Breast Cancer : कर्करोग हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. हल्ली तरुणांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्वच वयोगटात कर्करोग आढळून येतो. महिलांमध्ये तर स्तनाचा कर्करोग दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतासह जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका अभ्यासानुसार जागतिक पातळीवर स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे २०३० पर्यंत ३० दशलक्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काही पुराव्यांवरून असे समजून येते की स्तनाचा कर्करोगाचा धोका हा व्यक्तीच्या आहार, वजन आणि शारीरिक हालचालीवर अवलंबून असू शकतो.
कर्करोगाची वाढ जर तुमच्या आहाराच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल तर पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता. जर तुम्हाला आधीच स्तनाचा कर्करोग असेल तर निरोगी आहारामुळे तुम्ही त्यातून बरे सुद्धा होऊ शकता.
आहारतज्ज्ञ गरीमा गोयल यांनी स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी काही चुकीच्या खाण्याच्या सवयी बदलण्यास सांगितले आणि पौष्टिक व निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.
पौष्टिक आहार घ्या
जेवणात भरपूर हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. पौष्टिक आहार घ्यावा.भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे उत्तम स्त्रोत आहेत. जे लोक आहारामध्ये फळे आणि भाज्या घेतात, त्या व्यक्तीच्या शरीरात इस्ट्रोजनची पातळी कमी दिसून येते. बेरीसारख्या फळांमध्ये भरपूर फायटोकेमिकल्स असतात जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात ज्यामुळे कर्करोगाची वाढ कमी होते.
सोयापासून बनवलेले पदार्थ
इस्ट्रोजनची उच्च पातळी आणि महिला रिप्रोडक्टीव्ह हार्मोनचा थेट संबंध स्तनाच्या कर्करोगाशी येतो. सोयामध्ये आयसोफ्लाव्होन (isoflavones) असतात जे आतड्यातील इस्ट्रोजन रिसेप्टरला बांधून ठेवतात ज्यामुळे इस्ट्रोजन पातळी कमी होते. सोयासह टोफू, सोया दूध, सोयाबीन सुद्धा इस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
फॅटयुक्त आहार
ओमेगा ३ फॅटी अॅसिड छातीमध्ये होणारी जळजळ आणि दीर्घकाळ आजारांचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. दोन्ही फॅटी अॅसिड फायदेशीर आहे.
सॅल्मन आणि मॅकरेल मासे ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. लाल मांस, अंडी, कोंबडी आणि शुद्ध तेलांमध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिड दिसून येते. ओमेगा -३ फॅटी अॅसिडचा स्त्रोत वाढवणे आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिडचे सेवन कमी केल्याने चांगला परिणाम होऊ शकतो आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
प्रोटिनयुक्त आहार
अंडी, कोंबडी, बिन्स आणि शेंगा हा प्रोटिन्सचा चांगला स्त्रोत आहेत .स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी तुम्ही याचा नियमित आहारात समावेश करू शकता.