देशभरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि रेस्टॉरंट्समध्ये कोंबड्यांची कमतरता निर्माण झाल्याने त्या ठिकाणी कोंबड्यांच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात देशातील सर्वांत मोठ्या अंडी उत्पादकांपैकी एकाने सांगितले, “त्यांच्या इंडियाना फार्ममधील कोंबड्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा झाल्याचे आढळले आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संशोधकांनी यावर भर दिला आहे, “बर्ड फ्लूचा धोका अजूनही सामान्य जनतेच्या बाबतीत कमी असला तरी विषाणूचा प्रसार आणि बदल होत राहिला, तर धोका वाढू शकतो. परंतु, दुकानांमध्ये कोंबडी व अंड्यांचे अनेक रिकामे शेल्फ आढळत आहेत. परिणामत: लोकांना बहुतांशी नियमितपणे लागणाऱ्या अंड्यांच्या किमती वाढल्याने ग्राहकांमध्ये अंड्यांचा पुरवठा आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.”

या टप्प्यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “बर्ड फ्लूने संक्रमित अंडे किराणा दुकानात पोहोचण्याची शक्यता कमी आहे. सार्वजनिक नियमांनुसार व्यावसायिकरीत्या पॅक केलेली अंडी धुऊन, निर्जंतुक करून पाठविणे आवश्यक आहे, ज्यामुळे अंड्याच्या कवचाच्या बाहेरील विषाणूचे कण काढून टाकण्यास मदत होते.

विषाणू कोंबड्यांनादेखील वेगाने आजारी करतो. अंडी उत्पादक, आधीपासून संक्रमित पक्ष्यांना मारून टाकतात आणि आणि उर्वरित समूहाला वेगळे करतात. संसर्ग झालेले कोणतेही पक्षी दूषित अंडी तयार करण्यापूर्वीच त्यांच्या आजारांमुळे मरण्याची शक्यता असते.

“मृत पक्षी अंडी घालत नाहीत,” असे वॉशिंग्टन, डी.सी. येथील पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ व सल्लागार डॉ. गेल हॅन्सन यांनी सांगितले. “जेव्हा विषाणू एखाद्या कळपाला प्रभावित करतो तेव्हा त्याची अंडी सामान्यतः अन्न पुरवठ्यातून काढून टाकली जातात.”

शास्त्रज्ञ अजूनही हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत की, दूषित पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने मानवाला बर्ड फ्लू होऊ शकतो का? २०२४ पासून अमेरिकेत संक्रमित झालेल्या किमान ६६ लोकांपैकी बहुतेकांना आजारी प्राण्यांच्या संपर्कातून विषाणूची लागण झाली.

तरीही असे दिसते की, विषाणू काही विशिष्ट अन्नांद्वारे प्रसारित होऊ शकतो. विषाणू असलेले कच्चे दूध प्यायल्यानंतर माकडे आजारी पडली आहेत. दूषित दूध आणि पाळीव प्राण्यांचे न शिजवलेले अन्न खाल्ल्याने मांजरींचा मृत्यू झाला होता.

“हा विषाणू बहुतेकदा गाईच्या कासेमध्ये आढळतो. याचा अर्थ असा की, संक्रमित गाईंच्या कच्च्या, पाश्चराइज्ड नसलेल्या दुधात विषाणूचे प्रमाण जास्त असू शकते.” असे सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलमधील विषाणूशास्त्रज्ञ आणि इन्फ्लूएंझा तज्ज्ञ स्टेसी एल. शुल्ट्झ-चेरी म्हणाल्या आहेत.

“अंड्यांमध्ये विषाणू कमी प्रमाणात असू शकतो तरीही तुलनात्मक अभ्यासाशिवाय हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे; परंतु तुम्ही ती कच्ची अंडी खाल्ली तरीसुद्धा अंड्याद्वारे बर्ड फ्लू होण्याची शक्यता अजूनही खूपच कमी आहे,” असे मॅसॅच्युसेट्स अ‍ॅमहर्स्ट विद्यापीठातील अन्नशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक मॅथ्यू मूर म्हणाले.

“जर तुम्हाला जास्त काळजी घ्यायची असेल, तर पाश्चराइज्ड अंड्यातील द्रवरूप पांढरा भाग जो कार्टनमध्ये येतो, तो सेवनासाठी सुरक्षित मानला जातो. कारण- पाश्चराइज्ड प्रक्रियेमुळे अंड्यावरील विषाणू निष्क्रिय होतात.”

अंडी पूर्णपणे शिजवल्याने वा उकडल्याने त्यावरील विषाणू नष्ट होतात. रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या शिफारशीनुसार, १६५ अंशांच्या अंतर्गत तापमानाला अंडी शिजवावीत म्हणजेच अंड्यातील पिवळा भाग शिजवल्यानंतर घट्ट झालेला असावा. तसेच स्क्रॅम्बल्ड अंडे पूर्णपणे शिजलेले असावे आणि ते द्रव किंवा पाण्याप्रमाणे कच्चे नसावे.

“मुख्य गोष्ट अशी आहे की, जर योग्य पद्धतीने अन्न हाताळले जात असेल आणि शिफारशीप्रमाणे अंडी पूर्णपणे शिजवली वा उकडली जात असतील, तर धोका अत्यंत कमी आहे,” असे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील पशुवैद्य व पर्यावरणीय साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. मेघन डेव्हिस म्हणाल्या.

अन्न हाताळताना सुरक्षित राहण्यासाठी तज्ज्ञ सल्ला देतात:

  • १. कच्ची अंडी हाताळल्यानंतर आपले हात व्यवस्थित धुवा.
  • २. कच्ची अंडी जेथे हाताळली गेली, तेथील स्वयंपाक करण्याचा पृष्ठभाग आणि भांडे साबणमिश्रित पाण्याने स्वच्छ करा.
  • ३. फक्त बर्ड फ्लूचा धोका कमी करण्यासाठी नव्हे, तर अन्नातून होणारी संभाव्य विषबाधा टाळण्यासाठी कुकी किंवा केकसाठी वापरले जाणारे कच्चे पीठ चाखणे किंवा खाणे टाळा. कारण- त्यात साल्मोनेलासारखे हानिकारक जंतू असू शकतात.

लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेल्या लोकांसारख्या असुरक्षित गटांसाठी ही खबरदारी घेणे विशेष महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are eggs safe to eat amid rising bird flu outbreak read what experts say snk