Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याच बर्ड फ्लूचा धोका जगभरातील तज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे. डेली मेलने दिलेल्या अहवालानुसार, “कोविड १९ च्या साथीच्या आजारापेक्षा १०० पट वाईट परिस्थिती निर्माण करण्याची आणि मृत्यू दर वाढवण्याची ताकद बर्ड फ्लूमध्ये असू शकते.” हा धोका वाढत असताना आपण काही गोष्टींबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. घाबरून न जाता काळजी घेतल्यास आपल्याला या परिस्थितीत आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करता येऊ शकते. डॉ ई श्रीकुमार, इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड व्हायरोलॉजी, तिरुवनंतपुरम यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूची लक्षणे, उपचार याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

H5N1 म्हणजे काय?

H5N1 हा एक प्रकारचा इन्फ्लूएन्झा विषाणू आहे जो मुख्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो. यामध्ये श्वसनाचे तीव्र आजार होतात . हा संसर्ग आतापर्यंत मानवांमध्ये सहज पसरू शकला नसला तरी याची लागण झाल्यावर मृत्यूचा दर ६० टक्क्यांपर्यंत असू शकतो. तुलना केल्यास, कोविड-19 चा मृत्यू दर सर्वात विषाणूजन्य प्रकारांसह सुद्धा सुमारे तीन टक्के होता यानुसार बर्ड फ्लूचा धोका १०० पटीहून अधिक असल्याचे म्हणता येईल.

बर्ड फ्लू मानवाला होऊ शकतो का?

H5N1 चे मानवी संसर्ग पहिल्यांदा १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये कुक्कुटपालनाच्या केंद्रात झालेल्या उद्रेकादरम्यान आढळून आले होते. आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमधील काही प्रकरणांसह आशियामध्ये सुद्धा या बर्ड फ्लूची मानवाला लागण झाल्याचे आढळून आले होते. जवळजवळ ही सर्व प्रकरणे संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांमध्ये होती. तज्ञांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीला श्वासोच्छवासात त्रास होणे हे त्याच्या श्वसन नलिकेतील विषाणूचे लक्षण असू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीनुसार २००३ ते २०२४ दरम्यान H5N1 ची ८८७ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही टक्केवारी सुमारे ५२ टक्के आहे.

भारतात २०२१ मध्ये दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ११ वर्षीय मुलाचीश्वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला होता. हे H5N1 चे पहिले प्रकरण म्हणून नोंदवण्यात आले होते.

बर्ड फ्लूची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

CDC नुसार, बर्ड फ्लूची लक्षणे ही सौम्य ते तीव्र विविध स्वरूपात दिसून येऊ शकतात. प्राथमिक लक्षणांमध्ये डोळ्यांच्या लालसरपणा, डोळे येणे (नेत्रश्लेष्मलाशोथ) श्वासोच्छवासात त्रास होणे याचा समावेश असू शकतो. काहींमध्ये (फ्लू) तापाची लक्षणे दिसून येतात काही वेळा न्यूमोनियाचा सुद्धा धोका असतो ज्यामध्ये रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते. याउलट कधी कधी तुम्हाला अजिबात ताप येत नाही.

तापामध्ये शरीराचे तापमान १००F च्या पुढे जाणे , खोकला, घसा खवखवणे, वाहती सर्दी, स्नायू किंवा शरीरात वेदना, डोकेदुखी, थकवा आणि दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही सुद्धा लक्षणे विचारात घ्यायला हवीत. तर अगदी मोजक्या प्रकरणांमध्ये अतिसार, मळमळ, उलट्या अशीही लक्षणे यापूर्वी आढळून आली आहेत.

बर्ड फ्लूवर उपचार काय?

मानवांमध्ये, बर्ड फ्लूची लागण होताच पहिल्या टप्यात अँटीव्हायरल Oseltamivir घेण्यास सांगितले जाऊ शकते. (तज्ज्ञांचा सल्ला अत्यावश्यक).श्वासोच्छवासात त्रासाची लक्षणे असल्यास काहीवेळा थेट आयसीयूमध्ये दाखल करणे आवश्यक ठरते. H5N1 साठी विकसित केलेल्या लसी सहज उपलब्ध होत नसल्या तरी त्या सुद्धा उपचारासाठी प्रभावी ठरू शकतात.

सध्या चिकन खाणे सुरक्षित आहे का?

होय. लक्षात घ्या सध्याचा उद्रेक अमेरिकेतून नोंदवला गेला आहे. दुसरंम्हणजे , भारतात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असतानाही, उच्च तापमानात चिकन योग्य प्रकारे शिजवल्याने रोगजनक विषाणू नष्ट होऊ शकतात. खबरदारी म्हणून आपण स्वच्छता व नीट शिजवलेल्या पदार्थांच्या सेवनाची खात्री करावीच.

बर्ड फ्लू ही पुढील महामारी होऊ शकते का?

डॉ. श्रीकुमार सांगतात की, विषाणूचा प्रसार रोखणे हे पहिले प्राधान्य आहे. लक्षणे असलेल्या इतर लोकांची चाचणी करावी लागेल, पक्ष्यांच्या संपर्कांत येणाऱ्या व्यक्तींची चाचणी करावी लागेल आणि पुढील प्रसार टाळण्यासाठी त्या व्यक्तीला आयसोलेशनमध्ये (विलीगीकरणात) ठेवावे लागेल. सध्याएव्हीयन इन्फ्लूएंझा WHO च्या यादीत साथीच्या संभाव्य रोगजनकांच्या यादीत नाही.

हे ही वाचा<< दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

लक्षात घ्या, H5N1 चे दोन प्रकार आहेत यातील एक कमी व दुसरा उच्च रोगजनक आहे. कमी रोगजनक प्रकार सामान्यत: पक्ष्यांमध्ये दिसून येतो. केरळमधील पक्ष्यांमध्ये याचे किमान दोन प्रादुर्भाव दिसून आले आहेत तर अत्यंत रोगजनक प्रकार पक्ष्यांमध्ये सामान्यतः आढळत नाही. हा विषाणू पुढे मानवाला संक्रमित करू शकतो असा ठोस दावा करण्यासाठी किंबहुना याची महामारी निर्माण होऊ शकते हे सांगण्यासाठी आणखी पुराव्यांची गरज आहे. केवळ एका प्रकरणावर आधारित हा निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे आपण आतापासून घाबरून जाण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird flu outbreak signs symptoms treatment precautions to take while eating chicken can it become stronger than covid 19 svs