Digene Gel Recalled In India: औषध उत्पादक संस्था अॅबॉट इंडियाने भारतातील लोकप्रिय डायजिन जेल या ऍसिडिटी व गॅसवरील औषधाच्या बाटल्या बाजारातून परत मागवल्या आहेत. ग्राहकांनी सामान्यतः गोड चवीच्या या गुलाबी रंगाच्या जेल मधून कडवट व तिखट चव व गंध येत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने त्यांच्या वेबसाइटवर जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, “प्रतिबंधित उत्पादन असुरक्षित असू शकते आणि त्याच्या वापरामुळे प्रतिकूल प्रतिक्रिया उमटू शकतात.” आपणही जर हे औषध घेत असाल किंवा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असल्यास अशा औषधांच्या शोधात असाल तर डॉक्टरांनी आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे दिलेले उत्तर जाणून घेऊया..
डायजिन कशासाठी वापरले जाते? (What Is Digene Used For)
डायजिन हे एक सामान्य गुलाबी द्रव किंवा त्याचे गोळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध असणारे औषध आहे. हे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ, पोट बिघडणे, ओटीपोटात दुखणे आणि गॅस यांसारख्या त्रासांपासून सुटका मिळवून देण्यासाठी ओळखले जाते. हे जठराची सूज (पोटाच्या अस्तराची जळजळ) आणि ऍसिड रिफ्लक्स (अशी स्थिती जेथे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत जाते) यावर उपाय म्हणून डॉक्टरांकडूनच सुचवले जाऊ शकते. पोटातील आम्ल कमी करण्यासाठी या औषधात मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सारखी संयुगे वापरलेली असतात.
ज्या उत्पादनासाठी सद्यस्थितीत अलर्ट देण्यात आला आहे त्या उत्पादनाचे सेवन न करणेच उचित ठरेल. तसेच सध्या डायजिनला पर्यायी अन्य उत्पादनांवर स्विच करण्याचे डॉक्टर सुचवतात. कोणत्या ब्रँडची खरेदी करायची याबाबत आपण नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डायजिन घेतल्याने काय नुकसान होऊ शकते?
अँटासिड सामान्यतः सुरक्षित आहे. पण, त्याचा दीर्घकालीन वापर टाळावा कारण यामुळे इतर गुंतागुंत वाढू शकते. “डायजिन सारखे औषध दीर्घकाळापर्यंत वापरल्याने मूत्रपिंड आणि हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच लोकांना अशी औषधे अधूनमधूनच वापरावी. तसेच दीर्घकालीन वापरासाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे,” असे इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉ सुरंजित चॅटर्जी सांगतात.
मॅक्स हॉस्पिटलचे अंतर्गत औषध संचालक डॉ रोमेल टिकू सुद्धा सांगतात की, “औषध दीर्घकाळ वापरल्याने कॅल्शियमची पातळी वाढू शकते. कॅल्शियमच्या पातळीत झालेली वाढ, शरीराचा pH वाढवून मूत्रपिंडाचे नुकसान करू शकते. याशिवाय मिल्क -अल्कली सिंड्रोम म्हणून ओळखली जाणारी स्थिती होऊ शकते.” अँटासिड्समुळे तुमच्या शरीरात जास्त आम्ल निर्माण होते, ज्यामुळे लक्षणे बिघडतात, तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, अगदी लोहाची कमतरता देखील होते.
हे ही वाचा<< माणूस न जेवता किती दिवस जगू शकतो? प्रत्येक दिवशी शरीरात काय बदलतं, शरीराचं गणित नीट जाणून घ्या
दरम्यान, कंपनीने सुरुवातीला मिंट फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनाची एक बॅच आणि केशरी फ्लेवरच्या चार बॅच पांढऱ्या रंगाच्या, कडू चव आणि तिखट दर्प येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर माघारी बोलावल्या होत्या. एका आठवड्याच्या आत कंपनीने आपल्या गोव्यातील मिंट, संत्री आणि मिश्र फळांच्या फ्लेवर्समध्ये विकल्या गेलेल्या डायजिन जेलच्या सर्व बॅच परत मागवल्या. सध्या सर्व घाऊक विक्रेते आणि वितरकांना सर्व प्रभावित उत्पादने न विकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.