तुम्ही वजन वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, तसेच फिट राहण्यासाठी व्यायामशाळेत जाता आणि तिथे प्रशिक्षक तुम्हाला वेळोवेळी कोणता व्यायाम करायचा, तो व्यायाम कोणत्या उपकरणांवर कशा पद्धतीने करायचा, त्यादरम्यान कोणत्या पदार्थांचे सेवन करायचे याचा सल्ला देत असतात. अनेक जण सकाळी, तर काही जण संध्याकाळी व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करतात. पण, तुम्ही व्यायामशाळेत जाण्यापूर्वी योग्य पदार्थ किंवा पेयाचे सेवन करता का हेसुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखातून व्यायामशाळेत जाण्यापूर्वी कोणत्या पेयाचे सेवन केले पाहिजे आणि त्याचे आरोग्यसाठी काय फायदे आहेत हे पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही संध्याकाळी व्यायामशाळेत जाण्यापूर्वी (प्री-जिम) कॉफीचे सेवन करीत असाल, तर तुम्ही अत्यंत चुकीचे वागत आहात. तज्ज्ञांच्या मते, एक कप कॉफी जरी तुम्हाला ऊर्जा देत असली तरी त्याचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणामही होतो. एफआयटीटीआर (FITTR) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, रात्री ११ वाजेपर्यंत जर तुम्ही झोपत असाल, तर दुपारी ३ नंतर तुम्ही कॉफीचे सेवन टाळले पाहिजे. कारण- कॅफिन शरीरात आठ तास टिकून राहते; ज्यामुळे नकळत तुमच्या झोपेवर याचा परिणाम होऊ शकतो.

तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग संध्याकाळी व्यायामशाळेत जाण्यापूर्वी कॉफीव्यतिरिक्त कशाचे सेवन करायचे? तर एफआयटीटीआरच्या व्हिडीओनुसार, एखादी व्यक्ती बदल म्हणून कॉफीऐवजी बीटाच्या रसाचे सेवन करू शकते. बीटाच्या रसामध्ये नैसर्गिक नायट्रिक असते; जे कॅफिनप्रमाणेच पॉवर बूस्टरसारखे कार्य करते. तसेच तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत नाही. त्यामुळे बीटरूट ज्युस हे तुम्हाला उर्जा वाढविण्यासाठी आवश्यक ठरणारे एक अमृत आहे.

हेही वाचा…सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो

याचसंबंधित द इंडियन एक्स्प्रेसने पोषणतज्ज्ञ, होलिस्टिक वेलनेस कोच आणि ईट क्लीन विथच्या संस्थापक एशांक वाही यांच्याशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी बीटाच्या रसाद्वारे शारीरिक कार्यक्षमता आणि सहनशक्ती वाढविण्याच्या फायद्यांवर लक्ष केंद्रित केले. कॉफी एकाग्रता वाढवू शकते; पण कॉफीच्या सेवनाने लघवीचे प्रमाणदेखील वाढू शकते. त्याशिवाय कॉफीमधील कॅफिन जरी मध्यम प्रमाणात फायदेशीर असले तरीही ते हृदयाची गती आणि अस्वस्थता वाढवू शकते; ज्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते, असे एशांक वाही यांनी स्पष्ट केले.

तर पुढे त्यांनी सांगितले की, बीटाचा रस नायट्रेट्सचे एक पॉवरहाऊस आहे. नायट्रिक घटक पोटात गेल्यावर त्याचे नायट्रिक ऑक्साइडमधे परिवर्तन होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया शरीराच्या स्नायूंना मजबूत बनवते, तुमच्या स्नायूंमधील रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे जास्त वेळ किंवा त्रासदायक वर्कआउट्ससुद्धा तुम्ही अगदी सहज करू शकता.

बीटरूटचा रस कसा बनवायचा?

एक बीट स्वछ धुऊन घ्या आणि ते सोलून घ्या. त्यानंतर त्याचे लहान तुकडे करा आणि अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालेला रस गाळून घ्या. चव आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी तुम्ही यात आल्याचा एक छोटा तुकडा किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता, असे एशांक वाही यांनी सांगितले आहे.

बीटाच्या रसाचे सेवन करण्याची उत्तम वेळ कोणती?

व्यायामापूर्वी सुमारे दोन ते तीन तास आधी बीटाच्या रसाचे सेवन करा. कारण- त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात. तसेच हे तुमच्या स्नायूंचे दुखणेदेखील कमी करते. तसेच केवळ व्यायामापूर्वीच नाही, तर दीर्घकालीन आरोग्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे, असे एशांक वाही यांनी सांगितले आहे.

… कॉफी वाईट आहे का?

बीटाचा रस शारीरिक ऊर्जा जास्तीत जास्त वाढवू पाहणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याचा अर्थ असा नाही की, कॉफीला निरोगी जीवनशैलीत स्थान नाही. पण, खेळाडू किंवा फिटनेससाठी जागरूक व्यक्तींच्या विशिष्ट गरजांसाठी बीटाचा रस हा एक उपाय ठरेल, असे एशांक वाही यांचे म्हणणे आहे. आज आपण या लेखातून व्यायामापूर्वी बीटाच्या रसाचे सेवन का करायचे ते समजून घेतले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before going for evening gym beetroot juice or coffee which drink is better for your health read what experts said asp