Blood Sugar Control Tips: अनेक जणांना गोड पदार्थ खूप आवडतात. मात्र, वजन वाढेल किंवा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढेल या भीतीनं काही जण गोड पदार्थ खाण्याचं टाळतात. परंतु, साखरेला पर्याय म्हणून गूळ किंवा मध यांच्याकडे पाहिलं जातं. पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या या पदार्थांचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. त्यातच मधाविषयी जाणून घ्यायचं झालं, तर मध हा अत्यंत गुणकारी आहे. अगदी भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक फायदे होतात. दुसरीकडे गूळ खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण मध, गूळ हे पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणासाठी चांगले आहेत का? याच विषयावर मॅक्स हेल्थकेअरमधील डॉ. मिथल यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ…
आजकालच्या धकाधकीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे बहुतेक लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांना आहाराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मधुमेह ही एक अशी आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये माणसाला अनेक बंधनांना सामोरे जावे लागते. मधुमेहाच्या रुग्णाने कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न सेवन करावे आणि मिठाई पूर्णपणे टाळावी; अन्यथा त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास वेळ लागत नाही.
मध हा सोनेरी रंगाचा एक द्रव पदार्थ आहे. मध पारंपरिकपणे गोड पदार्थ म्हणून, तसेच घसा खवखवणे, खोकला नियंत्रित करणे व अॅलर्जी कमी करणे यासाठी वापरला जातो. त्यात साधारणपणे ३८ टक्के फ्रक्टोज, ३१ टक्के ग्लुकोज, १७ टक्के पाणी व सात टक्के माल्टोज, तसेच इतर साध्या कार्बोहायड्रेट्स, परागकण, अमिनो अॅसिडस्, एन्झाइम्स व जीवनसत्त्वे यांचा समावेश आहे. फ्रक्टोज सामग्रीमुळे मध पांढऱ्या साखरेपेक्षा गोड आहे आणि त्यामुळे गोडपणा समान प्रमाणात असावा यासाठी तो कमी प्रमाणात वापरला जाणे आवश्यक आहे. पांढऱ्या साखरेपेक्षा मधामध्ये कमी कॅलरीज (सुमारे ३०० कॅलरीज प्रति १०० ग्रॅम) असतात. मधात कॅलरीज, साखर व कार्बोहायड्रेट्स असतात. पण, साखर किंवा साखरेच्या इतर पर्यायांच्या तुलनेत मध रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम करतो. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना मध काही प्रमाणात वापरण्याची परवानगी देतात.
गुळामध्ये सुक्रोजचे प्रमाण ७० टक्के असते. प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्सच्या अंशासह गूळ हा लोहाचा स्रोत आहे. गुळामध्ये लोह असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता यासह अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. परंतु पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ हा थोडा चांगला पर्याय असला तरीही तो साखरेसारखाच आहे. मधुमेहींसाठी गूळ खाण्याचे दुष्परिणाम पांढऱ्या साखरेपेक्षा फारसे वेगळे नसतात.
तथापि, जर मधातील साखरेची इतर साखर पर्यायांशी तुलना केली, तर मधाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम होतो. तसा मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणूनच डॉक्टर काही प्रमाणात मधुमेहाच्या रुग्णांना मधाचा वापर करण्यास परवानगी देतात. तथापि मधुमेहींसाठी गूळ, मध सुरक्षित आहे, हा समज विज्ञानाने सिद्ध केलेला नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले.