बहुतांश महिला गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या चक्रावर काम करत असतात. या गोळ्यांमुळे गर्भधारणा रोखली जाऊ शकते. मात्र, गर्भनिरोधक गोळ्यांचा दररोज वापर केल्यास, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे डाॅक्टर नेहमी सांगत असतात. तोंडावाटे गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि ती बाब प्राणघातक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतीच मासिक पाळीमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने १६ वर्षीय मुलीचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. यूकेस्थित लैला हिने मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी गर्भनिरोधक गोळी घेतल्यापासून तीन आठवड्यांनंतर तिच्या पोटात काही समस्या आढळून आल्या. या समस्या आढळल्यानंतर अवघ्या पुढच्या ४८ तासांमध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आणि तिला स्ट्रोकचा झटका आल्याने तिचे निधन झाले.

या मुलीच्या निधनामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो का? आता याच विषयावर नवी दिल्ली येथील वरिष्ठ सल्लागार, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उमा वैद्यनाथन यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा : रोज गाजर खाल्ल्यास शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर अन् वजन झटक्यात कमी होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर)

डॉक्टर सांगतात, “भारतात गर्भनिरोधक गोळ्या ही कुटुंब नियोजनाची प्रभावी पद्धत आहे. जर योग्य पद्धतीने गोळ्या घेतल्या, तर त्या गर्भधारणा १०० टक्के थांबवतात. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्ट्रॉन असतात. त्याला ‘सीओसी’ म्हणतात. तर, दुसऱ्या गोळीत प्रोजेस्ट्रॉन असते. त्याला ‘पीओपी’ असे म्हणतात. जर एखादी महिला धूम्रपान करीत असेल आणि ती इस्ट्रोजनयुक्त गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल, तर रक्ताच्या गुठळ्या होतात.

“गर्भनिरोधक किंवा गर्भनिरोधक गोळ्या सुरक्षित असल्या तरी त्यांच्या डोसचे वैद्यकीय निरीक्षण करणे आवश्यक आहे. नाही तर धोका होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. गर्भनिरोधक गोळी घेतल्यानंतर रक्त गोठण्याची तक्रार करणारे रुग्ण आढळले आहेत; ज्यात या गोळ्यांमुळे त्यांच्या पायाच्या नसांमध्ये गुठळ्या निर्माण झाल्या. या गोळयांचा अतिवापर केल्याने धोका होऊ शकतो. म्हणून महिलांमध्ये अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे,” असे डॉ. वैद्यनाथन सांगतात.

त्याशिवाय, गर्भनिरोधक गोळ्या वापरण्याची योग्यता स्त्रीची आरोग्य स्थिती, वय, वैद्यकीय इतिहास व धूम्रपान स्थिती यांसह अनेक घटकांवर अवलंबून असते. औषधविक्रेते पात्रतेबद्दल कोणतेही प्रश्न विचारत नाहीत किंवा गर्भनिरोधक गोळ्यांच्या योग्य व सुरक्षित वापरासाठी फार्मासिस्टना मार्गदर्शन करण्यासाठी यूएस आणि यूकेच्या विपरीत भारतात कोणतेही अलर्ट प्रोटोकॉल नाहीत.

डेटा विश्लेषण दर्शविते की, इस्ट्रोजेनच्या उच्च डोससह इस्केमिक स्ट्रोक किंवा मायोकार्डियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. गोळ्यांमध्ये ५० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त इस्ट्रोजेन असल्यास रक्तातील गोठण्याचे घटक वाढतात तेव्हा हा धोका सर्वाधिक असतो. आता बहुतांशी ५० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी एस्ट्रोजेन असते. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या वापरणे अधिक सुरक्षित आहे. ३० मायक्रोग्रॅम एस्ट्रोजेन आणि लेव्होनॉर्जेस्ट्रेल असलेली गोळी हे तोंडी घेण्याचे सर्वांत सुरक्षित गर्भनिरोधक असल्याचे समोर आले आहे.

(हे ही वाचा : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहार घेतल्याने तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम होतो? डाॅक्टर काय सांगतात… )

महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

नको असलेल्या गर्भधारणेपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या दोन्ही प्रभावी पर्याय आहेत. मात्र, एसटीडी किंवा एसटीआयपासून म्हणजेच लैंगिक रोगांपासून संरक्षण हवे असल्यास कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. गर्भनिरोधक म्हणून कंडोम अत्यंत आवश्यक आहे. कंडोम आपल्याला लैंगिक संक्रमित रोगांपासूनही वाचवू शकते. कंडोम ही जन्म नियंत्रणाची लोकप्रिय पद्धत आहे. पण, आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणे केव्हाही चांगले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth control pill the risk of heart attack and stroke in women using birth control pills pdb
Show comments