Benefits of Eating Ginger: आल्याचा वापर चहापासून भाज्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. चहा, भाज्या, कढी आणि वरणामध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचा समावेश केला जातो. आले फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही, तर ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. आले झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आले हे सर्वांत उपयुक्त मानले जाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, हे तुम्हाला माहीत आहे का, हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी या विषयावर माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण सविस्तर जाणून घेऊ…
आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी सांगितल्यानुसार, “भारतीय आयुर्वेदात अद्रक म्हणजेच आले हे औषधी घटकांचा खजिना मानले जाते. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करणारे बहुतेक लोक त्यांच्या जेवणात आले वापरतातच. आल्याचा वापर फक्त चहा आणि काढा बनविण्यापुरता मर्यादित नाही, तर तुम्ही अनेक गंभीर आजारांवरही याचा वापर करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे सेवन केल्याने पचनास मदत होते, मळमळ कमी होते, रक्त परिसंचरण सुधारते आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे दिवसाची सुरुवात करण्यासाठी नैसर्गिक ऊर्जादेखील मिळते.” आले खाण्याचे काही फायदे जाणून घेऊ या.
(हे ही वाचा : रोज उन्हाळ्यात मूठभर सुका मेवा सेवनाने तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? सेवनापूर्वी वाचाच डाॅक्टरांचा सल्ला…)
आल्याच्या नियमित सेवनामुळे आरोग्यदायी फायदे
डॉ. सुषमा स्पष्ट करतात की, रिकाम्या पोटी आल्याचे नियमित सेवन केल्याने जळजळ कमी होण्यास, सूज येणे व गॅस यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यांपासून आराम मिळण्यास, पोषक घटकांचे शोषण वाढविण्यात आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. “त्याव्यतिरिक्त, त्याचे अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म संपूर्ण आरोग्यास समर्थन देऊ शकतात आणि जुनाट आजारांचा धोका कमी करू शकतात.”
आल्यामध्ये व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात असते. आले हृदयरोग, तसेच हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन केचा चांगला स्रोत म्हटले जाते. दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आले खाणे फायदेशीर ठरते. आले खाल्ल्याने रक्तात गुठळ्या होत नाहीत आणि रक्तप्रवाह सुधारतो.
आल्याचा अतिवापर केल्याने काय दुष्परिणाम होतात?
हे लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हेच आल्याचा बाबतीतही लागू होते. आले बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असले तरी रिकाम्या पोटी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने जठरांत्रीय अस्वस्थता जसे की छातीत जळजळ, गॅस किंवा अतिसार होऊ शकतो. जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या उदभवू शकतात. कारण- आल्याचा परिणाम थेट हृदयाच्या ठोक्यांवर होतो, असेही डॉ. सुषमा नमूद करतात.