Do some foods turn ‘toxic’ when you refrigerate: नियमित आयुष्यात वेळ वाचवून घरगुती आहाराचे सेवन करायचे असेल तर पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते, हे आपल्यालाही माहित असेल. सोशल मीडियावर तर आता अगदी आठवड्याचे जेवणच तयार करून फ्रीजमध्ये कसे भरून ठेवावे असेही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत, ज्यानुसार तुम्हाला फक्त त्या त्या दिवशी तो भरून ठेवलेला डबा काढून, जेवण अगदी पटकन गरम करून जेवून मोकळं होता येतं. यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. काहींना ही वेळ वाचवण्याची चांगली कल्पना वाटते तर काहींच्या मते हे शिळं अन्न खाऊन आजाराला आमंत्रण देण्याचं काम ठरतं. अशा प्रकारे जेवण बनवून पूर्वतयारी करायची की नाही हा ज्याचा त्याचा विचार आहे पण मोक्यावर वेळ वाचवण्यासाठी बाजारातून आठवडाभर पुरतील अशा वस्तू एकत्रित आणणे हे तर गरजेचेच असते. भाजी, फळे, अंडी हे सगळं खरेदी करताना अगदी नीट तपासून आणण्याइतकेच त्याला साठवून कसे ठेवावे हे माहित असणं सुद्धा आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक घरांमध्ये वस्तू बाजारातून आणल्या की त्या नावाला स्वच्छ करून फ्रीजमध्ये कोंबून भरल्या जातात ज्यामुळे फ्रीजचा अक्षरशः कचरा होतोच पण या वस्तू स्वतःसह इतर वस्तूंनाही खराब करू शकतात. काही वेळा याच खराब वस्तू बुरशी लागून विषारी सुद्धा होऊ शकतात. याविषयी आयुर्वेद आणि आतड्यांच्या आरोग्यविषयीच्या प्रशिक्षक डॉ डिंपल जांगडा यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. असे कोणते पदार्थ आहेत जे आपण फ्रीजमध्ये स्टोअर केल्यास विषारी बनू शकतात हे पाहूया..

लसूण

डॉ जांगडा सांगतात की, सोललेला लसूण कधीही विकत घेऊन फ्रीजमध्ये ठेवू नका कारण त्याला खूप लवकर बुरशी लागू शकते. बुरशी लागलेला लसूण अनेकदा लक्षातही येत नाही पण त्याचा थेट संबंध कर्करोगाशी सुद्धा जोडलेला आहे. ताजे लसूण नेहमी सालासह खरेदी करा. जेव्हा तुम्ही ते शिजवणार असाल तेव्हाच ते उघडा आणि फ्रीजमध्ये ठेवू नका. दुसरीकडे, डॉ. दिलीप गुडे, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन यांनी नमूद केले की, “फ्रीजमध्ये ठेवलेला लसूण खाल्ल्याने कर्करोग होण्याचा कोणताही संबंध नाही.”

कांदे

डॉ. जांगडा म्हणतात की, “कांदा हे कमी तापमानाला प्रतिरोधक असलेले पीक आहे. “जेव्हा तुम्ही ते रेफ्रिजरेट करता तेव्हा त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि बुरशी लागण्यास सुरुवात होते, शिवाय अर्धा कांदा कापून, शिजवून अर्धा फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक बरेच लोक करतात. असं कधी करू नका. यामुळे जीवाणू, मोल्ड व बुरशी पटकन वाढण्याची शक्यता असते.”

आले

डॉ जांगडा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही आले रेफ्रिजरेट करता तेव्हा ते खूप लवकर बुरशी पकडण्यास सुरवात करते आणि अशा प्रकारच्या आल्याचे सेवन मूत्रपिंड आणि यकृत निकामी करू शकते.

तांदूळ

स्टार्च कमी करण्याच्या हेतूने बरेच लोक शिजवलेले तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू लागले आहेत आणि त्यांना वाटते की असं झाल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते. “पण खरं तर, तांदूळ हा एक घटक आहे जो पटकन बुरशी पकडतो. जर तुम्ही भात फ्रीजमध्ये ठेवणारच असाल तर २४ तासांपेक्षा जास्त काळ भात असा स्टोअर करू नये हे नक्की लक्षात ठेवा.” डॉ. गुडे यांनी सुद्धा याला अनुमोदन देत म्हटले की, पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने बॅसिलस सेरियस सारख्या बॅक्टेरियाच्या वाढीने अन्नातून विषबाधा होऊ शकते

डॉ गुडे यांनी अशाच प्रकारे कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवू नये याची यादी शेअर केली आहे:

  • भोपळी मिरची आणि एवोकॅडो खोलीच्या तापमानतच हवाबंद डब्यात ठेवावे.
  • तसेच, काकडी फ्रीजमध्ये ठेवल्यास मऊ पडून कुजू शकते
  • बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते गोड आणि मऊ होऊ शकतात. हवाबंद डब्यात साधारण तापमानातच बटाटे साठवून ठेवावे.
  • सफरचंद खोलीच्या तापमानातच सुमारे एक आठवडा साठवून ठेवता येते, त्यानंतर जास्त काळ साठवण्याची गरज भासल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते.
  • केळीचे देठ हवाबंद प्लॅस्टिकच्या आवरणाने बंद केले तर त्यांचा टिकाऊपणा वाढू शकतो.
  • बेरीज देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत आणि त्या अधिकाधिक कोरड्या असतील याची खात्री करावी.
  • कलिंगड कापले नसेल तर बाहेरच ठेवावे पण काप केल्यावर फ्रीजमध्ये ठेवू शकता.
  • फ्रिजमध्‍ये मध घट्ट आणि ढेकूळ होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे चॉकलेट फ्रिजमध्‍ये दाणेदार आणि चवहीन होऊ शकते.

भाज्यांना- फळांना बुरशी किंवा बॅक्टरीयाचा संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी, सुकून जाण्यापासून रोखण्यासाठी, नेमकं काय करता येईल याविषयी डॉ दिलीप गुडे, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेली माहिती जाणून घेऊया..

साठवण्यापूर्वी चांगले धुवा

फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना नीट धुवा. त्यांना थंड, स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा; जाड आवरण असलेल्या वस्तूंसाठी, ब्रश वापरा. हे जीवाणू, कीटकनाशके आणि घाण काढून टाकण्यास मदत करते.

योग्य स्टोरेज

फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरच्या मधील खालच्या भागात ठेवा. कच्चे मांस, अंडी आणि सीफूड सह या वस्तू एकत्र ठेवू नका.

तापमानाचे नियंत्रण

तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये योग्य तापमान निवडा. फळे आणि भाज्या साठवण्यासाठी शिफारस केलेले तापमान 32°F ते 40°F (0°C ते 4°C) आहे.

ओलावा नियंत्रण

काही फळे आणि भाज्या ओलावा असल्यास लगेचच खराब होऊ शकतात अशावेळी अतिरिक्त ओलावा शोषण्यासाठी, पेपर टॉवेल किंवा चांगल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरा.

हे ही वाचा<< ५३ वर्षीय IIT च्या शिक्षकाचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू! कोलेस्टेरॉल ठरला घातक, तज्ज्ञ सांगतात योग्य पातळी किती असावी?

वारंवार स्वच्छता

बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ टाळण्यासाठी, रेफ्रिजरेटर वारंवार स्वच्छ करा. हवाबंद कंटेनर्स सुद्धा नीट स्वच्छ करून वापरा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurveda expert suggest food that turns toxic when stored in fridge how to perfectly pre plan meal without loosing nutrition svs
Show comments