भारतीय आहारात टोमॅटोला महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा लाल भडक रंग आणि आंबट गोड चवीमुळे तो विविध भाज्या, सलाडसह अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. टोमॅटोपासून स्पेशल सूप, सार, चटणी असे पदार्थदेखील बनवता येतात. त्यामुळे बाजारातील लालबुंद, चमकदार टोमॅटो कितीही महाग झाले तरी लोक खरेदी करतात. भाजी, आमटीची चव वाढवणारे हे रसाळ टोमॅटो एक पौष्टिक पदार्थ म्हणून काम करतात, शिवाय त्याचा तुमच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. पण आहारात रोज टोमॅटोचा वापर केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. याविषयी हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. के. सोमनाथ गुप्ता म्हणाले की, टोमॅटो जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने त्याचा तुमच्या शरीरावर विविध परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. टोमॅटोमध्ये लायकोपिन सारख्या अँटीऑक्सिडंटची असलेली उच्च पातळी तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरू शकते.
हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटलचे फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. रंगा संतोष कुमार यांनी नमूद केले की, टोमॅटोमध्ये लायकोपिन आणि β-कॅरोटिन हे दोन महत्त्वाचे कॅरोटिनॉइड्स आढळतात, जे शरीरात कॅन्सरविरोधी गुणधर्म प्रदान करण्यास मदत करतात. टोमॅटो प्युरी आतड्याच्या मायक्रोबायोमचे आरोग्य राखण्यास, दाहकता कमी करण्यास आणि आतड्यांचे संरक्षण करण्यात मदत करते.
टोमॅटो हे व्हिटॅमिन सी आणि के तसेच पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. यातील व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यास योग्य पोषक तत्वे प्रदान करते, तर व्हिटॅमिन-के रक्त गोठणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पोटॅशियम रक्तदाब आणि शरीरातील द्रवाची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, असेही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले. टोमॅटोत कॅलरी कमी आणि पाण्याचे जास्त प्रमाण असल्याने त्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते, टोमॅटोमधील फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे तुम्ही कमी कॅलरीजचे सेवन करू शकता, असे डॉ गुप्ता म्हणाले.
कांद्याच्या पातीचे डॉक्टरांनी सांगितले ‘हे’ आश्चर्यकारक फायदे! खाणाऱ्यांनी एकदा वाचाच…
टोमॅटो खाण्याचे तोटे
टोमॅटो खाण्याचे जितके फायदे आहेत, त्याप्रमाणे काही तोटेही आहेत. विविध गुणधर्मांनी समृद्ध असलेला टोमॅटो आरोग्यासाठी काहीप्रमाणात हानिकारक देखील ठरु शकतात.
१) टोमॅटोतील अम्लीय घटकामुळे काही लोकांच्या त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात किंवा ऍसिड रिफ्लक्स सारख्या परिस्थितीची लक्षणे वाढू शकतात.
२) पोषणासंबंधीत समस्या वाढू शकतात.
३) लघवीच्या समस्या, मायग्रेन, ग्लायकोआल्कलॉइड्सशी संबंधित शारीरिक वेदना, अॅनाफिलेक्टिक रिअॅक्शन, लाइकोपेनोडर्मियाचा त्रास होऊ शकतो.
‘या’ लोकांनी जास्त टोमॅटो खाणे टाळावे
मूतखडा, संधिवात, आमवात, आम्लपित्त असलेल्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळावे. टोमॅटोमधील ऑक्सॅलेट्स घटकामुळे मूतखड्याचा त्रास वाढतो, असेही डॉ गुप्ता यांनी नमूद केले.