अलीकडे जनरल स्टोअर्स, फरसाण, बेकरी आणि मिठाईची दुकाने ‘हेल्दी’ नावाने अनेक खाद्यपदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतात. रंगीबेरंगी वेष्टनांपेक्षा प्लास्टिकचे वेष्टन (पॅकेजिंग ) असणाऱ्या या वस्तू ग्राहकांना शुगरफ्री, ग्लूटीनफ्री , फॅटफ्री, डायबिटीस फ्रेंडली, वेट लॉस फ्रेंडली अशा शीर्षकांखाली विकली जातात. आहार साक्षरतेचा मुद्दा लक्षात घेता पदार्थ खरेदी करतानाचे ग्राहकभान हा तितकाच महत्वाचा भाग.
ही वेगवगेळी बिस्किटे, कुकीज, लाडू कोणत्या पदार्थांपासून तयार झाले आहेत? त्याची पदार्थ तयार केल्याची आणि विक्री करतानाची तारीख यात कितपत अंतर आहे? शुगर फ्री म्हणजे खाद्यपदार्थात कोणतीच साखर किंवा तत्सम पदार्थ नाहीये का हे जाणणे आवश्यक आहे. मध्यंतरी असे लक्षात आले की, एका दुकानात नाचणीची बिस्कीट- डायबिटीस फ्रेंडली या नावाने विकली जात होती.
हेही वाचा… … आणि दाढदुखी थांबली
दुकानदारही संवाद साधताना लक्षात आलं की, त्यांनी स्वतःच मैद्याऐवजी नाचणी वापरली होती. कारण डायबिटीससाठी फक्त मैदा वाईट बाकी सगळं चालतं असं मलाच त्यानं अत्यंत ठामपणे सांगितलं. मी त्यांना विचारलं पण या वेष्टनावर संपूर्ण माहिती का नाहीये? तर त्यांनी ‘मीच आहे माहिती द्यायला’ असं उत्तर दिलं आणि त्या हेल्दी बिस्किटाच्या खपाकडे पाहून मला खाण्याच्या बाबतीत आपण का बरं अविचारी राहतो असा यक्षप्रश्न पडला!
हेही वाचा… रात्री जागणाऱ्यांना होऊ शकतो ‘टाईप २’ मधुमेह; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…
अनेकदा नाचणीचे बिस्किट म्हणून पुठ्ठ्यासारखी लागणारी अत्यंत निकृष्ट चवीची बिस्किटे दिली जातात. माणूस म्हणून आपल्या काही चवी, गंध आणि पोत अशा जाणीव आहेत. वर्षानुवर्ष साखरयुक्त बिस्किटे खाल्ल्यामुळे बिस्किटांची एक चव आणि गंधाची प्रतिमा आपल्या डोक्यात उतरलेली असते; निकृष्ट चवीची बिस्किटे खाताना सरसकट त्या प्रतिमेला धक्का बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बिस्किटे खाताना ती बेकिंग प्रॉडक्ट्स आहेत आणि त्याच्यासाठी मैदा किंवा बेकिंग एजंट यांचा वापर होतो आणि त्याचा शरीरावरही तितकाच परिणाम होणार आहे, याची जाणीव असू द्यात.
हेही वाचा… विश्लेषण : पन्नाशीच्या आतील व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय?
अनेक पदार्थांमध्ये विदाऊट शुगर किंवा शुगर फ्री असे लिहिलेले असते त्याच्यामध्ये खजुराचे सिरप किंवा खजूर किंवा खारीक पावडर यांचा मुक्तहस्ते वापर केलेला आढळतो. अनेकदा तांबडी साखर, कॅरॅमल असे लिहून देखील हेल्दी म्हणून कमी कॅलरीज, कमी साखरेचे पदार्थ खपवले जातात. सगळ्यात मोठा विनोद म्हणजे बिनसाखरेचे गोड पदार्थ! मिठाईच्या दुकानांमध्ये शुगर फ्री म्हणून खजूर पाक, बकलावा, चॉकलेट मिठाई असे पदार्थ सर्रास विकले जातात. अनेक पारंपरिक मिठाईच्या पदार्थांमध्ये गूळ किंवा खजूर सिरप, स्टीव्हिया यांसारखे साखरेचे पर्यायी पदार्थ वापरले जातात. हे पदार्थ खरेदी करताना त्यातील अन्नघटकांची आणि जिन्नसांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
रेडिमेड ज्यूसेस
तसंच काहीसं रेडिमेड ज्यूसेस बद्दल! ज्यावेळी एखादा ज्यूस / रस कोणत्याही प्रकारे पॅकेज बंद केलेला असतो त्यावेळेला पॅकेजिंग हा देखील फार महत्वाचा मुद्दा ठरतो. अनेक वेळा अल्कलाइन पाणी हे प्लास्टिकच्या बाटलीमधून दिले जाते, ज्याची किंमत अतिशय कमी असते. अल्कलाइन पाणी प्लास्टिकच्या बाटलीमधून दिले तर त्याची अल्कलिनिटी ही बदलणारच ना. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अल्कलाइन पाणी विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी साध्या भांड्यात काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या बरणीमध्ये तुम्ही अल्कलाइन पाणी तयार करू शकता.
कोणत्याही प्रकारची चटणी बाजारातून विकत आणल्यास ती दोन ते तीन दिवसात संपेल एवढ्याच प्रमाणात घरात आणली जाईल याचाही भान राखणं आवश्यक आहे. तसाच एक मुद्दा होतो तो म्हणजे दुधाबाबत. प्राणीजन्य दूध वापरताना त्याचे प्रमाण किंवा त्याची एक्सपायरी डेट जाणून घेणे खूप आवश्यक आहे जर एक्सपायरी डेट ४८ तास किंवा ७२ तास इतकीच असेल तर त्या वेळेत ते वापरले जाणे अत्यंत आवश्यक आहे. हेच दही आणि पनीर यांनाही लागू आहे. केवळ फ्रीजरमध्ये ठेवलं म्हणून त्याचं शेल्फ लाइफ वाढेल मात्र पोषण मूल्यांचा ऱ्हास नक्कीच होत असतो त्यामुळे फ्रीजमध्ये अनादी अनंत काळ ठेवलेल्या पदार्थांचा वापर टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आहार साक्षरता अंगी बाळगताना ग्राहक म्हणून पदार्थांची निवड करताना त्यातील पोषणतत्त्वे आणि पर्यायाने शरीरावर होणार परिणाम यांचा विचार व्हायलाच हवा!