सध्या धावपळीच्या आयुष्यात चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे वजनवाढीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कर्बोदके आणि फॅट्सयुक्त आहार टाळत असाल, तर त्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ शकते.
एका जपानी संशोधनातून असे समोर आले आहे की, ज्या पुरुषांनी कर्बोदके खाणे टाळले आणि ज्या महिलांनी फॅट्सयुक्त आहार घेतला नाही, त्यांचा मृत्यूचा धोका वाढलेला दिसून आला.
खरे तर कर्बोदके हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे; पण पुरुषांना याची जास्त गरज असते आणि स्त्रियांना हार्मोन्स, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनच्या निर्मितीसाठी फॅट्सची जास्त आवश्यकता असते. द्वारका येथील एचसीएमसीटी मणिपाल हॉस्पिटलच्या न्युट्रिशन व डायटेटिक्स सल्लागार डॉ. वैशाली वर्मा सांगतात, “दोन्ही गोष्टी चयापचय क्रियेसाठी जास्त गरजेच्या आहेत. त्यामुळे संतुलित आहार हा वजन कमी करण्याचा चांगला पर्याय आहे.”
मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपल्या शरीराला ४५ ते ६५ टक्के कर्बोदकांमधून आणि २५ ते ३५ टक्के फॅट्समधून कॅलरीज मिळणे गरजेचे आहे.
पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी कर्बोदके आणि फॅट्स का आवश्यक आहेत?
कर्बोदके हा शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक कार्यांसाठी कर्बोदके आवश्यक आहेत. त्याशिवाय कर्बोदकांमुळे स्नायूंची वाढ होते आणि स्नायू आणखी मजबूत होतात. स्त्रियांमधील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी फॅट्स आवश्यक आहेत. त्याशिवाय जीवनसत्त्वे ए, इ व के वाहून नेण्यास फॅट्स महत्त्वाचे काम करतात. फॅट्स आपली त्वचा निरोगी ठेवण्यास आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. प्रसूतीदरम्यानसुद्धा फॅट्स अत्यंत आवश्यक असतात.
कर्बोदके आणि फॅट्सचे प्रमुख स्रोत कोणते?
कॉम्प्लेक्स कर्बोदके हा एक चांगला पर्याय आहे. कारण- ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय यात फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे भूक नियंत्रित करण्यासाठीसुद्धा फॅट्स फायदेशीर आहेत. ओट्स, क्विनोआ, गहू, बाजरी, भाज्या, फळे व काजू हे कर्बोदकांचे प्रमुख स्रोत आहेत.
नट्स आणि बिया या फॅट्सचा चांगला स्रोत आहेत. सूर्यफूलाचे तेल, तांदळाचे पीठ व खोबरेल तेल तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता. हवाबंद पिशवीतील आणि बेकरीतील अन्न खाऊ नका. त्यात ट्रान्सफॅट्स असतात. स्वयंपाकासाठी एकच तेल वारंवार वापरू नका. तळलेले पदार्थ खाणे टाळा.
जपानी अभ्यास भारतात लागू होऊ शकतो?
जपानमधील लोकांच्या आहाराच्या सवयी आणि गरजा या भारतीयांपेक्षा वेगळ्या असू शकतात. भारतीय लोक त्यांच्या आहारात कर्बोदके आणि फॅट्स अति प्रमाणात वापरतात; पण भारतीय जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी दिसून येते. तर, जपानी लोक भारतीयांपेक्षा अधिक शिस्तप्रिय पद्धतीने जीवन जगतात.
अनेकदा कर्बोदकांचे कमी सेवन हे लठ्ठ व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे वजन हळूहळू कमी करण्यास मदत करते.
अनेक अभ्यासांत असेही समोर आले आहे की, कर्बोदके व फॅट्स यांच्या कमी सेवनामुळे वजन कमी करणे आणि रक्तातील ग्लुकोज व लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी आरोग्य स्थिती पाहून आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार घ्यावा.