Heart Attack in Young Adults : प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि चित्रपट निर्माता सुदीप पांडे (Actor Sudip Pandey Death) याचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्याची प्राणज्योत मालवली. सुदीप पांडे याच्या निधनाची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली. पण, या धक्कादायक घटनेमुळे भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांच्या वाढत्या संख्येबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना वसंत कुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पूर्णेश्वर कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हृदयविकारचा झटका येण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक गोष्ट आहे. पण, हा आजार हल्ली सामान्य होत आहे. विशेषत: ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान, डॉ. कुमार यांनी तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक का आहे याविषयीच्या तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
तरुणांना हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी काय काळजी घेण्याची गरज आहे?
व्यायामाचा अभाव, वेळीअवेळी बाहेरचं खाणं, खूप ताणतणाव यांसारख्या खराब जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतोय. यात वाढता लठ्ठपणा हे देखील प्रमुख चिंताजनक कारण आहे. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या निर्माण होतात. धूम्रपान, अति मद्यपान आणि व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
कमी झोप आणि जंक फूडच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडते आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. यासह अभ्यास, नोकरी, व्यवसाय करत असताना अनेक जण ताणतणावाचा सामना करतात, ज्यामुळे शरीरात रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी तरुणांनी लवकरात लवकर निरोगी जीवनशैली अंगिकारली पाहिजे. हृदयाचे रक्षण करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले पाहिजे.
तरुण असुरक्षित का आहेत?
हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या पूर्वी वृद्ध, वयस्कर लोकांमध्ये दिसून येत होती. परंतु आता २०, ३० आणि ४० वयोगटातील लोकांमध्येही ही समस्या जाणवत आहे. हाय कोलेस्ट्रॉल, धमन्यांचे आजार एकेकाळी वृद्ध लोकांना होत होते. पण, आता तरुणांमध्येही हे आजार बळावत आहेत. विशेषत: हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही तरुणांमध्ये अधिक आहे. पण, हृदयासंबंधित आजाराची लक्षणं काळानुसार बदलताना दिसतायत.
हृदय विकारामागे बैठी जीवनशैली, फास्ट फूडचे सेवन आणि व्यायामाचा अभाव ही तीन मुख्य कारणं आहेत. तासनतास मोबाइल, टीव्हीवर राहिल्यानेही ताणतणावाची समस्या वाढते. तसेच धूम्रपान आणि वेपिंगसारख्या हानिकारक सवयींमुळे हृदविकाराचा धोका वाढतो. याशिवाय आनुवंशिक पूर्वस्थिती, जसे की, कुटुंबात आई-वडील किंवा त्या आधीच्या पिढीत हृदयविकारासंबंधित काही त्रास असेल तर तुम्हालाही तो जाणवू शकतो. कौटुंबिक हायपर कोलेस्ट्रोलेमियासारख्या स्थितीमुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याव्यतिरिक्त, निदान न झालेल्या आरोग्य समस्यांमुळेही जोखीम वाढू शकते.
हृदयविकाराच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी, व्यायाम, निरोगी आहार आणि तणाव व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जीवनशैलीतील महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे.
कामाच्या ताणाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
कामाचा ताण वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. उच्च तणाव पातळी ॲड्रेनालाईन आणि कोर्टिसोलसारख्या हार्मोन्सला चालना देतात, यामुळे हृदयाची गती वाढते, शिवाय रक्तदाब वाढतो. प्रदीर्घ शारीरिक ताणामुळे रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते. प्लेक तयार होण्यास प्रोत्साहन मिळते आणि शेवटी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
तणावाची समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे वाढते. या समस्येवर लोक वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. जसे की, तणावात असताना लोक धूम्रपान, मद्यपान करतात. काही जण वेळी अवेळी खूप खातात, खराब जीवनशैली अवलंबतात; या सर्व गोष्टींमुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते. या सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
अशावेळी तणाव व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी संतुलित निरोगी जीवनशैली फॉलो करणे गरजेचे आहे.
(टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि / किंवा तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. परंतु, आहाराच्या बाबतीत किंवा आरोग्यासंदर्भात कोणताही बदल सुरू करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घ्या.)