Benefits of Peanuts for Weight Loss: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना एक गोष्ट सातत्याने सतावत असेल आणि ते म्हणजे वजन. वाढलेले वजन ही अनेकांची डोकेदुखी झाली आहे. खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरतेय. वाढलेल्या वजनाचा परिणाम केवळ व्यक्तिमत्त्वावर न पडता डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजारही त्यासह जोडले जात आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन् तास जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढेच नव्हे, तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितके नियंत्रण ठेवून डाएटिंग केले जाते. मात्र, तरीसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडते. पण, तुम्हाला माहीत आहे का, की काही पदार्थ असे आहेत की, जे निरोगी आहाराचा भाग म्हणून सेवन केले, तर तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. असाच एक पदार्थ म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे खाल्लेत, तर तुमचे वजन कमी होऊ शकते. याबाबतचे वृत्त वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, प्रथिनांनी समृद्ध असलेले कोणतेही अन्न काही कॅलरीज बर्न करू शकते. हे लक्षात घेतले पाहिजे की, शेंगदाण्यामध्ये काही प्रमाणात निरोगी चरबीदेखील असते; जी हृदयासाठी चांगली असते. शेंगदाणे लठ्ठपणा, जळजळ आणि काही प्रमाणात हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. तसेच, शेंगदाणे शरीराच्या चयापचयासाठी चांगले म्हणून ओळखले जातात. ते ऊर्जा, निरोगी चरबी व प्रथिने यांचा चांगले स्रोत आहेत. शेंगदाण्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.
(हे ही वाचा: उकडलेला बटाटा खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं की नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर)
शेंगदाण्यात पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि फायबर असण्यासोबतच पॉलिफेनॉल, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजेदेखील आढळतात. हे वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत सर्वच गोष्टींच्या बाबतीत खूप फायदेशीर आहे. वास्तविक शेंगदाणे खाल्ल्याने व्यक्तीला जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे कमी प्रमाणात जेवण केले जाते, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शेंगदाण्यामध्ये असलेले हेल्दी मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स हार्मोन्स उत्तेजित करून, भूक भागविण्यास मदत करतात.
शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. शेंगदाण्यामध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. शेंगदाणे उकडलेले किंवा भाजलेले असोत; ते आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांनी समृद्ध असतात. जे अनेक आरोग्य फायदे देतात. शेंगदाणे कच्चे, वाफवलेले, भाजलेले, खारट, चवीनुसार किंवा साधे अशा अनेक प्रक्रियत्मक प्रकारांनुसार उपलब्ध असतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेंगदाणे तुम्ही पाण्यात भिजवावेत आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी खावेत. परंतु, तुम्ही ते कच्चे आणि भाजलेलेदेखील खाऊ शकता. शेंगदाणे पदार्थांमध्ये टाकूनही खाऊ शकता. परंतु, तुम्ही आहारात काही बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञांशी संपर्क साधा. कारण- तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दलची माहिती त्यांना असल्याने ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतात.