Foods to Avoid Kidney Stones: मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन होणं ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप धारण करतात, तेव्हा त्याला आपण मुतखडा झाला म्हणतो. जेव्हा अतिरिक्त क्षार एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून लघवीद्वारे काढून टाकता येत नाहीत आणि मूत्रपिंडात जमा होतात, तेव्हा दगड तयार होतात. खाण्या-पिण्यातील अनियमितता आणि आवश्यक तेवढं पाणी न पिणे हे मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे. मुतखडा अनेकांना होतो, पण काहींच्या किडनीमध्ये तयार झालेला स्टोन सहज बाहेर पडतो. मात्र, काहींचा स्टोन मोठा असल्याने तो बाहेर पडण्यास अडचणी येतात; त्यामुळे काही लोकांना फार जास्त त्रास सहन करावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरामध्ये जेव्हा किडनी स्टोन हळूहळू तयार होऊ लागतो, तेव्हा मूत्राशयातील मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी व्यक्तीला लघवी करण्यास जळजळ, आग होणे, प्रचंड प्रमाणात वेदना होणे, अशा अनेक समस्या व लक्षणे जाणवत असतात. मुतखडा हा अतिव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. खरंतर आपल्या आहारात अशा काही गोष्टी असतात, ज्या पोटात जमा होऊन पुढे स्टोन बनतात. अशात किडनी स्टोनपासून कसा बचाव करावा आणि किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे, याविषयावर हैदराबाद येथील बंजारा हिल्स केअर हॉस्पिटल्सचे सल्लागार यूरोलॉजिस्ट डॉ. पी. वामशी कृष्णा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…

डॉ. कृष्णा म्हणतात, “बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे आजकाल अनेक लोक अनेक समस्यांना बळी पडत चालले आहेत. मुतखडा ही अशीच एक समस्या आहे. मुतखड्याचा त्रास हा आजकाल वृद्धांबरोबरच लहान मुलांनाही होऊ लागला आहे. मुतखड्याचा थेट परिणाम आपल्या मूत्रमार्गावर होतो. पुरेसे पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट तर राहतेच, पण त्यामुळे मुतखड्याचा धोकाही कमी होतो. खरं सांगायचं तर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्यामुळेही अनेकदा मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.” किडनी स्टोन होऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू नये, हे जाणून घेऊया..

(हे ही वाचा : शिळे अन् अस्वच्छ अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? डाॅक्टरांकडून जाणून घ्या… )

किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी ‘हे’ पदार्थ टाळा!

१. प्रोटीनयुक्त पदार्थ

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही त्या गोष्टींचे सेवन करू नये, ज्यात प्रथिने अधिक प्रमाणात असतात. चिकन, मासे, चीज, अंडी, दही, दूध, चणे आणि डाळी इत्यादी पदार्थांपासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश आहारात करू नये. कारण यामध्ये जास्त प्रथिने असल्याने किडनीवर याचा वाईट परिणाम होतो.

२. फॉस्फरसचे प्रमाण असलेले पदार्थ

फास्ट फूड, टॉफी, जंक फूड, चिप्स, कॅन सूप, चॉकलेट, नट, कार्बोनेटेड पेये, लोणी, सोया, शेंगदाणे, काजू, मनुका यांसारख्या पदार्थांमध्ये आधिक प्रमाणात फॉस्फरस असते, यामुळे हे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

३. शीत पेय (कोल्ड्रिंक्स)

मुतखडा झाला असताना कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंकचे सेवन अजिबात करू नये. कारण हे तयार करण्यासाठी फॉस्फोरिक ॲसिडचा वापर होतो, त्यामुळे मुतखडा असताना यांचं सेवन टाळावे. ज्यामुळे स्टोनचा धोका आणखी वाढू शकतो.

४ जास्त मीठ खाणे टाळावे

पालक, बीट, जांभूळ, सुकामेवा,चहा यांच्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यांचे अतिसेवन करणे टाळावे. जास्त मीठ खाणे टाळावे. मीठामध्ये असणारं सोडियम शरीरात गेल्यावर कॅल्शियममध्ये रुपांतरीत होतं आणि त्याचे खडे होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

मुतखड्याचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर लक्ष केंद्रित करणारा संतुलित आहार किडनी स्टोनचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो. वैयक्तिक आहारासंबंधी सल्ल्यासाठी नेहमी आरोग्य सेवा प्रदात्याचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, असा सल्ला डॉ. कृष्णा यांनी दिला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid these food in kidney stone problem know from expert pdb