Laughing Disease : असे म्हणतात की, हसणे एक टॉनिक आहे. हसल्यामुळे आपला तणाव कमी होतो आणि आपण खूप सकारात्मक असतो; पण तुम्हाला माहीत आहे का की, हसणे हा एखाद्या व्यक्तीसाठी आजारसुद्धा असू शकतो. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण हे खरेय. ‘बाहुबली’फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीला हा आजार आहे. तिने एका जुन्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ती म्हणाली होती, “जर मी हसायला सुरुवात केली, तर मी १५ ते २० मिनिटे थांबू शकत नाही. कॉमेडी सीन बघताना किंवा शूट करताना मी पोट धरून हसते. याच कारणामुळे शूटिग अनेकदा थांबविण्यात आली आहे.”
खरेच हसणे हा एक आजार असू शकतो का? जर हो, तर या आजारामागील कारणे कोणती? ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती दिली.
हसणे हा आजार नेमका काय आहे?
न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात, “हसण्याच्या आजाराला वैद्यकीय क्षेत्रात ‘स्युडोबुलबार अफेक्ट’ (pseudobulbar affect) म्हणतात. ज्या लोकांना हा आजार आहे त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे :
१. अचानक हसणे किंवा रडणे
२. हसणे किंवा रडणे हिंसक होऊ शकते आणि जवळपास १५-२० मिनिटे ते हसणे किंवा रडणे थांबवता येत नाही.
डॉ. सुधीर कुमार सांगतात, “अनेकदा हसण्यामागील कारण लहान असू शकते. या आजारामध्ये म्हणजेच भावनिक प्रतिसाद प्रमाणाबाहेर दिला जातो. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या लोकांना कदाचित ती गोष्ट मजेदार वाटणार नाही; पण हसण्याचा आजार असलेली व्यक्ती खूप जास्त हसत असेल, तर त्यांनाच त्यांच्या हसण्याविषयी लाजिरवाणे वाटू शकते.”
हेही वाचा : हेडफोन वापरताय? अलका याग्निक यांच्यासारखा तुम्हालाही होऊ शकतो हा गंभीर आजार? जाणून घ्या सविस्तर
ते पुढे सांगतात, “मोटार न्यूरॉन डिसीज (MND)/अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS), मल्टिपल स्क्लेरोसिस (MS), ब्रेन स्ट्रोक, ब्रेन ट्युमर किंवा मेंदूला गंभीर दुखापत इत्यादी प्रकारच्या मेंदूच्या आजारांमुळे ‘स्युडोबुलबार अफेक्ट’ होऊ शकतो.”
अनेकदा हसण्याच्या आजारामागील कारणे बदलत असतात किंवा काही प्रकरणांमध्ये मूळ कारण अज्ञात असते.
डॉ. कुमार सांगतात, “हसण्याचा आजार हा मानसिक आजाराचा भाग असू शकतो; पण पूर्णपणे नाही. स्युडोबुलबार अफेक्ट म्हणजेच हसण्याचा आजार हा नैराश्यासारख्या आजारामुळे ओळखणे अशक्य होते. या आजारामधील लक्षणे काही ठरावीक मिनिटांपर्यंतच व्यक्तीमध्ये दिसून येतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे हा मानसिक आजार मानला जात नाही; पण ही लक्षणे भावनिक असतात आणि त्यामागील कारणे मेंदू नीट कार्य करीत नसल्यामुळे दिसून येतात. त्यामुळे हा न्यूरोसायकियाट्रिक आजार मानला जातो.”
या आजारावर कोणते उपचार घ्यावेत?
डॉ. कुमार सांगतात –
दीर्घ, आरामदायी व मंद श्वास घ्यावा.
तुमचे मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवावे.
खांदा, मान व छातीच्या स्नायूंना आराम द्यावा.
या आजारावर उपचार करण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने ती औषधे आणि उपचार घ्यावेत.