आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बैठ्या कामामुळे शरीरदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. लहान वयातील व्यक्तींमध्येही पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखी यांसारख्या तक्रारी वाढताना दिसतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आपला दिवस कसा घालवतो, त्यात अर्गोनॉमिक्सचा अभाव. अर्गोनॉमिक्स म्हणजे कार्याभ्यास. कामाच्या ठिकाणी कामासाठी योग्य आणि माणसाच्या शरीररचनेला सुसंगत उपकरणे, फर्निचर आणि पद्धतींचा वापर.
पाठदुखी ही आजकालच्या जीवनशैलीशी जोडलेली एक मोठी समस्या आहे. सतत बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे खुर्चीचा अयोग्य वापर. अर्गोनॉमिक्सच्या योग्य उपाययोजना करून ही समस्या लक्षणीयरीत्या कमी करता येते. २०१३ साली मी सायन रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत झालो. या पदावर काम करताना बराच काळ खुर्चीवर बसावे लागते. २-३ महिन्यातच पाठदुखी सुरू झाली. औषधे घेऊन ती थांबेना. तेव्हा माझ्या बरोबर काम करणाऱ्या physiotherapist ने सल्ला दिला-“ सर तुम्ही खुर्ची बदला”. मला प्रथम आश्चर्य वाटले, परंतु तिने मला गोदरेज कंपनीच्या कार्यशाळेत नेऊन माझे एर्गोनॉमिक (ergonomic) माप घेऊन त्या प्रमाणे योग्य खुर्ची वापरण्याचा सल्ला दिला. व काही दिवसातच माझी पाठदुखी थांबली. खुर्ची ही आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे, विशेषतः जेव्हा आपण लांब वेळ बसून काम करतो. म्हणूनच आज आपण या विषयी जास्त माहिती घेऊया!
आणखी वाचा-लहान बाळांनी काय खावं काय प्यावं? (भाग २)
पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे आणि प्रत्येक माणूस कधी ना कधी त्याला समोर जातो. पाठदुखी अनेक कारणांमुळे उद्भवू शकते. काही सामान्य कारणे येथे देत आहे:
शारीरिक कारणे
चालताना, बसताना किंवा उभे राहताना चुकीच्या पद्धतीमुळे पाठ दुखू शकते.
जास्त वजन पाठीच्या कण्यांवर ताण निर्माण करते, ज्यामुळे दुखू शकते.
मानसिक तणाव किंवा शारीरिक श्रमामुळे स्नायू तणाव होऊ शकतो, ज्यामुळे पाठ दुखू शकते.
अयोग्य पलंगामुळे पाठीच्या कण्यांना योग्य आधार मिळत नाही, ज्यामुळे दुखू शकते.
अचानक झुकणे, उचलणे किंवा फिरणे यामुळे पाठ दुखू शकते.
वयाच्या वाढीसह कणा आणि डिस्क कमकुवत होतात, ज्यामुळे पाठ दुखू शकते.
वैद्यकीय कारणे
डिस्क समस्या : कण्यांमधील डिस्क निघून गेली किंवा फाटली तर पाठ दुखू शकते.
ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis): हाडांची कमकुवतपणा हा पाठदुखीचे एक कारण असू शकतो.
संक्रमण (Infection): कधीकधी, संक्रमणामुळे पाठदुखी होऊ शकते.
आर्थराइटिस (Arthritis): सांध्यांमधील सूज आणि कडकपणा पाठदुखीचे कारण असू शकतो.
जर तुम्हाला पाठदुखी अनेक दिवसांपासून त्रास देत असेल तर, डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
आणखी वाचा-उपाशी राहिल्याने खरंच लवकर वजन कमी होते? तज्ज्ञांनी दूर केले १० प्रचलित गैरसमज
पाठदुखीमध्ये खुर्चीचा अयोग्य वापर का घातक ठरतो?
खुर्चीचा उंचीचा समतोल नसणे शरीराच्या नैसर्गिक स्थितीत अडथळा आणतो. त्यामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. पाठीस आधार देणाऱ्या खुर्चीचा अभाव असल्यास कंबरेच्या वाकण्यावर विपरीत परिणाम होतो. लॅपटॉप किंवा संगणक काम करताना स्क्रीन खाली असल्यास मान सतत पुढे झुकवली जाते, ज्यामुळे पाठदुखीची समस्या तीव्र होऊ शकते. लांब वेळ एका स्थितीत बसल्याने रक्ताभिसरण कमी होते, त्यामुळे स्नायू थकतात आणि वेदना होतात.
योग्य खुर्चीची वैशिष्ट्ये
१. कमरेला आधार- खुर्चीत लंबर सपोर्ट असावा जो पाठीच्या खालच्या भागाला (लोअर बॅक) आधार देतो. यामुळे मणक्याचा नैसर्गिक “एस” आकार राखला जातो, ज्यामुळे पाठीचा ताण कमी होतो.
२. उंचीची योग्य मांडणी
- खुर्चीची उंची अशी असावी की तुमचे पाय जमिनीला नीट टेकतील आणि गुडघे ९० अंश कोनात असावेत.
- टाचांवर अनावश्यक दबाव येणार नाही यासाठी फूटरेस्टचा वापर करता येईल.
३. आर्मरेस्टची व्यवस्था- खुर्चीच्या आर्मरेस्टची उंची योग्य असावी. त्यामुळे खांद्यांवर ताण येत नाही आणि हात आरामशीर राहतात.
४. स्विव्हल खुर्ची- फिरणारी खुर्ची- फिरणारी खुर्ची (स्विव्हल) वापरल्यास एका ठिकाणी वाकून पोहोचण्याची गरज कमी होते, ज्यामुळे कंबर दुखण्याचा धोका कमी होतो.
५. आधुनिक खुर्च्यांतील सुविधा- अर्गोनॉमिक ऑफिस खुर्च्यांमध्ये हेडरेस्ट, अॅडजस्टेबल बॅकरेस्ट, आणि घसरले न जाणारे सीट कुशन ही अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध असतात.
आणखी वाचा-Health Special: हिवाळ्यामध्ये ऊन अंगावर घेताना कोणती काळजी घ्याल?
खुर्चीवर बसण्याची योग्य पद्धत
- ताठ बसणे: नेहमी पाठ ताठ ठेवा; खुर्चीवर पुढे वाकून बसणे टाळा.
- पाठीला आधार: खुर्चीच्या मागील भागाला पाठ पूर्णपणे टेकवा.
- पायांची स्थिती: पाय लटकवू नका; पाय जमिनीवर सरळ टेकवा.
- ब्रेक घ्या:सतत बसून काम करण्याऐवजी दर ३० मिनिटांनी २-३ मिनिटे उभे राहून स्ट्रेचिंग करा. हेही महत्त्वाचे आहे
१. पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी दररोज स्ट्रेचिंग करा- मांडी आणि कंबरेचे स्नायू बळकट करण्यासाठी साधे व्यायाम उपयोगी पडतात.
२. मॉनिटरची स्थिती – स्क्रीन डोळ्यांच्या सरळ पातळीवर ठेवा. स्क्रीन कमी उंचीवर असल्यास मान झुकवली जाते आणि पाठदुखी वाढते.
३. डेस्क सेटअप – टेबल खुर्चीच्या उंचीला साजेसे ठेवा, जेणेकरून तुमचे हात ९० अंश कोनात राहतील.
४. योगासने आणि ध्यान – शरीरातील ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने आणि ध्यान फायदेशीर ठरते.
योग्य खुर्चीची निवड आणि बसण्याच्या सवयींमध्ये सुधारणा केल्यास पाठदुखीचा त्रास कमी करता येतो. अर्गोनॉमिक्सचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यालयीन आणि घरगुती जीवनात योग्य खुर्च्यांचा वापर केल्यास पाठीचा आधार कायम राखता येईल. “योग्य खुर्ची ही केवळ आरामदायक फर्निचर नसून ती आरोग्य टिकवणारी गुंतवणूक आहे”