व्यक्ती सांगतो की त्यांच्या भावाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. पुरावा म्हणून त्या पळवून नेलेल्या मुलाच्या आवाजाची क्लिप ऐकवली जाते. त्या घाबरून जातात आणि मुलाला वाचवण्यासाठी लगेच पेटीएम वरुन ५० हजार अपहरणकर्त्याला पाठवतात. हे सगळे पैसे देऊन झाल्यावर मुलाच्या पालकांना संपर्क होतो आणि लक्षात येतं मुलाला कुणीही पळवून नेलेलं नाहीये. तो सुरक्षित आहे आणि त्याचा आवाज एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्लोन करुन या ज्येष्ठ नागरिक महिलेला फसवण्यात आलं होतं. यालाच एआय व्हॉइस क्लोनिंग सायबर क्राईम्स म्हटलं जातं.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवी तंत्रज्ञानाचं भवितव्य असलं तर या तंत्रज्ञानाचे फक्त फायदेच आहेत असं नाही. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर एआय तंत्रज्ञान वापरुन, विविध युक्त्या वापरुन माणसांना ठगण्याच्या नव्या कल्पना घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच सतर्क आणि जागरुक असण्याची आवश्यकता आहे.
व्हॉइस क्लोनिंग म्हणजे काय?
तर, एखाद्याच्या आवाजाची हुबेहूब नक्कल. आज एआय तंत्रज्ञानामुळे अशी नक्कल करणं अतिशय सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स आणि टूल्स वापरुन एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब किंवा जवळपास तसाच आवाज तयार करणं शक्य आहे.
हे कसं केलं जातं?
ज्या व्यक्तीचा आवाज क्लोन करायचा आहे त्याच्या आवाजाचं सॅम्पल मिळवून त्याद्वारे हुबेहूब खऱ्यासारखाच पण खोटा आवाज तयार केला जातो.
ऑडिओ सॅम्पल मिळावं आजच्या युगात अजिबातच कठीण नाहीये. एक उदा. घेऊया, आपल्याला एखादा कॉल येतो, समोरून कोण काय बोलतंय आपल्याला ऐकू येत नाहीये, तरीही आपण बोलतच असतो, हॅलो, बोला, कोण बोलतंय वैगरे आपलं बोलणं सुरु असतं. तरीही समोरुन प्रतिसाद आला नाही तर आपण वैतागून चिडून बोलतो. अशावेळी समोरुन कुणीतरी आपला आवाज रेकार्ड करत नसेल कशावरून? सिम कार्ड क्लोनिंग असेल किंवा फोन हॅक झाला असेल तर पैशांची मागणी करणारा फोन कॉल ही त्या व्यक्तीच्याच ना,नंबरवरुन येतो त्यामुळे खराच आहे असं वाटू शकतं.
अशावेळी काय केलं पाहिजे?
समजा वरील महिलेला आला तसा कॉल आला किंवा काही केसेसमध्ये जवळची व्यक्ती कुठेतरी अडकलेली असते, ऑनलाईन पेमेंट ऍप्स चालत नाहीयेत असं सांगितलं जातं आणि पटकन अमुक तमुक नंबरला पैसे ट्रान्सफर करायला सांगितले जातात. या रकमा छोट्या असल्याने लोक फारसा विचार न करता ट्रान्स्फर करून टाकतात. पण अशावेळी पैसे ट्रान्स्फर करण्याआधी एकदा ज्या व्यक्तीचा कॉल आलेला आहे त्याला फोन करुन, तू पैसे मागितले आहेस का हे विचारलं पाहिजे. त्या व्यक्तीला इतर कुणाला तरी कॉल करायला सांगून तिने पैसे मागितले आहेत का हे विचारलं पाहिजे. सेलिब्रिटींचे आवाज वापरुन ही फसवणूक होण्याची शक्यता असते, रिएलिटी शो मध्ये निवड, लॉटरी लागली आहे, कौन बनेगा मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अमुक तमुक करा अशी काहीही मागणी असू शकते. अशा कुठल्याही गोष्टीच्या मोहात अडकण्याआधी आपण गुन्हेगारांच्या ट्रॅपमध्ये तर अडकत नाहीयोत ना बघितलं पाहिजे.
हेही वाचा… Mental Health Special: दुष्काळ, पूर, भूकंप यामुळे मानसिकतेवर परिणाम होतो का?
असे फोन आपली मुलं, आईवडील यांचे आले, ते खूप घाबरून बोलत असतील तर अशावेळी आपण घाबरून न जाता, पॅनिक न होता कॉल खराच आहे ना हे तपासले पाहिजे. हे कठीण जाऊ शकते, पण करणं आवश्यक आहे. आपल्या फोनमध्ये फायरवॉल असणं गरजेचं आहे. अँटी व्हायरस असेल तर फोन हॅक होण्याच्या, त्याचा दुरुपयोग गुन्हेगार करण्याच्या शक्यता खूपच कमी होतात.