बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण मधुमेहाच्या आजाराला बळी पडत आहेत. यासाठी व्यायाम, आहार अशा सर्वच गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. यामुळे ते लगेच आजारी पडण्याची शक्यता वाढते. आजरांपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ कितीही प्रमाणात खाता येत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहील आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल असे कोणते पदार्थ आहेत जाणून घ्या.
मधुमेह रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ
लिंबूवर्गीय फळं (सिट्रस फ्रुट्स)
द्राक्ष, संत्री, लिंबू अशा लिंबूवर्गीय फळांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. विटामिन सी पांढऱ्या पेशींचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या फळांचा रस प्यायल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे रस पिण्याऐवजी फळं खावीत.
कवच असणारी फळं, बिया
कवच असणाऱ्या फळांमध्ये आणि काही बियांमध्ये विटामिन इ भरपूर प्रमाणात आढळते. ‘विटामिन इ’सह यातील इतर पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बदाम, हेझलनट्स, ब्राझील नट, सूर्यफूलाच्या बिया अशा कवच असणाऱ्या फळांचा व बियांचा समावेश करा.
आणखी वाचा: आता मधुमेहापासून होणार कायमची सुटका? बाबा रामदेव यांनी सांगितलेला असरदार उपाय जाणून घ्या
लसूण आणि आले
लसूण आणि आल्याचा भारतीय पदार्थांमध्ये सर्रास वापर केला जातो. यामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात. तसेच यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)