भारतातील प्रसिद्ध संगीतकार एआर रेहमानने आपल्या आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. त्यांची अनेक गाणी आजही चाहत्यांना तितकीच आपलीशी वाटतात. त्याने आजवर अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले. पण, संगीताव्यतिरिक्त एआर रेहमान त्याच्या परखड वक्तव्यामुळेही खूप चर्चेत असतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एआर रेहमानने आपल्या मानसिक आरोग्याविषयी भाष्य केले. प्रसिद्ध संगीतकाराने खुलासा केला की, तरुणपणात त्याला आत्महत्येच्या विचारांनी ग्रासले होते. त्याच्या मनात अनेकदा आयुष्य संपवून टाकण्याचे विचार यायचे. त्यावेळी त्याची दिवंगत आई करीमा बेगम यांच्या मदतीने तो शेवटी या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर आला. आईने त्याला प्रत्येक वेळी चांगल्या वाईट गोष्टींसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्सफर्ड युनियन डिबेटिंग सोसायटीच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना रेहमान म्हणाला की, “मी लहान असताना जेव्हा मला आत्महत्येचे विचार येत होते, तेव्हा माझी आई म्हणायची, ‘जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता, तेव्हा तुम्हाला हे विचार येणार नाहीत.’ माझ्या आईकडून मला मिळालेला हा सर्वात सुंदर सल्ला आहे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता आणि तुम्ही स्वार्थी नसता, तेव्हा तुमच्या जीवनाला एक अर्थ असतो. मी ते खूप गांभीर्याने घेतले. मग, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी काहीतरी लिहित असाल, एखाद्या गरजू व्यक्तीसाठी अन्न विकत घेता किंवा तुम्ही एखाद्याकडे पाहून हसत असाल, तेव्हा या गोष्टी तु्म्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.

पण एआर. रेहमानप्रमाणे अनेक तरुण-तरुणी लहान- मोठ्या गोष्टींमुळे आत्महत्येचा विचार करतात. काही अपरिहार्य कारणाने अनेकदा त्यांना आयुष्य संपवून टाकावेसे वाटते, अशा तरुणांना आत्महत्येच्या विचारांपासून कसे दूर न्यायचे, त्यांना कशाप्रकारे मानसिक आधार द्यायचा, यावर डेहराडूनमधील थ्रीव्हिंग माइंड्स क्लिनिकलच्या संस्थापिका प्रमुख आणि सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि वर्तणूक औषध विशेषज्ज्ञ डॉ. अंकिता प्रियदर्शिनी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

डॉ. अंकिता प्रियदर्शिनी यांनी स्पष्ट केले की, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या संभाव्य आत्महत्येची प्रवृत्ती किंवा गंभीर नैराश्याला सामोरे जाण्यासाठी एक नाजूक आणि दयाळू दृष्टिकोन आवश्यक असतो. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे, हस्तक्षेप करणे आणि समजून घेणे हे या आव्हानात्मक काळात व्यक्तींना नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

जवळील व्यक्तींना गंभीर नैराश्य आणि मानसिक आजारांपासून दूर करणाऱ्यांना कशी मदत करावी?

१) सर्वप्रथम नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यात झालेला बदल ओळखा. अचानक वागणुकीत बदल जावणवला, सार्वजनिक कार्यक्रमांपासून लोकांच्या गर्दीपासून ती व्यक्ती वेगळी राहू लागली, मनःस्थिती बदलेली जाणवली, निराशेची भावना दिसून आली तसेच वैयक्तिक स्वच्छता कमी झाली, तर ती व्यक्ती नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेली असू शकते.

जर तुम्हाला ही लक्षणं दिसली तर त्या व्यक्तीबरोबर मनमोकळे बोलणे सुरू करा, कोणतेही तर्क, निर्णय घायला लावणारे संभाषण टाळा. चिंता व्यक्त करा, कोणताही निर्णय न देता फक्त त्या व्यक्तीचे नीट ऐकून घ्या.

२) व्यावसायिक मदतीचा सल्ला द्या. एक मानसिक आरोग्यतज्ज्ञ, जसे की मनोचिकित्सक किंवा थेरपिस्टकडे घेऊन जा, कारण हे तज्ज्ञ आवश्यक मार्गदर्शन करू शकतात. यावेळी योग्य आरोग्यतज्ज्ञ शोधण्यास मदत करा. त्या व्यक्तीच्या आवडीच्या लोकांना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत जा, त्यांना कुठे गेल्यानंतर एकटं वाटणार नाही याची काळजी घ्या.

३) संकटाच्या वेळी काय करायचे यासाठी सुरक्षेसाठी एक योजना तयार करा. सतत वाईट विचार मनात येत असतील, तसेच आत्महत्येचा विचार तीव्र होत असेल, अशावेळी त्या व्यक्तीस त्याचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. वाईट विचार मनात न येण्यासाठी काय केले पाहिजे, यासाठी त्यांना प्लॅन करू द्या. कारण तुमचे हे मार्गदर्शन त्या व्यक्तीस नैराश्येच्या समस्येतून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.

४) मुक्त संवाद सुरू ठेवा. त्यांचे भावनिक आरोग्य नियमितपणे तपासा. त्यांच्या भोवती असे वातावरण तयार करा, जिथे त्यांना कोणत्याही गोष्टी सहज बोलता येऊ शकतात. मन मोकळे करता येऊ शकते. सहानुभूती देत आणि समजूत काढण्यावर जोर देऊन सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या भावना समजून घ्या.

५) नैराश्यग्रस्त व्यक्तीस प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्या. मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, कुटुंबातील सर्व लोकांच्या एकत्र समूहात नैराश्यग्रस्त व्यक्तीला काही प्रमाणात का होईना थोडं बरं वाटत. एकाकीपणा दूर करण्यात सामाजिक संबंध महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्यासाठी असे काही प्लॅन तयार करा, जिथे त्यांना माणसांमध्ये मिसळता येईल.

६) मानसिक आरोग्याबद्दल स्वतःला शिक्षित करा. नैराश्य आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची गुंतागूंत समजून घेणे आपल्याला माहितीपूर्ण समर्थन प्रदान करण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करते. हे ज्ञान मानसिक आजारांचे प्रमाणही कमी करते, अधिक सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू दृष्टिकोन वाढवते.

७) संयम ठेवा, नैराश्य किंवा मानसिक आजारातून बरं होण्याची प्रक्रिया खूप हळूहळू सुरू असते. यावेळी अडथळे येऊ शकतात. पण यासाठी संयम, चिकाटी आणि प्रोत्साहन आवश्यक आहे. लहान- लहान गोष्टीत आनंद शोधा. त्या गोष्टींचे सेलिब्रेशन करा, प्रेरणादायी गोष्टींवर भर द्या.

८) आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ व्यावसायिक मदत घेण्यास किंवा संकट हॉटलाइनशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. परिस्थितीची निकड ओळखून त्वरित मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

९) शेवटी, स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. एखाद्या प्रिय व्यक्तीला गंभीर नैराश्य किंवा आत्महत्येची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीला समजून घेताना तुम्ही भावनिकदृष्ट्या कुठेतरी कमजोर होता. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी आधी स्वत: मानसिकदृष्ट्या अधिक सुसज्ज व्हा.

तुमच्या प्रिय किंवा जवळच्या व्यक्ती सतत आत्महत्येचा विचार करत असल्यास किंवा तीव्र नैराश्याचा सामना करत असल्यास त्याला समजून घेत, गरज पडल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. त्याला एकटं वाटेल किंवा दु:ख होईल अशा गोष्टी टाळा. त्याचे मन ज्या गोष्टींमध्ये रमेल अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त करा, कारण तुमच्या चांगल्या सहकार्यानेच ती व्यक्ती नैराश्य आणि आत्महत्येचा विचार करण्याच्या वाईट परिस्थितीतून बाहेर पडू शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ar rahman shared how his mom helped him deal with suicidal thoughts how to help loved ones thoughts of suicide and get support sjr
Show comments