Menstrual Cup Use Benefits For Periods : मासिक पाळी (पीरियड्स) ही स्त्रियांमध्ये घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वयाच्या साधारण १२ ते १५ व्या वर्षापासून सुरू होणारी मासिक पाळी वयाच्या ४५ ते ५० वर्षांनंतर येणं बंद होते. पण, यादरम्यान महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येत असल्यानं स्वच्छतेच्या दृष्टीनं हवी तशी काळजी घेतली गेली नाही, तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी बहुतेक महिला सॅनिटरी पॅड्स वापरतात. या सॅनिटरी पॅड्समध्येही आता बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कपकडे पाहिलं जातं. हे कप्स वापरायला सोपे आणि आरोग्याच्या दृष्टीनं चांगले असतात. तसेच पॅड्सप्रमाणे तुम्हाला दर महिन्याला तो विकत घ्यावा लागत नाही. तुम्ही एकदा विकत घेतल्यानंतर तो अनेक वर्षं वापरू शकता.
पाळीदरम्यान अनेक महिला सॅनिटरी पॅड्स, टॅम्पॉन्स व मेंस्ट्रुअल कपचा वापर करतात; पण यातील मेंस्ट्रुअल कप सर्वांत सुरक्षित असल्याचा दावा आतापर्यंत अनेक वैज्ञानिकांनी केला आहे. त्यामुळे काही वर्षांपासून मेंस्ट्रुअल कप्सच्या वापराविषयी जागरूकता वाढत आहे. पण, आजही अनेक महिलांच्या मनात मेंस्ट्रुअल कपच्या वापरासंदर्भात काही प्रश्न आणि भीती आहे. मेंस्ट्रुअल कपविषयी महिलांच्या मनात असलेल्या अशाच काही प्रश्नांची आपण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांच्याकडून सविस्तर उत्तरे जाणून घेऊ या.
१) मेंस्ट्रुअल कप कसा वापरावा?
महिलांना बहुतेक वेळा असा प्रश्न पडतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे योग्य त्या मापाचा कप घ्या. तो कप दुमडा आणि योनीच्या आतमध्ये घाला. खरं तर अतिशय मऊ अन् नाजूक रबर किंवा सिलिकॉनचा वापर करून हे कप तयार केले जातात. त्यामुळे ते सहजपणे दुमडून योनीच्या आत टाकता येतात. आतमध्ये गेल्यावर हा कप उघडतो आणि एक लीकप्रूफ सील तयार होतं.
२) मेंस्ट्रुअल कप्स किती तास वापरू शकता?
साधारण मासिक पाळीदरम्यान तुम्ही सॅनिटरी पॅडमध्ये रक्तस्राव जमा झाल्यानंतर ज्याप्रमाणे ते पॅड बदलता, त्याचप्रमाणे मेंस्ट्रुअल कपमध्येही रक्तस्राव जमा झाल्यानंतर त्या रक्तस्रावाचं विसर्जन करणं आवश्यक आहे. पण, मेंस्ट्रुअल कप केव्हा रिकामी करायचा हे तुमच्या रक्तस्रावाच्या प्रमाणावरही अवलंबून असतं. जर तुमच्या रक्तस्रावाचं प्रमाण जास्त असेल, तर तुम्हाला तो कप वारंवार रिकामा करावा लागणार आहे. जर तुमचा रक्तस्राव कमी असेल, तर तुम्ही तो जास्त काळही वापरू शकता.
३) या कपाच्या वापराने योनीमार्गाचा आकार वाढतो का?
काही महिलांना मेंस्ट्रुअल कप वापरल्यानं योनीमार्गाची जागा रुंद होईल, अशी भीती वाटू शकते. पण, या कपाच्या वापरामुळे योनीमार्गाच्या आकारावर काहीही परिणाम होत नाही.
४) कप योनीमार्गात अडकू शकतो, याची भीती वाटते का?
योनीमार्गाविषयी महिलांना स्वत:ची स्वत:ला माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास कापूसही बऱ्याचदा आपण कानात घालतो, तो कानात अडकू शकतो; पण तो न अडकता योग्यपणे बाहेर काढण्याबाबत आपल्याला एक आत्मविश्वास असतो. त्यामुळे कापूस अडकेल, अशी भीती नसते. मेंस्ट्रुअल कप अडकू शकतो ही गोष्ट खरी आहे. कारण- आपल्या मनात या नाजूक अवयवाविषयीच अधिक भीती असते. त्यामुळे अशी काही गोष्ट झाली, तर अधिक भीती वाटू लागते. परंतु, जर तुम्हाला तो कप काढण्याची योग्य पद्धत माहीत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सवयीनं कप वापरण्याबाबत आत्मविश्वास येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
५) मेंस्ट्रुअल कप बाहेर कसा काढायचा?
अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की, मेंस्ट्रुअल कप आपण वापरला आहे खरा; पण तो लीक न होता बाहेर काढायचा कसा? त्यावर डॉ. दातार म्हणाले की, यासाठी तुम्ही यूट्यूबवरील व्हिडीओंची मदत घेऊ शकता. तसेच हा कप खूप मुलायम असतो; जो पहिल्या बोटानं किंवा अंगठ्याच्या मदतीनं थोडा आतल्या बाजूनं प्रेस करून सहज बाहेर काढता येतो. मात्र, जबरदस्तीनं ओढून काढण्याचा प्रयत्न करू नका. कप काढताना भीती वाटत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही दीर्घ श्वास घ्या, घाबरून (पॅनिक) न जाता डोकं शांत ठेवा आणि मग तो काढण्याचा प्रयत्न करा.
६) खेळताना, रात्री झोपताना, लघवी किंवा मलविसर्जन करतानाही तो वापरू शकतो का?
अनेकांना वाटतं की खेळताना, रात्री झोपताना, लघवी, मलविसर्जनास बसताना कप बाहेर पडू शकतो; पण कसलीही चिंता न करता तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. त्याशिवाय तुम्ही मेंस्ट्रुअल कप घालून झोपू शकता. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी रक्तस्राव अधिक असतो. त्यामुळे काळजी घ्या. कारण- जास्त रक्तस्रावामुळे कप गळू शकतो. त्यामुळे योग्य वेळी तो रिकामा करणं महत्त्वाचं आहे.
७) मेंस्ट्रुअल कपची स्वच्छता कशी ठेवावी?
टॉयलेटमध्ये जाऊन कपमध्ये जमा झालेल्या रक्तस्रावाचं विसर्जन करा. त्यानंतर योग्य साबण आणि पाण्याचा वापर करून कप स्वच्छ धुवा आणि पुसून काढा. तसेच दर महिन्यात मासिक पाळीच्या शेवटच्या दिवशी साबण व कोमट पाण्यानं कप धुऊन स्वच्छ करा. हा कप पुसून कोरडा करणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य ठरू शकतं.
८) योनीमार्गात कप अडकला, तर काढण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर टाळा
योनीमार्गात कप अडकला, तर तो काढण्यासाठी चुकूनही पेन्सिल, पेन किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नका. कारण- योनीमार्गाची जागा ही फार संवेदनशील व नाजूक असते. अशा वेळी या वस्तूंच्या वापरामुळे गंभीर दुखापत होऊ शकते आणि इतर आरोग्य समस्या उदभवू शकतात.
९) कपासाठी कोणता आकार आणि ब्रँड वापरायचा?
मेंस्ट्रुअल कप्सचे बाजारात विविध प्रकार आहेत. तसेच वेगवेगळ्या आकारांचे कपही उपलब्ध आहेत. योग्य आकार आणि ब्रँड शोधण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तसेच तुम्ही तो वापरल्यानंतरही तुम्हाला कळेल की, तुम्हाला कोणत्या आकाराचा कप जास्त सोईस्कर आहे.
१०) आरोग्याच्या दृष्टीनं सॅनिटरी पॅडच्या तुलनेत मेंस्ट्रुअल कप चांगला आहे का?
सॅनिटरी पॅड बाहेरून वापरावा लागतो. त्यामुळे अनेकदा संसर्गाचा धोका असतो. तसेच बसताना किंवा काही काम करताना आपल्याला दोन पायांच्या मध्ये काहीतरी आहे, असं जाणवत राहतं. त्यामुळे सॅनिटरी पॅडमध्ये ज्यांना आरामदायी वाटत नाही, त्यांच्यासाठी मेंस्ट्रुअल कप हा दुसरा पर्याय आहे. सॅनिटरी पॅड एकदा वापरल्यानंतर तो पुन्हा वापरता येत नाही, तसेच त्याची योग्य रीतीनं विल्हेवाट लावावी लागते. हे वापरलेले पॅड्स कचऱ्यात टाकल्यानंतर त्यामुळे पर्यावरण आणि कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दुसरीकडे मेंस्ट्रुअल कप एकदा वापरल्यानंतर तो फेकून द्यावा लागत नाही. तो पुन्हा वापरता येतो. तसेच खर्चाच्या दृष्टीनंही सॅनिटरी पॅडपेक्षा मेंस्ट्रुअल कप हा परवडणारा पर्याय आहे आणि तो अनेक वर्षं वापरता येतो.