Big Bang Theory Actress Gets Cancer Without Smoking: बिग बँग थिअरी या प्रसिद्ध सिटकॉममधील अभिनेत्री केट मिकुची, हिला ४३ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. केट हिने याबाबत टिकटॉकवर माहिती दिली, विशेष म्हणजे तिने सांगितले की तिने आजवर कधीच धूम्रपान केलेले नाही. विना धूम्रपान फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे हे प्रकरण पाहता आरोग्याबाबत नव्याने चिंता वाढली आहे. मागील काही काळात सुद्धा अनेक प्रौढ स्त्री- पुरुषांमध्ये या आजराचे लक्षण आढळून आले होते, यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी किती लवकर तपासणी करावी याबद्दलही अनेकांना प्रश्न पडला आहे. याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. राजेश मिस्त्री, संचालक, ऑन्कोलॉजी, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी इंडियन एक्सस्पेसला दिलेल्या माहितीनुसार, अनेक दशकांपासून फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांचा मागोवा घेत असताना असे दिसून आले की, ६५ टक्के रुग्ण हे तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करणारे होते तर ३५ टक्के रुग्ण यातील काहीच करत नव्हते. मात्र तरीही या ३५ टक्क्यातील व्यक्तींना जोखीम शून्य आहे असे सांगता येणार नाही. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने देखील असे म्हटले आहे की पाचपैकी एक प्रकरण अशा लोकांमध्ये घडते ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही किंवा ज्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात १०० पेक्षा कमी सिगारेट ओढल्या आहेत.

धूम्रपान वगळता, सर्वात मोठे जोखीम घटक कोणते आहेत?

डॉ. मिस्त्री म्हणतात की, “वातावरणातील कणांवर बरीच कार्सिनोजेन्स तरंगत असतात. एक काळ असा होता जेव्हा लोक सेकंड हॅन्ड स्मोक, म्हणजेच धूम्रपान करत असताना त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याने शरीरावर होणारा परिणाम भीषण आहे अशी चर्चा होती. यानुसार मागील काही काळापासून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी घातली गेली. पण खरंतर धोका हा पर्यावरणीय प्रदूषकांपासून सुद्धा तितकाच आहे. गाडीच्या डिझेलचा धूर असो किंवा बेंझिन, आर्सेनिक, सिलिका, यांसारखे इतर कार्सिनोजेन्स, एस्बेस्टोस आणि रेडॉन किंवा अन्य कोणताही अदृश्य, किरणोत्सर्गी वायू जो नैसर्गिकरित्या खडक, माती आणि पाण्यातून बाहेर पडतो आणि हवेत तयार होतो, हे सर्व घटक कर्करोगाला खतपाणी घालतात.

डॉ मिस्त्री स्पष्ट करतात की, फुफ्फुसाचा कर्करोग होण्यासाठी वायू प्रदूषकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण, श्रेणी आणि कालावधी आणि व्यक्तीची अनुवांशिक पार्श्वभूमी तितकीच महत्त्वाची आहे.

“कोणाला कर्करोग होण्याची शक्यता आहे हे आपण ठरवू शकत नाही. कोविड नंतर छातीचा सीटी स्कॅन करून घेण्याचे प्रमाण वाढल्याने या आजराचे रुग्ण अधिक समोर आले आहेत. डॉ मिस्त्री म्हणतात, “फुफ्फुसाचा कर्करोग हा सुरुवातीच्या टप्प्यात शांत आणि लक्षणे नसलेला असतो आणि दुर्दैवाने सतत खोकला, छातीत दुखणे, दम लागणे किंवा थुंकीत रक्त येणे यासारखी लक्षणे नंतरच्या टप्प्यात दिसून येतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही इतर शरीराचे स्कॅन करत नाही, तोपर्यंत सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे शोधणे शक्य नाही.” मिकुकीच्या बाबतीतही, तिच्या रक्त तपासणीच्या परिणामांमागील कारणे शोधण्यासाठी डॉक्टरांनी तिच्या हृदयाचे स्कॅन केले तेव्हा तिच्या फुफ्फुसावर एक स्पॉट आढळला होता.

हे ही वाचा<< संत्री खाल्ल्याने सर्दी बरी होते? ‘व्हिटॅमिन सी’मुळे सर्दी पडसे झटपट थांबते का, तज्ज्ञांनी सांगितला गोळ्यांचा पर्याय

धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान कसे करता येईल?

डॉ मिस्त्री यांच्या म्हणण्यानुसार, स्क्रीनिंग फक्त उच्च जोखीम असलेल्या गटांना आणि धूम्रपान करणाऱ्यांना लागू होते. म्हणूनच दीर्घकाळापर्यंत छातीत अस्वस्थता, सतत खोकला किंवा थुंकीत रक्त येण्याकडे दुर्लक्ष करू नका. मी असे म्हणत नाही की ही लक्षणे इतर परिस्थितींमुळे उद्भवू शकत नाहीत परंतु शक्यता नाकारण्यासाठी तपासणी करा. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेची शिफारस केवळ लवकर निदान झाल्यास केली जाते. एकदा कॅन्सर छातीच्या बाहेर पसरला की त्याला पर्याय मानला जात नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big bang theory actress gets lungs cancer without smoking which signs to look out to avoid cancer cough shows cancer or not svs
Show comments