How To Eat Cashew & Almonds: दिवसभर उत्साही आणि ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण कामात असतो तेव्हा खाण्यापिण्याचे भानहे राहात नाही पण हेच जर आपण थोडं फ्री असू तर मात्र प्रत्येक तासाला काही ना काही खायची इच्छा होते. भूक असेलच असं नाही पण काहीतरी चघळत राहावंसं वाटतं. हे दोन्ही प्रकार आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहेत. छोटी भूक टाळूही नये आणि सतत खातही राहू नये. जर तुम्हालाही दिवसभरात अधून मधून अशी भूक जाणवत असेल तर अशावेळी सुका मेवा खाणे हे सर्वात उत्तम पर्याय ठरू शकते. विविध पोषक तत्वांचा साठा असलेल्या सुक्या मेव्यात तुमची स्मरणशक्ती वाढवण्यापासून ते ऊर्जा देण्यापर्यंतची क्षमता असते. पण हा सुका मेवा नेमका कसा खावा हे अनेकांना कळत नाही.
काजू, बदाम, मनुके, अक्रोड असे सुक्या मेव्यातील मुख्य नट्स हे भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो तर काही आहारतज्ज्ञ हे नट्स सालीसहित खायला हवेत असे सांगतात. पण यात नेमकं खरं काय आणि सालीसहित किंवा शिवाय नट्स खाण्याचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे आपण जाणून घेऊयात.. आहारतज्ञ गरिमा गोयल सांगतात की, “सुका मेवा हा पोषक तत्वांचा पॉवरहाऊस आहेत आणि त्यांचे नियमित सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल,” मात्र ते खाण्यापूर्वी सुका मेवा काही वेळ भिजवून ठेवणे गरजेचे आहे.
सुका मेवा भिजवून का खावा?
तज्ञांनी सांगितले की जेव्हा तुम्ही काजू भिजवता तेव्हा फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते व हे आम्ल तुमच्या आतड्यांमधून शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते.
डॉ. शिल्पा बन्सल चव्हाण, आहारतज्ञ आणि उद्योजक, संकील मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, म्हणतात की, काजूच्या आवरणातील फायटिक अॅसिड काढून टाकल्यामुळे भिजवलेले काजू आरोग्यदायी असतात.
सुक्या मेव्यात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक सारखी खनिजे असतात, जी भिजवल्यावर अधिक चांगल्या प्रकारे शरीरात शोषली जातात.
शेंगदाणे भिजवल्याने अपचन होण्याची शक्यता कमी होते कारण फायटिक ऍसिड आणि टॅनिनसारखे घटक काढून टाकले जातात.
हे ही वाचा<< डायबिटीजसाठी वरदान ठरू शकतात शेंगदाणे; पण ‘या’ चुका टाळा, कसे खावेत हे ‘इथे’ जाणून घ्या
डॉ. वी. के. मिश्रा यांच्या माहितीनुसार, बदाम हे साल न काढताच खाणे फायद्याचे ठरू शकते. बदामाच्या सालांमध्ये पॉलिफिनॉल्स नामक एक घटक असतो जे एक अत्यंत उपयुक्त अँटिऑक्सिडंट आहे. बदामाची साल ही फायबरयुक्त असते.
दरम्यान. आहारतज्ज्ञ गरिमा सांगतात की, दररोज ६ ते १० नट्सचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. तुम्ही यात काजू, बदाम, मॅकडामिया किंवा अक्रोड सारखा विविध प्रकारचा सुका मेवा खाऊ शकता.