सूर्य उत्तरायणामध्ये उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो, त्या काळाला ‘आदानकाळ’ म्हणतात. त्या आदानकाळामधील शेवटचा ऋतू म्हणजे ग्रीष्म. आदानकाळ म्हणजे निसर्गाचे व प्राणिमात्रांचे बल काढून घेणारा, हिरावून घेणारा काळ. प्रत्यक्षातही या ग्रीष्मामध्ये निसर्गाला बल व थंडावा देणार्या सौम्य गुणांच्या चंद्राचे बल कमी होत जाते, निसर्गाला ओलावा पुरवणार्या जलाचे प्रमाण घटत जाते. चंद्र व जलामधील जो सोम अंश निसर्ग व प्राणिजगताला बल व स्नेह पुरवतो, तो सोमांश या दिवसांमध्ये अतिशय क्षीण होतो. याउलट निसर्गाचे व सजीवांचे बल खेचून घेणार्या उष्ण सूर्याची तीव्रता आणि वार्याचा कोरडेपणा दिवसागणिक वाढत जातो आणि सूर्य व वारा या उभय तत्त्वांमुळे शरीरामध्ये जो अत्यावश्यक स्नेह (स्निग्धतेचा अंश) असतो, तो स्नेह दिवसागणिक घटत जातो. या स्नेहालाच आयुर्वेदाने शरीराचे तेज, बल किंवा सार म्हटले आहे. अर्थात शरीरातला स्नेह घटणे म्हणजे शरीराचे तेज-बल-सार कमी होणे. एकंदरच सौम्यता, शीतलता, स्नेह व ओलाव्याच्या अभावी ग्रीष्म ऋतूमध्ये जसा निसर्ग सुकत जातो, तसेच प्राणी व पक्ष्यांचे शरीरसुद्धा सुकू लागते, क्षीण होऊ लागते.
या ऋतूमध्ये सूर्य अळशीच्या फुलांसारखा लालभडक होतो. सूर्यकिरणे अतिशय तीव्र होतात. सूर्यकिरणांची तीव्रता इतकी जास्त असते की, सूर्य जणू काही जगाचा संहार करणार आहे की काय असे वाटू लागते, असे ‘अष्टाङ्गहृदय’कार आचार्य वाग्भट व भाष्यकार हेमाद्रि म्हणतात. या तीव्र सूर्यकिरणांमुळे वातावरण अधिकाधिक उष्ण होत जाते. सर्व दिशांना आकाश असे काही लाल होऊन जाते, जणू काही वणवा पेटला असावा. सूर्याच्या उष्ण किरणांमुळे जमीनसुद्धा तापते आणि भाजल्यासारखी प्रतीत होते. या दिवसांमध्ये नैऋत्येकडून वारा वाहू लागतो जो अतिशय कोरडा, गरम व साहजिकच सुखकारक नसतो. त्या उष्ण वायूच्या, तीव्र उन्हाच्या व सतत घामाच्या परिणामी जगातील सर्व प्राणी-पक्ष्यांची शरीरे ज्वर आल्यावर जशी तापतात तशी तापू लागतात. त्या तापलेल्या शरीराचा दाह थंड करण्यासाठी प्राणी-पक्षी पाण्याच्या शोधात इतस्ततः फिरू लागतात, पाण्याच्या शोधासाठी व्याकूळ होऊन जातात व ओढे, झरे, नदी, तळी, तलावांचा आसरा घेतात. या दिवसांमध्ये नद्या व तलावांमधील पाणी सूर्याच्या कडक उष्णतेमुळे गरम होते. दुरून बघितल्यास पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या वाफा होताना स्पष्ट दिसतात. ग्रीष्म ऋतूमध्ये नद्यांमधील पाणी हळूहळू आटू लागते आणि नद्या दिवसेंदिवस बारीक होत जातात. तळी-तलाव सुकू लागतात. एकंदर सर्वच पाण्यांचे स्रोत दिवसागणिक कमी कमी होऊ लागतात.
पाण्याच्याअभावी या कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये झाडांची पाने पिकू लागतात वा गळू लागतात, ज्यामुळे हळूहळू झाडे सुकू लागतात व पर्णहीन होतात. झाडांवर चढलेल्या वेलीसुद्धा सुकू लागतात. पानांच्या अभावी ते वृक्ष छायाहीन होतात. जमिनीवरचे गवत तर त्या आधीच सुकून गेलेले असते. हिरव्या गवताअभावी जमीन भकास दिसू लागते. डोंगर हिरवळीअभावी ओकेबोके दिसू लागतात. असा हा निसर्गाला नीरस करणारा, वनस्पतींना सुकवणारा, प्राण्यांना क्षीण करणारा आणि मानवाला उष्ण, रुक्ष व निर्बल करणारा तो ग्रीष्म ऋतूतला उन्हाळा.
हेही वाचा – दुपारच्या वेळेत वर्कआउट केल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी? वाचा डॉक्टर काय सांगतात
शरीराचे पोषण होते आहाराने आणि आहार तयार झालेला आहे सहा रसांपासून. औषधेसुद्धा ज्या नैसर्गिक पदार्थांपासून तयार होतात, त्यांनासुद्धा स्वतःचा असा रस असतो. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट हे ते सहा रस, ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये ‘चव’ म्हणतो. आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे, जे प्रत्येक ऋतूत सजिवांमध्ये कोणत्या रसाचा प्रभाव असतो व त्याचा आरोग्यावर काय अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होतो याचा अभ्यास करून शरीरावर विपरीत परिणाम कमीतकमी व्हावा यासाठी कोणत्या रसाचे सेवन करावे, याचे मार्गदर्शन करते. जसे की शरद ऋतूमध्ये खारट रसाचा प्रभाव वाढतो, म्हणून त्याच्या विरोधात गोड रसाचेच सेवन करण्याचा सल्ला दिलेला आहे.
ग्रीष्म ऋतूमध्ये निसर्गतः तिखट रस बळावतो. हे घडते नैऋत्येकडून वाहून येणार्या तिखट चवीच्या वार्यांमुळे (वारे कोणत्या चवीचे असतात, हे पूर्वजांना कसं समजत होतं, हा मोठा प्रश्नच आहे) हे वारे पाण्यावरून वाहून येताना पाण्यामध्ये तिखट चवीचा प्रभाव वाढवतात. ते तिखट चवीचे पाणी वनस्पतींच्या मुळांकडून शोषले जाते, त्यामुळे वनस्पतीमध्येसुद्धा तिखटपणा वाढतो. त्या वनस्पतींचे सेवन करणार्या प्राणी-पक्ष्यांमध्येसुद्धा तिखट रसाचा प्रभाव वाढतो आणि अंतिमतः त्या तिखट पाण्याचे प्राशन करणार्या व तिखट रसावर पोसलेल्या वनस्पती व प्राणीपक्ष्यांचे सेवन करणार्या मानवाच्या शरीरामध्येसुद्धा तिखट रस प्रबळ होतो.
ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात मानवी शरीरामध्ये होणार्या विविध बदलांमागे अनेक कारणे असली तरी निसर्गात आणि पर्यायाने शरीरामध्ये वाढणार्या तिखट रसाचा प्रभाव हेसुद्धा त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे हा आयुर्वेदाचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनाने अभ्यासला गेला पाहिजे. ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात निसर्गतः जर शरीरात तिखट रसाचा प्रभाव वाढत असेल तर त्यात अधिक तिखट खाल्ल्याने त्याचा शरीरावर काय व किती विपरित परिणाम होईल याचा अंदाज तुम्ही सूज्ञ वाचक करू शकता आणि या कडक उन्हाळ्यात ‘तिखट टाळा किंवा तारतम्याने खा’ हा सल्ला आयुर्वेदाने का दिला हेसुद्धा समजू शकता!