३०-३१ डिसेंबरच्या सुमाराला सगळे जण भावनिक होतात. संपत आलेल्या वर्षाचा मनातल्या मनात लेखाजोखा घेतला जातो आणि त्याला काही तरी लेबल दिले जाते, विशेषण लावले जाते. ‘हे वर्ष फारच वेगाने गेले, आयुष्याचा स्पीड फारच वाढत चालला आहे बुवा!’ ‘या वर्षी ना… फार वाईट बातम्या कानावर आल्या, एकूण वाईटच जास्त घडले’. ‘प्रत्येक जाणाऱ्या वर्षामध्ये आपल्या जगातले प्रश्न वाढतच चालले आहेत असे लक्षात येते आणि मन अगदी खिन्न होते’!
“मागचे वर्ष अनेक बदलांचे होते! माझी बदली झाली, त्यामुळे सगळेच बदलले! शहर, घर, मुलांच्या शाळा, ऑफिसमधले मित्र!’ प्रत्येकाचे आपले आपले पर्सेप्शन असते, दृष्टिकोन असतो. आपल्या अनुभवांच्या आधारावर प्रत्येकाला मनात जाणवलेले असे ते असते. त्या त्या वर्षी प्रामुख्याने आलेले अनुभव, मनात ठसलेले प्रसंग, आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांचा मनात निर्माण झालेला अर्थ, त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन या सगळ्यातून आपल्या मनात त्या वर्षासंबंधी एक प्रतिमा तयार होते आणि आपण सरत्या वर्षाचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन करतो.
माझ्या मनातही मागच्या वर्षाची एक प्रतिमा तयार होती. चक्क पायात बूट घालून पळणारी एक स्त्री डोळ्यासमोर उभी राहिली! वाटले असे गेले आपले वर्ष! धावत पळत! मग वाटेतले अडथळे आणि पूर्ण केलेल्या शर्यतीही डोळ्यासमोर उभ्या राहिल्या! वाटले, बाप रे! असे गेले का आपले वर्ष? म्हणजे नक्की काय झाले आपल्या आयुष्यात? आणि वर्ष संपता संपता शर्यत जिंकताना सीमारेषेवर लावलेली दोरी तोडून धावपटू सीमारेषा ओलांडतो तसे काही झाले का? की यंदाही मी अशीच बूट घालून पळत राहणार आहे?
एकीकडे या सगळ्या कल्पनेचे हसू फुटले आणि दुसरीकडे मी अंतर्मुख झाले. मी पळत होते म्हणजे नक्की काय? समोर काही लक्ष्य होते म्हणून पळत होते की पळणे दिशाहीन होते? कोणी इकडे जा म्हटले तर इकडे, कोणी त्या दिशेला वळून धाव म्हटले की तसे; असे नाही ना झाले आपले? की एका ठिकाणीच गोल गोल फिरत राहिले? वाटेतले अडथळे म्हणजे नक्की काय होते? कामाच्या ठिकाणी, घरी, राहत्या परिसरात, समाजातल्या परिस्थितीतील वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेल्या अडचणी, संकटे की मनाने निर्माण केलेले अडसर? मनातल्या शंकाकुशंका, संशय, अविश्वास, मत्सर, राग, लोभ, कमीपणाची भावना असे वेगवेगळे विचार आणि भावना? आपण शर्यत जिंकलो की नाही असा विचार आला का माझ्या मनात? कसली शर्यत जिंकायची आहे? करिअरमध्ये? आपल्या महत्त्वाकांक्षांची? लोकांशी आपण करत असलेल्या तुलनेची शर्यत? की आपणच आपल्यासमोर ठेवलेल्या चढत्या उद्दिष्टांची? आपण आपल्यासमोर ठेवलेल्या आव्हानांची? आपल्यातील काही कमतरता, स्वभावदोष, जीवनशैलीतील दोष दूर करण्याची?
पुढचा प्रश्न मनात तयार होताच. खरंच ‘शर्यत’ होती का ती? आपली आपल्याशी किंवा कोणा दुसऱ्याबरोबर, आपण जे मागच्या वर्षांत आपले जीवन जगलो ती काय शर्यत होती का? शर्यत म्हटले की त्यात स्पर्धा आली, यश अपयश आले, जिंकणे हरणे आले आणि त्याच्या बरोबर निर्माण होणारी अस्वस्थता, बेचैनी, दडपण, टेन्शन आणि दुःख, राग इत्यादी इत्यादी.
क्षणभर मी डोळे मिटले आणि डोळ्यासमोर खरोखरच एक बूट घालून धावणारी स्त्री डोळ्यासमोर आली! ती शांतपणे धावत होती, पळत नव्हती बरं का! आजूबाजूला बघत होती. परिसरातील झाडे झुडुपे, फुले पक्षी, लांबवर दिसणारे आकाश सगळे डोळ्यात साठवून घेत होती. येणाऱ्या जाणाऱ्या वृद्ध जोडप्याकडे सहज कटाक्ष टाकत होती, लहानग्या मुलाकडे बघून हात हलवून हसत होती! अनेकदा ती एकटी नव्हती! कधी बरोबर नवरा, कधी मुलगी कधी मैत्रीण साथीला होते. धावून झाल्यावर कटिंग चहा पिताना शाळेच्या वर्गाच्या सहलीची ती चर्चा करत होती, वस्तीमध्ये मुलांची तपासणी करायला
जाणाऱ्या गटाशी बोलत होती, कधी तरी एकटीच आपल्या कामाचा विचार करत होती…
धावता धावता वेग कमी करून चालूया असे ही काही वेळा तिने केलेले जाणवले. आपले कटुंब, विस्तृत परिवार, मित्र मंडळी, सहकारी यांचा विचार मनात करता करताच आपला समाज, समाजातील घडामोडी, आपल्या आजूबाजूच्या अनेक चांगल्या घटना, माणसे इत्यादींचा विचार करत ती चालते आहे असे डोळ्यासमोर असताना मी डोळे हळूच उघडले.
मनाची पाटी कोरी झाली होती. नवीन वर्षाची नवी अक्षरे त्यावर लिहिण्यासाठी मीही सज्ज झाले होते!
तुम्हा सर्वांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!