How Many Steps To Walk After Eating: जेवणानंतर थेट अंथरुणावर पडू नये थोडं का होईना चालावं हा सल्ला अनेक आरोग्य तज्ज्ञ देतात. पण नेमकं किती चालावं हे माहीत असणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जेवल्यावर शतपावली करावी हा सल्ला आपणही ऐकून असाल पण ‘अति तिथे माती’ हा नियम या सल्ल्याला सुद्धा लागू होतो. अर्ली फूड्सच्या संस्थापक शालिनी संतोष कुमार, यांच्या एका पोस्टमध्ये सुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. त्या म्हणतात, “कोणतीच गोष्ट जास्त करू नका. मला अजूनही आठवतं की दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण झाल्यावर मी माझ्या ऑफिसमध्ये किंवा घरी असतानाही ३० मिनिटे चालायचे. हे केवळ थकवणारेच नव्हते तर आता माझ्या लक्षात आले आहे की अन्न देखील नीट पचले नाही कारण सर्व रक्त प्रवाह आणि ऊर्जा पोटावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पाय आणि हातांना दिली जाते.”
शालिनी यांनी आपल्या या अनुभवाविषयी आयुर्वेदिक सविस्तर माहिती मिळवली आणि त्यानुसार त्यांनी पोस्टमध्ये माहिती दिली की, “साधे वज्रासन किंवा १०० पावले चालणे पचनासाठी पुरेसे आहे. काहीजण कधी कधी तासभर चालतात. पण हा केवळ जागरूकतेचा अभाव आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा जेवणानंतर खेळायला किंवा जास्त उड्या मारायला देऊ नका. त्यांना वाटल्यास बैठे खेळ खेळायला द्या, लिहायला, वाचायला द्या, अगदी सोप्या व साध्या हालचाली करणे पुरेसे ठरेल.”
जेवल्यानंतर शंभरच पावले का चालावे?
शिल्लिम येथील ‘धारणा’ संस्थेचे आरोग्य संचालक डॉ अरुण पिल्लई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, ‘चरक संहिता’ सुत्रानुसार जेवणानंतर शतपावली १०० (शत) पावले (पावली) चालण्याची शिफारस केली जाते. पाश्चात्य जगातही ‘थर्मल वॉक’ म्हणून ही पद्धत प्रचलित आहे. आयुर्वेदात १०० हा क्रमांक महत्त्वाचा आहे कारण मानवी वय नेहमीच शतायु (१०० वर्षे) म्हणून मोजले जात होते. अन्नाच्या चयापचयासाठी जबाबदार असलेल्या जठारग्नीला सक्रिय करण्यासाठी १०० पावले चालणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा<< विकी कौशल कतरिनासाठी वापरतो ‘रिव्हर्स सायकोलॉजी’! तुमचा जोडीदारही ‘असा’ प्रयत्न करतो का, याला पर्याय काय?
डॉ पिल्लई यांच्या मते, जेवणानंतर थोडे चालल्याने पचन आणि मूड सुधारण्यास मदत होते, सूज येणे, जठराची सूज आणि ग्लुकोजची पातळी कमी होते तसेच अन्नातील पोषण सुद्धा शरीरात चांगल्या पद्धतीने शोषण्यास मदत होते. त्यामुळे पुढच्या वेळी जेवल्यावर चालताना फायदे, व योग्य पद्धत नक्की लक्षात घ्या.