प्रदूषित वातावरणामुळे आपले आरोग्य खराब होऊ शकते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हृदयविकारापासून ते फुप्फुसाच्या आजारापर्यंत वायुप्रदूषणाचा थेट संबंध आहे हेही आपण जाणतो. पण, हवेत विरघळणारे विषारी घटक आपल्याला मधुमेही अर्थात डायबिटीजचा रुग्ण बनवीत आहेत. दिल्ली व चेन्नईमध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, हवेतील प्रदूषण आता मधुमेहाचे कारण बनत आहे. याच संशोधनासंदर्भात या संशोधनातील प्रमुख व सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज कंट्रोलचे संशोधक डॉ. सिद्धार्थ मंडल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वायू प्रदुषणाच्या PM 2.5 पातळीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास तुम्हाला टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. दिल्ली व चेन्नई येथील सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज कंट्रोल आणि एम्सच्या डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात प्रदूषण आणि मधुमेह यांच्यात परस्परसंबंध असल्याचे आढळून आले आहे; ज्याचा भारतातील शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

PM 2.5 हे हवेची गुणवत्ता मोजण्याचे मापदंड आहे. PM म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर जे हवेतील सूक्ष्म कण मोजण्याचे काम करते. PM संख्या जितकी कमी असेल तितके हवेतील कण कमी.

हवेच्या प्रदूषणात असलेल्या PM 2.5 सूक्ष्म कणांनी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच हृदयविकार आणि दम्याचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे संशोधनाचे प्रमुख अन्वेषक व सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज कंट्रोलचे संशोधक डॉ. सिद्धार्थ मंडल यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रित करणे, हा एक बदलता येण्याजोगा जोखीम घटक आहे; जो नियंत्रणात आल्यास मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य रोगांचे ट्रिगर कमी करता येऊ शकतात.

शहरी भागात मधुमेह आणि प्रदूषणाचे उच्च प्रमाण लक्षात घेता, संशोधनातून कोणते मुद्दे समोर आले?

हवेच्या प्रदूषणात असलेल्या PM 2.5 सूक्ष्म कण आणि मधुमेह यांच्यातील संबंध शोधण्यासाठी भारतात पहिल्यांदाच असे संशोधन झाले आहे. प्रदुषणाच्या PM 2.5 सूक्ष्म कणांच्या संपर्कात आल्याने जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो; ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. केवळ मधुमेहच नाही, तर उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग जसे की हार्ट फेल, एथेरोस्क्लेरोसिस, मायोकार्डियल इन्फ्रक्शन व यांसारख्या गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यामुळे हा अभ्यास दिल्लीपुरता मर्यादित असला तरी लहान शहरांमध्येही वाढत्या वायुप्रदूषणामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात ग्रामीण आणि उपनगरीय भागांमध्येही वायुप्रदूषणामुळे गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिल्ली व चेन्नईत वायुप्रदूषणाची काय स्थिती आहे?

संशोधनकर्त्यांनी दिल्ली व चेन्नईसाठी स्वतंत्रपणे संशोधन केले. कारण- दोन्ही शहरांतील एक्स्पोजर पातळी खूप भिन्न आहे. चेन्नईत एका वर्षात प्रदूषणाची सरासरी एक्स्पोजर पातळी ३० ते ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत आहे; तर दिल्लीत हा आकडा ८२ आणि १०० आहे. अशा परिस्थितीत चेन्नईमध्ये उच्च रक्तदाब असलेल्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे; तर दिल्लीत तरुण लोकसंख्या म्हणजे ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका जास्त आहे.

प्रदूषणाची २.५ पातळी आणि टाईप-२ मधुमेह यांच्यात नेमका काय संबंध आहे?

प्रदूषण आणि मधुमेह यांच्यातील संबंध शोधण्यासाठी समूह संशोधन करण्यात आले. यावेळी एका ठरावीक व्यक्तींच्या गटावर संशोधन करण्यात आले. त्यासाठी संशोधकांनी PM 2.5 एक्स्पोजर मॉडेल तयार केले. यावेळी सहभागी लोकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचा काय परिणाम झाला याचा अभ्यास करण्यात आला. २०१०-२०११ मध्ये संशोधनात काही लोकांना सहभागी करून घेण्यात आले. यावेळी सहभागी व्यक्तींपैकी फक्त १०-१५ टक्के लोकांना मधुमेह होता; पण २०१४ मध्ये जेव्हा पुन्हा या लोकांची चाचणी केली तेव्हा त्यातील काहींना मधुमेह झाला होता. कालांतराने अधिक सहभागी व्यक्तींमध्ये मधुमेहाची स्थिती विकसित झाली होती. यावेळी प्रदूषण आणि मधुमेहाचा परस्परसंबंध असल्याचे आढळून आले.

संशोधनात कोणत्या वयोगटाला टार्गेट करण्यात आले होते?

या संशोधनात जवळपास नऊ हजार लोकांमधील रोग आणि संसर्ग या दोन्ही बाबतीत डेटा गोळा करण्यात आला. यावेळी सर्व सहभागी व्यक्तींचे वय सुमारे ४५ वर्षे होते. सहा वर्षांनंतर त्यांचे हे वय ५० ते ५१ दरम्यान होते. या सर्व लोकांची निवड सामान्य लोकांमधून करण्यात आली असल्याने कोणालाही तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसन असल्याचे आढळले नाही. यावेळी सहभागी व्यक्तींच्या आहाराची माहिती आणि शारीरिक हालचालींवर नजर ठेवली गेली.

हा अभ्यास का महत्त्वाचा आहे?

२०१०-२०११ मध्ये सुरू झालेल्या कार्डिओमेटाबॉलिक सव्‍‌र्हेलन्स समूहावरील दोन मोठ्या अभ्यासांचा हा एक भाग आहे. त्यात दर दोन वर्षांनी सहभागी व्यक्तींच्या रक्ताचे नमुने गोळा केले जातात. यात त्यांची कार्डिओमेटाबॉलिक कार्ये मोजणी आणि असंसर्गजन्य रोगांच्या संभाव्य जोखमीचे मूल्यांकन केले जाते.

हे संशोधन मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन आणि यूएसमधील एमोरी युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रॉनिक डिसीज कंट्रोल सेंटरद्वारे केले जात आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या सहकार्याने सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज कंट्रोलचा हा दुसरा प्रकल्प आहे; ज्याचा एकत्रित परिणाम आता जाहीर करण्यात आला आहे

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiims study shows pm 2 5 pollutants can increase type 2 diabetes how does long term exposure affect you sjr
Show comments