Health Special ‘वारुणवारे म्हणजे वरुण या जलदेवतेच्या नावाने ओळखले जाणारे वारे. पश्चिमेकडून वाहत येणार्या या वारुणवाऱ्यांनी ढगांना सोबत खेचून आणल्याने आकाश ढगांनी भरून जाते. आकाशाचा रंग काळा-निळा होतो व आकाश मळलेले दिसू लागते. आकाशातले हे ढग जेव्हा गडगडाट करू लागतात, कडकडाटासह वीज चमकू लागते तेव्हा गर्जना करत पावसाच्या धारा बरसू लागतात. अशा या पावसात पाणीच पाणी चोहिकडे असे असले तरी आपण पिण्याच्या पाण्याचे नेमके काय करावे, ते समजून घेऊ!
क्वथितं अम्बुं पिबेत
आषाढामध्ये पावसाची वृष्टी हळूहळू वाढत जाते व नद्या पाण्याने भरू लागतात. नद्यांच्या किनाऱ्यांवरुन पाणी वर- वर चढू लागते आणि नद्यांचे किनारे हळूहळू दिसेनासे होतात. पावसाचा वर्षाव जसजसा वाढत जातो, तसतशा नद्या सागराचे रूप धारण करतात आणि ‘हीच का ती कालपर्यंत शांतपणे वाहाणारी नदी’, असे वाटू लागते. यानंतर पाणी कोणते आणि भूमी कोणती हे समजेनासे होते अर्थात सर्व भाग जलमय होतो. माती आणि पाणी एकत्र झाल्याने ते पाणी पिण्यालायक राहात नाही, म्हणूनच या दिवसांत पाणी उकळवून- गाळून प्यावे. क्वथितं अम्बुं पिबेत् ׀׀ (अष्टाङ्गसंग्रह १.४.४५) वाचकहो, हे आहे ’अष्टाड्गसंग्रह’ या आयुर्वेदीय ग्रंथामधील वर्णन! हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आयुर्वेद- शास्त्रामधील हे वर्णन आज २१व्या शतकातही प्रत्यक्षसिद्ध आहे.
हेही वाचा : Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं
पाणी उकळवूनच प्या
हल्ली अतिवृष्टी झाल्याने गावागावांमध्ये होणारी परिस्थिती वरील वर्णनाला तंतोतंत लागू पडते! वास्तवातही पावसाळ्यात शहरांमध्येही अनेक ठिकाणी गढूळ पाणी येऊ लागते, मग गावांकडची स्थिती काय असेल? पाण्याला गढूळपणा नसला तरीही पावसातल्या पहिल्या काही दिवसांमध्ये तरी पाणी पिण्यालायक राहात नाही, हे सत्य आहे. मथितार्थ हाच की पावसाळ्यात पाणी गाळून व सर्वात महत्त्वाचे म्हणजे उकळवून मगच प्या. पाणी उकळवून पिण्याचा हा शास्त्राने दिलेला सल्ला आजही प्रत्यक्षसिद्ध आहेच, जो आधुनिक वैद्यकही २१व्या शतकामध्ये देते. आयुर्वेदाने मात्र याही पुढे जाऊन पाणी आटवण्याच्या संदर्भात अधिक मार्गदर्शन केले आहे. किती प्रमाणात आटवलेले पाणी कोणत्या गुणांचे व कोणत्या रोगांमध्ये उपकारक याविषयी आयुर्वेदाने केलेला अभ्यास आश्चर्यकारक व उपयुक्त आहे.
पावसाळ्यात पाणी नेमके किती उकळवावे?
पावसाळ्यात पाणी नेमके किती उकळवावे, याबाबत दोन प्रकारे मार्गदर्शन करता येईल. ज्या प्रदेशामधील पाणी हे विविध अशुद्धींनी दूषित झालेले असते, त्या प्रदेशामध्ये पाणी जितके उकळवू तितके आरोग्यास हितकारक असल्याने एक अष्टमांश बाकी राहीपर्यंत उकळवावे. त्यादृष्टीने प्रावृट् ऋतू मध्ये (म्हणजे पावसाळ्याचे आरंभीचे काही आठवडे) पाणी एक अष्टमांश होईपर्यंत आटवणे अधिक योग्य, जो सल्ला १६व्या शतकात लिहिल्या गेलेल्या भावप्रकाश या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये दिलेला आहे. अन्यथा पाऊस सुरु होऊन काही आठवडे झाल्यानंतर जेव्हा नद्यांचे पाणी वेगाने वाहू लागते आणि अशुद्धी सुद्धा वाहून जातात तेव्हा पाणी निम्मे होईपर्यंत आटवावे. आयुर्वेदानुसार उकळवून आटवलेले असे कोमट पाणी प्यायल्यास ते पाऊण तासात पचते. अर्धे पाणी बाकी राहीपर्यंत आटवलेल्या पाण्याचा विशेष गुण म्हणजे ते वातनाशक असते. वर्षा ऋतुमधील वातप्रकोपाचा व वातविकृतींचा विचार करता अशाप्रकारे निम्मे आटवलेले पाणी वापरल्यास ते या दिवसांमध्ये संभवणार्या वातविकारावर नियंत्रण ठेवण्यास हितकारक होईल.
हेही वाचा : दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे
कोष्ण (कोमट) जलपानाचे आरोग्याला फायदे- (सुश्रुतसंहिता १.४६.३९,४०)
१) गरम पाणी हे चवीला गोड व पचायला हलके असते.
२) गरम पाणी शरीराला थंडावा देणारे मात्र तरीही कफशामक (कफ कमी करणारे) असते. त्यामुळे कफविकारांमध्ये व श्वसनविकारांमध्ये ते उपयोगी पडते.
३) सर्दीमुळे नाक वाहत असताना थंड किंवा साधे (जे पावसाळ्यात थंडच असते) पाणी पिण्यात आले तर नाक वाहाणे चालूच राहते, मात्र रुग्णाने कोमट (विशेषतः आटवलेले)पाणी पिण्यास सुरुवात केल्यास सर्दी नियंत्रणात येते. खोकला व दमा या आजारांमध्ये तर सातत्याने प्यायलेले गरम पाणी रुग्णाला बराच आराम देते.
४) गरम पाणी अग्नीप्रदिपक (भूक व पचनशक्ती सुधारणारे) असते, त्यामुळे अग्निमांद्य असताना व विविध पचनसंस्थेच्या आजारांमध्ये उपयोगी पडते.
५) भूक मंदावलेल्या रुग्णाने कोमट पाणी प्यायल्यास पाचक स्राव व्यवस्थित स्रवून भूक वाढून पचन सुधारण्यास साहाय्य होते, याउलट थंड पाण्यामुळे पाचक स्रावाचे स्रवण करणार्या सूक्ष्म स्रोत-
मुखांचे संकोचन होऊन अग्नी मंदावण्याची शक्यता असते.
६) अपचनाच्या रुग्णांना साधे पाणी प्यायल्यावर पोटात गुबारा धरतो, तर कोमट पाणी मात्र पचन सुधारते.
७) जुलाब होत असतानाही कोमट पाण्यामुळे जुलाब थांबण्यास साहाय्य होते.
८) गरम पाणी हे वातशामक आहे. थंड पाणी प्यायल्यानंतर सांध्याच्या वेदना वाढतात, तर कोमट पाणी वेदना कमी करण्यास मदत करते. वातविकारांचा त्रास थंड पाणी प्यायल्यामुळे बळावतो, हे रुग्ण नेहमीच सांगतात.
९) गरम पाणी हे बस्ती म्हणजे मूत्राशयाची शुद्धी करते अर्थात मूत्रविसर्जन सुधारते व लघवी साफ होऊ लागते.
१०) स्थूलत्व आणि थंड पाण्याचा संबंध तर ढग आणि पाण्यासारखा आहे. ढगामध्ये जितके जास्त पाणी तितका ढग अधिक जड, त्याचप्रमाणे शरीरामध्ये जितके जास्त पाणी तितके शरीर अधिक जड व स्थूल. सहसा वजनदार शरीराच्या स्थूल व्यक्ती थंड पाणी पिणेच पसंत करतात. इतकंच नव्हे तर एखाद्या ग्लासने त्यांची तहान शमत नाही, निदान एक बाटली गार पाणी त्यांना प्यावे लागते. याच स्थूलांना कोमट पाणी प्यायची सवय लावली तर त्यांच्या शरीरावरील मेद कमी होण्यास साहाय्य होते. कारण चरबी घटवण्यामध्ये गरम पाणी औषधासारखे उपयोगी पडते.
कोमट पाण्याचाच फायदा
वरील सर्व विकाराच्या रुग्णांना त्या आजाराची लक्षणे सुरू होऊ नयेत म्हणून किंवा लक्षणे सुरू झाली असतील तर त्वरित नियंत्रणात यावी म्हणून कोष्ण (कोमट) पाणी पिण्याचा चांगला फायदा होताना दिसतो. एकंदरच कोमट पाणी हे विविध रोगांमध्ये एक उत्तम पथ्य आहे व आरोग्यासाठी हितकर आहे. थोडक्यात आरोग्य-सल्ला हाच की शक्यतो वर्षभर कोमट पाणी पिणे हितावह, त्यातही पावसाळ्यात तर कढवून आटवलेले असे कोमट पाणी प्यायले पाहिजे.