BMI vs Waist Circumference: गेल्या अर्धशतकात, लठ्ठपणाचा त्रास जगभरात महामारी सारखा पसरत आहे. भारतासारख्या विकसनशील देशासह जगाच्या कानाकोपऱ्यातून लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांची चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. लठ्ठपणाच्या बाबत भीषण गोष्ट म्हणजे अलीकडे ही स्थिती बालपणापासूनच वाढताना दिसत आहे. शरीराचे अधिक वजन, हे मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्मृतिभ्रंश आणि कर्करोग असे अन्य आजार वाढवण्यासही कारणीभूत ठरते. आपलं वजन वाढलंय का हे ओळखण्याचा एक प्रसिद्ध निकष म्हणजे बॉडी मास इंडेक्स. ज्यामध्ये तुमच्या एकूण वजनाचा तुमच्या एकूण उंचीने भागाकार केला जातो. पण काही आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार बॉडी मास इंडेक्सपेक्षाही अधिक सूचक निकष म्हणजे तुमच्या कंबरेचा घेर. बॉडी मास इंडेक्स व कंबरेचा घेर हे दोन्ही प्रकार वजनाविषयी काय सांगतात तसेच त्यांच्या मर्यादा काय आहेत, याविषयी आज आपण औषध तज्ज्ञ विजय ठक्कर यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
बॉडी मास इंडेक्स व त्याच्या मर्यादा
बॉडी मास इंडेक्स हे उंचीनुरुप वजन किती असावे यासाठी वापरले जाणारे परिमाण आहे. या समीकरणात, वजन किलोग्रॅममध्ये मोजले जाते आणि उंची मीटरमध्ये मोजली जाते. किलोग्रॅम उंचीने भागले जातात. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे त्यांचे वजन कमी आहे असं समजलं जातं. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स २४पेक्षा अधिक आहे त्यांचं वजन जास्त आहे तर ज्यांचा बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त आहे ते स्थूल मानले जातात. १८ ते २४ (किलोग्रॅम/मीटरचा वर्ग) ही बॉडी मास इंडेक्सवर आदर्श निकष पातळी मानली जाते.
बॉडी मास इंडेक्समधील एक महत्त्वाची त्रुटी म्हणजे याअंतर्गत शरीरातील वजनाचे घटक (पाणी, प्रोटीन, फॅट्स, ग्लायकोजन, मिनरल्स) यांचे प्रमाण लक्षात घेतले जात नाही. या प्रत्येक घटकामुळे आरोग्यावर वेगवेगळा प्रभाव पडू शकतो. उदाहरणार्थ, उच्च चरबी, कमी प्रथिने आणि खनिजे असल्यास सारकोपेनिया (स्नायूंचे वजन कमी होणे), ऑस्टियोपोरोसिस (हाडांची कमकुवतता) सारखे त्रास वाढू शकतात.
काही वेळा प्रथिनांचे अधिक सेवन करणाऱ्यांचे विशेषतः खेळाडूंचे स्नायूंचे वजन जास्त असल्याने बॉडी मास इंडेक्स जास्त असू शकतो. आकडेवारीनुसार त्यांना लठ्ठ म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते पण यात तथ्य उरत नाही. याला पर्यायी, फॅट-फ्री मास इंडेक्स (FFMI) आणि बॉडी फॅट मास इंडेक्स (BFMI) असे निकष आहेत. ज्यामध्ये शरीरातील वर नमूद केलेले घटक सुद्धा लक्षात घेतले जातात पण अशा प्रकारचे मूल्यांकन हे महाग असू शकते जे सामान्य लोकांसाठी खर्चिक ठरू शकते.
कंबरेचा घेर वजनाविषयी काय सांगतो?
आपल्या कंबरेचा घेर मोजून आपल्याला आरोग्यासंबंधित जोखीम घटकांचा अभ्यास करता येऊ शकतो. पुरुषांमध्ये साधारणपणे कंबरेचा आदर्श घेर ९४ सेमी (३७ इंच) आणि महिलांमध्ये ८० सेमी (३१.५ इंच) इतका असतो. यापेक्षा कमी किंवा जास्त माप हे चिंताजनक ठरू शकतो. कंबरेचा घेत हा व्हिसेरल फॅट्सवर अवलंबून असतो, आतडे, स्वादुपिंड व यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या आजूबाजूला साचलेली चरबी. व्हिसेरल फॅटचे प्रमाण वाढल्यास अनेक अवयवांचे कार्य बिघडते, ज्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारखे आजार होतात.
हे ही वाचा<< एका मिनिटात हृदयाचे किती ठोके पडायला हवे? ‘हा’ आकडा ठरतो धोक्याची घंटा, नाडी बघून कशी मोजावी धडधड?
भारतात लठ्ठपणाने त्रस्त लोकांची संख्या वाढत असताना धोका व उपाय ओळखणे आवश्यक आहे. अधिकाधिक लोकसंख्या बैठ्या जीवनशैलीकडे वळत असताना व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या वाढत्या सेवनाने व्हिसेरल फॅट्सची वाढ होऊ शकते. हे टाळल्यास एकूणच वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते. उपाय शोधण्याआधी प्रश्न शोधणे आवश्यक आहे आणि आपल्याला खरोखरच अतिवजनाचा त्रास आहे का हे जाणून घेण्यासाठी कंबरेचा घेर मोजणे, हा स्वस्त, सोपा व सहज समजून घेता येण्यासारखा पर्याय आहे.