Benefits Of Eating Jamun: काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी एक म्हण आहे, तुम्हीही कदाचित ऐकून असाल. याचा साधा सोपा अर्थ आपल्या जवळच काही सर्वोत्तम गोष्टी असतात पण आपण त्याचा शोध घेण्यासाठी उगाच अन्य पर्याय तपासत राहतो. अशीच काहीशी स्थिती अनेक पदार्थांविषयी आहे. आपण सगळेच ब्लूबेरीला अनेकदा कमी कॅलरीज युक्त अँटिऑक्सिडंट्सचा राजा म्हणून गौरवतो पण त्यापेक्षा खूप स्वस्त व सहज उपलब्ध असणारा जांभूळ नेहमी दुर्लक्षित राहतो. खरं पाहायला गेलं तर दोन्ही फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, पण तरीही जांभळातील अँथोसायनिन्सचे प्रमाण अधिक असल्याने फायद्याच्या बाबत जांभूळ अधिक उत्तम ठरतो. जांभूळ पेशींच्या नुकसानाचे प्रमाण कमी करतो. आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेससाठी लिहिलेल्या लेखात सांगितलेले जांभूळ फळाचे फायदे पाहणार आहोत. जे वाचल्यावर कदाचित आपण सुद्धा ब्लूबेरी किंवा अन्य फळांच्या तुलनेत जांभूळ खाण्यास प्राधान्य द्याल.
जांभूळ खाण्याचे फायदे
फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स: जांभूळ या फळामध्ये ब्लूबेरीच्या तुलनेत जास्त फायबर असते ज्यामुळे मधुमेहींसाठी जांभळाचे सेवन हा उत्तम पर्याय ठरतो. यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरले असल्याची जाणीव होते. तसेच यामुळे रक्तप्रवाहात साखरेचे उत्सर्जन कमी होते. आतड्यांमध्ये पोषणाचे शोषण होण्यासाठी सुद्धा हे फळ कामी येते. जांभुळामध्ये अँथोसायनिन्स, इलाजिक ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्ससह विविध बायोएक्टिव्ह संयुगे असतात, ज्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ही संयुगे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात, जे इन्सुलिन उत्पादनासाठी जबाबदार असतात.
याव्यतिरिक्त, जांभूळ फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, याचा अर्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर तुलनेने किरकोळ प्रभाव पडतो. आतापर्यंतच्या काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की जांभूळ मधुमेहाच्या लक्षणांवर जसे की जास्त लघवी होणे यावर नियंत्रण ठेवू शकतो. मधुमेहाच्या पूर्व अवस्थेत असलेल्यांसाठी सुद्धा हे फळ चांगले असते.
जीवनसत्त्वे आणि खनिजे: जांभूळ फळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. ब्लूबेरी हे व्हिटॅमिन के, मँगनीजचे समृद्ध स्त्रोत आहेत परंतु त्यामध्ये व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात आहे. जांभळात असणारी संयुगे कोलेस्टेरॉल जमा होण्याचे प्रमाण कमी करते.
जांभूळ खाण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
जांभळामध्ये केवळ नैसर्गिक साखर असली तरी ती सुद्धा साखरच आहे हे लक्षात घ्यायला हवे. कार्बोहायड्रेट्ससह जोडून जांभळाचे सेवन माफक प्रमाणात करायला हवे. जेवणाच्या वेळी तुम्ही चवीसाठी जोडीला जांभूळ खाऊ शकता. फ्रुट सॅलेड किंवा कोशिंबिरीत घालून सुद्धा तुम्ही जांभूळ खाऊ शकता. तुम्ही फळांची प्युरी करून पाण्यात मिसळून तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकता, सुक्यामेव्यासह किंवा योगर्टसह मिसळून तुम्ही स्मूदी करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जांभळाचे सेवन हे जेवणापूर्वी किंवा दरम्यान करावे. जेवणावर शक्यतो जांभूळ खाणे टाळावे. मधुमेह असल्यास रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करायला हवे.