Kejriwal, Diabetes vs Mango: दिल्ली सरकारच्या कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मधुमेही आहेत. केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी यासाठी अरविंद केजरीवाल वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. केजरीवालांचे आंबे खाणे वादात असताना आज आपण खरोखरच मधुमेह असलेल्यांसाठी आंबा हे सुरक्षित फळ आहे का? याविषयी तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत.
मँगो VS शुगर रश
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५० ते ५५ पर्यंत मध्यम असतो. (एखाद्या पदार्थाची रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवण्याची क्षमता मोजणारे हे एक मूल्य आहे. ग्लायसेमिक इंडेक्स जितका जास्त असेल तितका ग्लुकोज वेगाने शोषला जातो आणि रक्तातील साखरेची तीव्र वाढ होते). नियंत्रित मधुमेह असलेल्यांना कमी प्रमाणात आंब्याचे सेवन करण्यास हरकत नाही.
आंबा व मधुमेह
डॉ मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटर, चेन्नईचे अध्यक्ष डॉ व्ही मोहन यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “आंब्यामुळे रक्तातील साखरेची वाढ होते पण ही नैसर्गिक साखर असते. रिफाइंड पीठ किंवा तांदूळ खाल्ल्याने अचानक जशी रक्तातील साखर वाढते तसा त्रास होत नाही. आंब्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे साखरेचे शोषण आणि अँटी-ऑक्सिडंट्स कमी होतात. आंब्याला फळ म्हणून नव्हे तर कार्बोहायड्रेटचा स्रोत म्हणून पाहायला हवे. मधुमेह असल्यास कार्ब्स व कॅलरीजचे सेवन प्रमाणात असणे गरजेचे असते. त्यामुळेच अर्धा किंवा पूर्ण आंबा खाणार असाल तर त्यादिवशी अन्य माध्यमातून (जसे की, भात, पोळी, अन्य फळे) कॅलरीचे सेवन टाळा. तसेच आंब्याचे सेवन सुद्धा अर्ध्या किंवा जास्तीत जास्त एका आंब्याहून अधिक नसावे. आंबा हा मुख्य जेवणासह गोडाचा पदार्थ म्हणून खाऊ नये कारण यामुळे कॅलरीजचा भार वाढू शकतो. दिवसभरात रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी स्नॅक्स म्हणून सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी आंबा खाऊ शकता.”
मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे अध्यक्ष डॉ. अंबरिश मिथल यांनी पुढे अधोरेखित केले की, जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियमित असेल आणि HbA1c (तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखर) जास्त असेल, तर आंब्यासह अन्य कार्बोहायड्रेट-समृद्ध पदार्थ व फळं सुद्धा टाळायलाच हवीत.
१ वाटी आंब्यातील पोषक सत्वांचे तपशील
डॉ मिथल यांनी एक वाटी कापलेला आंबा जो वजनाने साधारण १६५ ग्रॅमचा असू शकतो, त्यातील पोषक सत्वांचे प्रमाण सांगितले आहे.
- कॅलरीज: ९९ kcal
- प्रथिने: ०.८ – १ ग्रॅम
- चरबी: ०. ६३ ग्रॅम
- कार्ब्स: २४.८ ग्रॅम
- फायबर: २.६४ ग्रॅम
- पोटॅशियम: २७७ मी
- व्हिटॅमिन सी- ६०.१ मिलीग्राम
- फोलेट: ७१ एमसीजी
- आंब्यामध्ये मॅग्नेशियम, तांबे आणि ओमेगा 3 आणि 6 फॅटी ॲसिड्स सारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात.
आंबा कसा व किती खावा?
डॉ. मित्तल सांगतात की, आंब्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरलेली असतात, परंतु त्यात जास्त प्रथिने नसतात त्यामुळे अन्य प्रथिनांसह आंबा खाल्ल्याने पोट भरणारा व पोषण पुरवणारा नाष्टा ठरू शकतो. दही, बदाम, अक्रोड सारख्या सुक्या मेव्यासह आंबा चविष्ट सॅलेडचा भाग बनू शकतो.
मधुमेह असलेल्या लोकांना दररोज १५०-२०० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचे सेवन पुरेसे ठरते. यापैकी ३० ग्रॅम कार्ब्स हे फळातून घेतले जाऊ शकतात. फळाच्या एका सर्व्हिंगमध्ये १५ ग्रॅम कार्ब्स असावेत. कमी कार्बोहायड्रेट असणारे फळ जसे की, स्ट्रॉबेरी आणि पीच तुम्ही अधिक प्रमाणात खाऊ शकता. आंब्याच्या बाबतीत, १०० ग्रॅम फळामध्ये १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच अर्धा मध्यम आकाराचा आंबा मधुमेहींसाठी पुरेसा ठरू शकतो.
हे ही वाचा<< तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
नैसर्गिक साखर आहे म्हणून कितीही आंबा खावा का?
दरम्यान, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आंबा खाण्याचा सल्ला देणाऱ्या व्हिडीओबाबत डॉ मोहन यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. डॉ मोहन सांगतात, आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते म्हणून आंबा हवा तेवढा खाल्ला तरी नुकसान होणार नाही असं नाही. कारण नैसर्गिक असली तरी ती साखरच आहे त्यामुळे नियंत्रण ही कोणत्याही गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी गुरुकिल्ली आहे हे लक्षात घ्या.