Grapes Manuka Ayurvedic Health Benefits औषधाविना उपचार – आंबा हा फळांचा राजा मानला जातो, पण आयुर्वेद शास्त्रकारांनी द्राक्षाला सर्व फळांत श्रेष्ठ मानले आहे. द्राक्ष हे मधुरच हवे, आयुर्वेदातील मधुर द्रव्यांच्या गणात त्याचे वर्णन आहे. पुढील सर्व गुणधर्म हे गोड द्राक्षाचेच आहेत. द्राक्षाच्या सुरुवातीच्या हंगामात द्राक्षे खाऊ नयेत. मार्चमध्ये थोडे ऊन पडू लागल्यावर द्राक्षांना खरी गोडी येते. ती खावी, त्यावेळेस महाग असली तरीही खावीत.
मनुकांची चटणी
द्राक्ष थोडेफार तुरट असले तरी चालेल. आंबट अजिबात नको. द्राक्ष थंड गुणाचे असून शुक्रवर्धक आहे. वजन वाढते. डोळ्यांना हितकारक आहे. लघवी व शौचास साफ व्हायला मदत करते. रक्तपित्त, तोंड कडू होणे, तहान, खोकला, दमा, कावीळ, छातीत दुखणे, जलोदर, थुंकीतून रक्त पडणे, क्षय, आवाज बसणे, मूतखडा, अरुची इत्यादी तक्रारींच्या निवारणार्थ द्राक्षांचा किंवा मनुकांचा उपयोग होतो. ताज्या द्राक्षांचा रस, शिरका, नुसती द्राक्षे, मनुका, मनुकांचे उकळून पाणी किंवा मनुकांची वाटून चटणी व मनुकांचा काढा इतक्या विविध प्रकारे द्राक्षे वापरता येतात.
मनुकांच्या सहापट ताजी द्राक्षे वापरावी. द्राक्षांचा रस पिण्यापेक्षा ताजी द्राक्षे खावीत. कारण कोणत्याही रसामध्ये हवेच्या त्वरित संपर्काने दोष निर्माण होतात. मनुका धुतल्याशिवाय वापरू नयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…तर मनुका वरदान

अग्निमांद्या, अजीर्ण, तोंडाला चव नसणे, अरुची या तक्रारींकरिता द्राक्षे मोजकीच खावीत. द्राक्षे नसली तरी मनुका व जिरे किंवा आले अशी चटणी खावी. जिभेला रुची येऊन भूक व पचन सुधारेल. विशेषत: चहा, सिगरेट, विडी, तंबाखू, अति जागरण किंवा मद्यपान यामुळे ज्यांची भूक नष्ट होते त्यांच्याकरिता मनुका वरदान आहेत. बिनबियाच्या मनुका खाऊ नयेत. गंधक द्रावात तयार केलेल्या नाशिक किंवा तासगावच्या स्वस्त मनुका खाऊ नयेत.

द्राक्षाचा कायाकल्प

थंडी संपता संपता किंचित ऊन पडायला लागले की त्या सिझनमधल्या द्राक्षांना परम गोडी असते. ज्यांना द्राक्षांचा ‘अनोखा कायाकल्प प्रयोग’ शरीराच्या टिकाऊ स्वास्थ्याकरिता करायचा आहे त्यांनी पुढीलप्रकारे द्राक्षायोग करावा. दिवसभरात भूक, तहान लागली की फक्त उत्तम दर्जाची गोड गोड द्राक्षे स्वच्छ धुऊन खावीत. दिवसभरात जेमतेम ८०० ग्रॅम द्राक्षे खाल्ली जातात असा माझा व माझ्या ‘गुरुकुल पुणे वर्गातील’ आयुर्वेदप्रेमी, हौशी विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. दिवसभर कितीही श्रम झाले तरी थकवा अजिबात येत नाही. वाचकहो, एक दिवस किमान फक्त द्राक्षावर राहूच बघाच. मग ‘द्राक्षा फलोत्तमा’ का म्हणतात हे तुम्हाला कळेल!

रक्तातील विषार कमी होतो

यकृताचे कार्य बिघडून जेव्हा कावीळ किंवा जलोदर विकार होतो. त्यावेळेस शौचास साफ होणे आवश्यक असते. त्याचबरोबर ताकद कमी होऊन किंवा पांडुता येऊन चालत नाही. त्याकरिता काळ्या मनुका रोज पन्नास ते शंभर नग किंवा ताजी गोड द्राक्षे दोनशे ग्रॅमपर्यंत खावीत. काविळीतील रक्तांतील विषार द्राक्षांमुळे कमी होतो. मलमूत्रप्रवृत्ति साफ होते.
अकाली केस पिकणे, गळणे, त्वचा रूक्ष होणे. तरुण वयात त्वचेवर सुरकुत्या येणे, दुबळेपणा, म्हातारपण लवकर आल्यासारखे वाटणे या तक्रारीवर द्राक्षांच्या हंगामात ताज्या द्राक्षांचा रस ग्लासभर किंवा बिया काढून शंभर मनुका फार फायद्याच्या होतात.

बालकांसाठी मनुका

यकृताच्या किंवा किडनीच्या कर्कविकारात अनुक्रमे यकृत व वृक्क यांना बल मिळणे आवश्यक असते. मलमूत्र साफ ठेवणाऱ्या या दोन यंत्रणेकरिता भरपूर मनुका किंवा ताजी द्राक्षे उपयुक्त आहेत. गोवर, कांजिण्या, घाम खूप येणे, चक्कर येणे या तक्रारीत वयपरत्वे कमी जास्त प्रमाणात मनुका नियमित खाव्या. विशेषत: बालकांना खूप औषधांपेक्षा गोड द्राक्षे किंवा मनुकांचे पाणी द्यावे.

उष्णतेच्या विकारांवर गुणकारी

जळवात, डोळ्यांचे विकार, तोंड येणे, नागीण, पित्तविकार, फिटस्, रक्तिमूळव्याध, निद्रानाश या विकारात पित्तामुळे होणारी उष्णता कमी करण्याकरिता मनुका, मनुकांचा काढा किंवा ताजी द्राक्षे दोन चार आठवडे नियमित घ्यावी. डोळ्याची भगभग, हातापायांची आग याकरिता द्राक्षांचा पेलाभर रस किंवा पंचवीस पन्नास मनुका पाण्यात उकळून ते पाणी घ्यावे.

एड्ससारख्या दुर्धर विकारांतही महत्त्वाची द्राक्षे

क्षय, स्वरभंग, आवाज बसणे, कोरडा खोकला या विकारात उष्ण औषधे चालत नाहीत. द्राक्षांचा किंवा मनुकांचा ओलावा, स्निग्धपणा व गोडवा यांचा उपयोग होतो. थुंकीतून रक्त पडणे थांबते, फुफ्फुसातील व्रण भरून येतो. घरगुती स्वरुपाचे द्राक्षांच्या रसात उकळून सिद्ध केलेले तूप हे राजयक्ष्मा विकारांकरिता उत्तम टॉनिक आहे. तीव्र मलावरोध, खडा होणे, भगंदर, मूळव्याध, गुदद्वाराचा संकोच, स्ट्राँग औषधांच्या सवयीचे दुष्परिणाम याकरिता पंधरा दिवस सतत दोनशे ग्रॅम द्राक्षे किंवा शंभर मनुका चावून खाव्या. पक्वाशयाचे कार्य खात्रीने सुधारते. एड्स या दुर्धर विकारात अनेक प्रयोगांप्रमाणे गोड द्राक्षे किंवा मनुकांचे प्रयोग करून पहावा.