Bad Cholesterol And Coffee: आपली जीवनशैली अनेकदा बदलत असते, एक ठराविक रुटीन फॉलो करणे हे सगळ्यात कठीण काम आहे. अनेकदा वेळेचं गणित चुकल्याने आपल्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वेळा बदलतात व हळूहळू एक आजार शरीरात घर करू लागतो. कामाच्या वेळी झोप येते व झोपण्याच्या वेळेस भूक लागते हे तुम्हीही अनुभवले असेल. अनेकजण अशावेळी चहा-कॉफीचे सेवन करून वेळ मारून नेतात. तुम्हाला माहित आहे का या कॉफीचं आणि तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं एक महत्त्वाचं नातं आहे. अलीकडे उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांचे प्रमाण झपाटयाने वाढत आहे. अशावेळी कॉफीचे सेवन कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी फायद्याचे आहे की नुकसानाचे हा प्रश्न आज आपण सोडवणार आहोत.
पोषणतज्ञ डॉ रोहिणी पाटील यांच्या माहितीनुसार, कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये आढळतो. आपल्या शरीराला इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन, व्हिटॅमिन डी सारखे हार्मोन्स तयार करण्यासाठीकोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते आणि ते अन्न पचण्यास देखील मदत करते. अंड्यातील पिवळ बलक, मांस आणि चीज यांसारख्या प्राण्यांकडून येणाऱ्या अन्नात कोलेस्टेरॉल असते. कोलेस्ट्रॉल आपल्यासाठी वाईट नाही पण त्याचे प्रमाण हाताबाहेर गेल्यास मात्र चिंता वाढू शकते.
कॉफीचा कोलेस्ट्रॉलवर परिणाम होतो का?
कॅफीन शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी थेट वाढवत नसले तरी त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्यास हातभार लागू शकतो. कॅफिनमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे कोर्टिसोलची व परिणामी कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. याव्यतिरिक्त, कॅफीनमुळे इन्सुलिनच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून एचडीएल (चांगले) कोलेस्टेरॉलचे कमी होते.
हे ही वाचा<< ‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? ब्लड शुगरवरही रामबाण, पाहा कसं करावं सेवन
‘या’ पद्धतीने कॉफी बनवल्यास कोलेस्ट्रॉलचा धोका होतो कमी
भाटिया हॉस्पिटल मुंबईचे सल्लागार डॉ सम्राट शाह यांच्या मते, कॉफीमुळे एखाद्या व्यक्तीच्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. खरं तर कॉफी बीनमधील कॅफिन हे कोलेस्टेरॉलवर परिणाम करणारे नसून त्यात नैसर्गिकरित्या आढळणारे तेल खरे कारण असते. कॅफेस्टोल आणि काहवेल खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. फिल्टर न केलेल्या कॉफी आणि फ्रेंच प्रेस कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. पण इन्स्टंट कॉफी आणि फिल्टर कॉफीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी असते.
हे ही वाचा<< चेहऱ्यावरून ओळखा शरीरात कोलेस्ट्रॉल कमी आहे की जास्त? शरीराचे ‘हे’ संकेत ओळखा; करा ‘हे’ ५ उपाय
दिवसाला किती कप कॉफी प्यावी?
बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, फ्रेंच प्रेस ब्रूइंग पद्धतीने चार आठवड्यांपर्यंत ५ कप कॉफी/ प्रति दिवस प्यायल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी ६ ते ८ टक्क्यांनी वाढू शकते. दिवसातून १-२ कप कॉफी प्यायल्यास धोका कमी होतो.