Apple Cider Vinegar Health Benefits : वजन कमी करण्यास मदत करण्याच्या क्षमतेबद्दल ॲपल सायडर व्हिनेगर (ACV)चे अनेकदा कौतुक केले जाते. बरेच जण असा दावा करतात की, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. पण, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेहासाठी औषध म्हणून ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर सावधगिरीने केला पाहिजे.
पण प्रथम, ॲपल सायडर व्हिनेगरबद्दल जाणून घेऊया (What Is ACV)
सफरचंदाचा रस आंबवून ॲपल सायडर व्हिनेगर बनवले जाते. फरमेंटेशन प्रक्रियेमुळे सफरचंदाच्या रसातील साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतर होते आणि नंतर आंबवल्यामुळे त्या अल्कोहोलचे रूपांतर व्हिनेगरमधील मुख्य सक्रिय घटक असलेल्या अॅसिटिक अॅसिडमध्ये होते. खनिजे, जीवनसत्त्वे आणि पॉलीफेनॉल व अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या फायदेशीर संयुगांनी ॲपल सायडर व्हिनेगर समृद्ध असते, असे पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयाचे वरिष्ठ आहारतज्ज्ञ डीटी स्वाती संधान (Swatee Sandhan) म्हणाल्या.
हैदराबादच्या लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर हिरन एस. रेड्डी (Dr. Hiran S. Reddy) यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ॲपल सायडर व्हिनेगरमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढू शकते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी होऊ शकते. हे फायदेशीर ठरू शकत असले तरीही ॲपल सायडर व्हिनेगर मधुमेहाच्या औषधांबरोबर, जसे की इन्सुलिन किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एकत्र केल्याने हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखरेची कमतरता) होण्याचा धोका वाढू शकतो, जी एक धोकादायक स्थिती आहे. त्यामुळे चक्कर येणे, गोंधळ उडणे आदी अनेक समस्या उद्भवू शकतात.
त्याशिवाय, डॉक्टर रेड्डी म्हणाले की, ॲपल सायडर व्हिनेगरचे जास्त सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की मळमळ किंवा पोट रिकामे होण्यास उशीर होणे. तसेच, रक्तप्रवाहात ग्लुकोज किती लवकर प्रवेश करते यावर परिणाम होऊ शकतो. स्वाभाविकत:च मधुमेहाच्या औषधांच्या वेळा आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यावर परिणाम होऊ शकतो.
ॲपल सायडर व्हिनेगर घेण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः ॲपल सायडर व्हिनेगर दररोज एक ते दोन चमचे पाण्यात मिसळून आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्यावा. वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांचा आणि व्यक्तीच्या एकूण आरोग्य प्रोफाइलचा विचार करून डॉक्टर वैयक्तिकृत सल्ला देऊ शकतात, असे डॉक्टर रेड्डी म्हणाले.
ॲपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांना समर्थन देण्यासाठी फारसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. ते लक्षात घेता, ॲपल सायडर व्हिनेगरमुळे मधुमेह बरा होणार नाही; पण ते रक्तातील ग्लुकोजची पातळी मध्यम प्रमाणात कमी करू शकते. तेव्हा मधुमेहावरील कोणत्याही औषधांची जागा हे द्रव्य घेऊ शकणार नाही ही बाब लक्षात ठेवावी. ॲपल सायडर व्हिनेगरचे फायदे असले तरी, मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम व वैद्यकीय देखरेख यांचा समावेश आहे.