Benefits of black tea : हल्ली अनेक जण आपल्या नेहमीच्या चहापेक्षा ग्रीन टी घेणे पसंत करतात. कारण- ग्रीन टीमुळे वजन कमी होते, त्वचेचे आरोग्य सुधारते, असे सांगितले जाते. त्यामुळे हल्ली ग्रीन टी घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. पण, या ग्रीन टीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याची मोठी माहिती एका संशोधनातून समोर आली आह. याच विषयावर मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. भागवत म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये येणारे अनेक रुग्ण मला विचारतात की, नियमित चहाऐवजी ग्रीन टी प्यायला पाहिजे का? त्याने खरेच हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो का?
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी ग्रीन टी किंना ब्लॅक टी या दोन्ही पिण्याच्या फायद्यांबद्दल बरेच संशोधन झाले आहे आणि जरी त्यापैकी कोणीही कारण आणि परिणाम यांच्यात थेट संबंध स्थापित करू शकले नाही. तरीही अनेक अभ्यासांद्वारे हे संबंध सिद्ध झाले आहेत.
आता यूकेमधील एका ताज्या अभ्यासातून असे आढळून आले की, अनेक वर्षांपासून नियमितपणे चहा प्यायल्याने हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो. तसेच जे प्रौढ लोक सात वर्षांहून अधिक काळ दिवसातून दोन कप चहा पितात, त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताने मृत्यू होण्याचा धोका कमी चहा पिणाऱ्या किंवा चहा न पिणाऱ्यांपेक्षा १९ टक्क्यांनी कमी असतो.
Read More Health News : दिवसातून एकदाच जेवण अन् मध्यरात्री ३ वाजता व्यायाम; अभिनेता शाहरुख खानचा ‘हा’ फिटनेस फंडा खरंच फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत
चहा हृदयाच्या आरोग्यासाठी कशी मदत करतो?
चहामध्ये हृदयाचे संरक्षण करणारी संयुगे असतात, जी जळजळ आणि पेशींच्या होणाऱ्या नुकसानकारक बाबींशी लढतात, जे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात. फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्स यांसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे सामान्यतः ब्लॅक आणि ग्रीन टी प्य़ायल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा कमी धोका होतो. २०१८ मध्ये उंदरांवर ब्लॅक टीचे काय परिणाम होतात याची चाचणी करण्यात आली; ज्यात असे दिसून आले की, चाचणी गटातील ज्यांनी ब्लॅक टीमध्ये आढळणारे विशिष्ट अँटीऑक्सिडंट्स पॉलीफेनॉलचे सेवन केले होते, त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलमध्ये १०.३९ टक्के, LDL कोलेस्ट्रॉलमध्ये १०.८४ टक्के व ट्रायग्लिसराइड्समध्ये ६.६ टक्के घट नोंदवली गेली.
ग्रीन टीमधील एक संयुग ब्लॉकेजेसशी निगडित प्लेक्स तोडण्यास मदत करू शकते. काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. कारण- त्यात कॅटेचिन असतात, जे थ्रॉम्बोसिस आणि प्लेटलेट्स हायपरॅक्टिव्हिटी प्रतिबंधित करतात. त्यामुळे लघवीसंबंधित त्रास कमी होतो. परिणामी रक्तदाबदेखील कमी होतो.
तुम्ही योग्य प्रकारे चहा घेत आहात का?
चहामध्ये आरोग्यदायी संयुगे असतात; परंतु स्पष्टपणे फायदे पाहण्यासाठी तुम्हाला चहा नियमितपणे योग्य प्रमाणात प्यावी लागेल. त्यामुळे एक नेहमीची सवयदेखील तुम्हाला मदत करू शकते.
चहामध्ये कॅफिनदेखील असते; पण हे प्रमाण कॉफीपेक्षा कमी असते. मात्र, त्याचे जास्त प्रमाणात सेवन होत तर नाही ना याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण- इतर कोणत्याही प्रकारच्या चहापेक्षा ब्लॅक टीमध्ये सर्वाधिक प्रमाणात कॅफिन असते. एक कप ब्लॅक टीमध्ये ४७ मिलिग्रॅम, ग्रीन टीमध्ये सुमारे २८ मिलिग्रॅम कॅफिन असते. त्यामुळे जास्त सेवन करू नका. त्याशिवाय चहामध्ये टॅनिन असते, जे पॉलिफेनॉलचा एक भाग आहे. त्यामुळे पचनसंस्था खराब होऊ शकते आणि अन्नातून शरीरास मिळणाऱ्या लोहाच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.
पण, भारतात बरेच जण करतात, तसा चहा उकळू नका. फक्त ८० ते ९० डिग्री सेल्सिअसदरम्यान गरम पाण्यात चहा बनवा. कारण- जास्त गरम केल्याने फायदेशीर संयुगे नष्ट होतात; पण अशा प्रकारे ८० ते ९० डिग्रीदरम्यान बनवलेल्या चहामध्ये सर्व संयुगे आढळतात.
तुम्हाला चहा प्यायला आवडत असल्यास साखर किंवा दूध घालू नका. कारण- तुमच्या प्रत्येक कपमध्ये कॅलरीची भर पडते. त्यामुळे वजन वाढू शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. कोणत्याही प्रकारचे शर्करायुक्त पेय आणि यामध्ये भारतीयांना आवडणारा साखरयुक्त चहा समाविष्ट आहे. त्यामुळे कॉरोनरी हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका वाढतो.