Yoga For Belly Fat: सध्याच्या घडीला वजन वाढणे आणि त्यात बेली फॅट ही बहुतांश लोकांची समस्या बनलेली आहे. बेली फॅट म्हणजेच पोटाची चरबी. सुस्त जीवनशैली आणि चुकीचा आहार ही पोटावरील चरबी अन् वजन वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. वजनवाढ आणि लठ्ठपणा ही सध्याची सर्वांत मोठी समस्या होतेय. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं डायटिंग करतात किंवा तासन् तास जिममध्ये घाम गाळतात; परंतु तरीही वजन कमी होत नाही. याचे कारण म्हणजे आहाराकडे योग्य तसे लक्ष न देणे आणि व्यायाम न करणे हे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली पाहिजे. पण, आहाराबरोबरच सुटलेले पोट कमी करण्यासाठी व्यायामही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्हाला पोटाची चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज योगासने करणे गरजेचे आहे. अनेक लोक कठोर परिश्रम न करता, पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतात. जंक फूडसोबत कोल्ड्रिंक या गोष्टींचे सेवन करणे टाळले पाहिजे. खरे तर आपल्या अशा काही सवयी आहेत की, ज्या पोटाची चरबी वाढवण्याचे काम कतात. या सवयींमुळेच पोट सुटते. या चुकीच्या सवयी बदलायला हव्यात.

वाढलेल्या वजनामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यांसारखे आजार होऊ शकतात. आकर्षक आणि सपाट पोट मिळविण्यासाठी पोटाची चरबी संपूर्णत: कमी करणे महत्त्वाचे असते. वाढलेले पोट कमी करण्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम केला, तर या समस्या उद्भवणार नाहीत. त्यासाठी योगा तज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी काही सोपी योगासने सांगितली आहेत. याबाबतचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चला तर मग ही आसने कोणती आहेत ते जाणून घेऊ.

(हे ही वाचा : प्रसिद्ध बॉडी बिल्डरचा वर्कआउटनंतर जिममध्ये स्टीम बाथ घेताना मृत्यू; डिहायड्रेशनमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक? वाचा डॉक्टरांचे मत )

१. पर्वतासन

हे आसन शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. पर्वतासन केल्याने हातांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो. पर्वतासन दोन प्रकारे केले जाते. पहिल्या आसनात बसणे; तर दुसऱ्या आसनात खाली तोंड करून श्वास घेतल्यासारखे दिसते. हे शरीर उलटे फिरवण्यासारखे आहे. त्यामुळे संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह गतिमान होतो. सर्व वयोगटांतील लोकांना योगाची सवय लागावी यासाठी पर्वतासन हे फायदेशीर मानले जाते. या आसनामुळे पोटावर ताण येतो; ज्यामुळे पचनाचे विकार दूर होतात आणि पोटाची वाढलेली चरबीही कमी होण्यास मदत होते. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे आसन तुम्हाला फायद्याचे ठरू शकते, असे योगा तज्ज्ञ सांगतात.

२. अष्टांग नमस्कार योग

अष्टांग नमस्कार योगासन करताना शरीराचे एकूण आठ भाग जमिनीला स्पर्श करतात. म्हणूनच या आसनाला ‘अष्टांग’ किंवा ‘आठ अंगांनी केलेला नमस्कार’, असे म्हणतात. त्यामध्ये हनुवटी, छाती, दोन्ही हात, गुडघे व दोन बोटे जमिनीला टेकवून नमस्कार स्थितीत राहतो. हे आसन संतुलन राखण्यास, मुद्रा सुधारण्यास आणि हातांसह मुख्य स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. या आसनाचा नियमित सराव केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच तुमचे शरीर योग्य आकारात दिसते. हे आसन केल्याने छातीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरू शकते, असेही योगा तज्ज्ञांनी नमूद केले.

नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. योगासने ही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असून, त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तेव्हा पोटाची चरबी कमी करण्यासाठी वरील आसने नियमित केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो, असेही योगा तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best yoga asanas to say goodbye to belly fat this asana is known to be highly beneficial for reducing belly fat pdb