Himanshi Khurana : पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री हिमांशी खुराना बिग बॉस १३
मध्ये दिसल्यानंतर चांगलीच प्रकाशझोतात आली होती. एबीपी लाइव्हच्या हेल्थ कॉन्क्लेव्ह पंजाब २०२४ मध्ये बोलताना तिने तिच्या फिटनेसविषयी सांगितले. वजन कमी करताना आहार कसा फायदेशीर आहे, याविषयी सांगताना ती म्हणाली की, तिने ११ किलो वजन कमी केले. ती सर्व पदार्थांचे सेवन करते आणि फक्त घरी शिजवलेले अन्न खाते. विशेष म्हणजे ती दररोज पराठा खाते.
अलीकडच्या काळात वजन कमी करणे ही एक नवीन क्रेझ निर्माण झाली आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खडतर मार्ग निवडतात. खूप लवकर परिणाम दाखवणारे आणि सर्वात फायदेशीर असलेले पर्याय बघतात, पण हिमांशी खुराना वजन कमी करण्यापेक्षा निरोगी जीवनशैलीवर भर देते.
हेही वाचा :हिवाळ्यात कमी वर्कआउट करून आरोग्यास कसा फायदा मिळू शकतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.
बंगळूरू येथील ॲस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ वीणा व्ही सांगतात, “जेव्हा आपण निरोगी जीवनशैली किंवा वजनाविषयी जाणून घेतो तेव्हा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, उत्तम आरोग्याचा वजनाशी काहीही संबंध नाही. व्यक्ती निरोगी आहे की नाही हे स्नायूचे आरोग्य, शरीरातील पाण्याची टक्केवारी आणि निरोगी चयापचय प्रक्रिया यावरून जाणून घेता येते. त्या पुढे सांगतात की, प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली वेगळी असते, त्यामुळे ज्यांचे वजन जास्त असते ते सुद्धा निरोगी असू शकतात.”
व्यक्ती निरोगी आहे की नाही, कसे ठरवावे?
सहसा लोक बीएमआय (बॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे.) वरून स्वतःला निरोगी आहेत की नाही हे ठरवतात. पण, बीएमआयमध्ये नेहमीच शरीरातील फॅटचे अचूक मोजमाप नसते; त्यामुळे त्यावरून संपूर्ण आरोग्य निरोगी असल्याचे ठरवू शकत नाही. एखादी व्यक्ती निरोगी आहे की नाही याचा विचार करताना आपली खाण्याची पद्धत, संतुलित आहार, उत्तम ऊर्जा पातळी आणि एकूणच शारीरिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे. या शिवाय स्नायूंचे आरोग्य, पोषक घटक, शारीरिक अवयवांचे कार्य आणि चयापचय क्रिया सुरळीत राहणेसुद्धा आवश्यक आहे.
हेही वाचा : हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या
बारीक होणे केव्हा आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते?
वीणा सांगतात, जेव्हा तुम्ही पोषक आहार घेत नाही, अति व्यायाम करता; यामुळे जर तुम्ही बारीक होत असाल तर आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. ज्या व्यक्तीचे वजन कमी आहे, त्यांना कुपोषण, केस गळती, स्नायूंची ताकद कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, तणाव वाढणे इत्यादी समस्या जाणवत असेल तर त्यांच्यासाठी बारीक होणे धोकादायक ठरू शकते. त्यांना IBS (Irritable bowel syndrome), IBD (Inflammatory bowel disease) आणि गॅस्ट्रोएन्टेरिटिस इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.
वीणा सांगतात, बारीक लोकांनी शरीराची रचना निरोगी आणि स्नायू मजबूत ठेवायला पाहिजेत. त्यांनी शरीरातील फॅट्सच्या टक्केवारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. फक्त बारीक होण्यावर लक्ष देण्याऐवजी चांगला पोषक आहार, स्ट्रेंथ आणि दीर्घकालीन चांगल्या आरोग्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.