Can Almonds Cure Diabetes & Cholesterol: बदाम हा सुका मेव्यातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. काजूपेक्षाही बदामातील सत्व आपल्या त्वचेला, केसांना निरोगी ठेवण्यात मदत करतात. पण तुम्हाला माहित आहे का याच बदामाचा थेट संबंध तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर व वजनाशी सुद्धा आहे. नव्या रिसर्च मध्ये यासंदर्भात माहिती समोर आली असून हे निकाल सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचे आहेत.
बदामाचे फायदे अभ्यासण्यासाठी २५ -६५ वर्षे वयोगटातील ४०० सहभागींसह हा अभ्यास करण्यात आला होता. सहभागी लठ्ठपणा, डिस्लिपिडेमिया म्हणजे रक्तातील लिपिड्सचे असंतुलन, जसे की कोलेस्टेरॉल, मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, सामान्य रक्तदाब तसेच उच्च रक्तदाब, अशा गटातील होते. १२६ सहभागींच्या गटाला सलग १४ दिवस सतत ग्लुकोज मॉनिटर घालण्यास सांगितले होते.
फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की १२ आठवडे दररोज बदाम खाल्ल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते, स्वादुपिंडाचे कार्य सुधारते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
संशोधकांना आढळले की बदाम खाणाऱ्या सहभागींच्या बीटा पेशींच्या कार्यामध्ये सुधारणा होऊन इन्सुलिन प्रतिरोधकता कमी झाली आहे आणि एकूण कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी झाले होते. या व्यतिरिक्त, या सहभागींचे शरीराचे वजन, BMI, कंबरेचा घेर, ग्लुकोज आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये १२ आठवड्यांत लक्षणीय घट झाली होती, असे त्यांनी सांगितले.
बदाम खाल्ल्याने वजन कमी होते?
लठ्ठपणा ही जगभर आढळणारी एक मोठी समस्या आहे आणि लठ्ठपणामुळे टाइप 2 मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो. बदामाच्या सेवनाने हे दोन्ही धोके कमी करता येऊ शकतात. गायत्री राजगोपाल, मद्रास विद्यापीठातील पीएचडीधारक आणि बदामाच्या परिणामांच्या अभ्यासातील मुख्य लेखिका सांगतात की बदाम खाणाऱ्यांच्या बीटा पेशींचे कार्य सुधारले आहे. स्वादुपिंडातील या पेशी शरीरात इंसुलिन तयार करतात.
चेन्नईतील मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मधुमेह संशोधन प्रमुख विश्वनाथन मोहन सांगतात की, “बदाम खाल्लेल्या सहभागी व्यक्तींच्या शरीराचे वजन आणि रक्तातील साखर या दोन्हींमध्ये सुधारणा झाली आहे.
हे ही वाचा<< किडनी निकामी करू शकतात ‘ही’ ५ फळे; फ्रुक्टोजमुळे युरिक ऍसिड वाढून शरीरच देतं गंभीर संकेत
बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते?
प्री-डायबिटीज असलेल्या लोकांसाठी बदामाचे सेवन हे महत्त्वपूर्ण आहे आणि नियमित बदाम खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय संशोधकांना आढळून आले की बदामामुळे एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचा स्तर सुद्धा नियंत्रणात येतो होते. हे दोन्ही लठ्ठपणा आणि मधुमेह वाढवण्यासाठी कारणीभूत घटक आहेत. बदाम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करू शकतात.