पावसाळा हा तसा आजारांचाच ऋतू हे तर आपण जाणतो व अनुभवतो. सर्दी-ताप- खोकला-दमा असे श्वसनविकार, विविध वातविकार, पचनाच्या तक्रारी, नानाविध संसर्गजन्य आजार या दिवसांमध्ये आपल्याला त्रस्त करतात, ज्यांची मूलभूत माहिती आपण आधीच्या लेखांमध्ये घेतली आहे. मात्र पावसाळ्यात आपल्याला एक आजार होऊन बळावू शकतो, तो म्हणजे ’उच्च रक्तदाब’(high blood pressure)!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्यात जितका इंच अधिक पाऊस पडतो, तितक्या प्रमाणात रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, असं मत ग्लॅस्गो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नोंदवलं आहे. त्यांच्या मते जितका अधिक पाऊस पडतो, तितका त्याचा रक्तदाबावर परिणाम होऊन रक्तदाब वाढण्याची शक्यता बळावते. याचा अर्थ पावसाळा हा उच्च रक्तदाबाला कारणीभूत होतो असा अर्थ काढू नका, तर ज्यांना मुळातच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांचा रक्तदाब पावसाळ्यातल्या ओलसर, थंड
वातावरणामध्ये थोडा वाढू शकतो, तर ज्यांचा रक्तदाव प्राकृत असतो अशा निरोगी माणसांचासुद्धा पावसाळ्यात थोडा वाढलेला मिळू शकतो, जो अर्थातच वर सांगितलेल्या कारणांमुळे असतो.

आणखी वाचा: Health Special: गुणकारी ताकाची गोष्ट

शरीराचे मर्यादेपेक्षा अधिक वजन, बैठी जीवनशैली, झोपेची कमतरता, अनियमित जीवनशैली, हालचालींचा, परिश्रमाचा,व्यायामाचा अभाव, मीठाचे अतिरिक्त सेवन, चरबीयुक्त पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन,’रेडी टू इट’ प्रकारच्या बाजारातील अन्नपदार्थांचे नित्य सेवन, मद्यपान,तंबाखुचे सेवन,अनुवंशिकता,मूत्रपिंड-मस्तिष्क-हृदय-रक्तवाहिन्या यांचे काही आजार,मानसिक ताण वगैरे कारणांमुळे रक्तदाब वाढू शकतो. ही उच्च रक्तदाबाची मूळ कारणे लागू होतात,त्यांचा रक्तदाब पावसाळ्यात वाढण्याची अधिक शक्यता असते.

पावसाळ्यात रक्तदाब वाढण्यामागील कारणांचा विचार करताना संशोधकांनी जी कारणे मांडली आहेत,तीसुद्धा समजून घेऊ.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात वातप्रकोप का होतो?

अतिपावसामुळे वातावरणामध्ये वाढणारी थंडी हे महत्त्वाचे कारण. ज्यामुळे परिसरीय म्हणजे त्वचेजवळच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या संकोचतात, शरीराचा केंद्राकडचा रक्तपुरवठा वाढावा म्हणून. मात्र त्यामुळे त्या संकोचलेल्या परिसरीय वाहिन्यांपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक जोराने पंपिंग करावे लागते.त्याचा हृदयावर ताण पडतो,जो उच्च रक्तदाबाला कारणीभूत होतो.

सततचा पाऊस, गार हवामान यामुळे शरीरामधून घाम येत नाही .घाम येत नसल्याने शरीरामध्ये मीठाचे प्रमाण वाढते. त्यामुळेसुद्धा रक्तदाब वाढतो.

पावसाळ्यामधील सूर्यकिरणांचा अभाव हेसुद्धा रक्तदाब वाढण्याचे एक कारण असावे. सूर्यप्रकाशात वावरणार्‍यांचा रक्तदाब सहसा प्राकृत असतो.

अति पावसामुळे शरीराचे चलनवलन थांबणे हे सुद्धा रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत होते. पाऊस जोरात पडू लागला की एकंदरच लोकांचे फ़िरणे-खेळणे थांबते,व्यायाम थांबतो. चलनवलनाचा अभाव हे तर उच्च रक्तदाबाचे एक मुख्य कारण आहे.

पावसाळ्यातील सतत पाण्याचा वर्षाव, ओलसर, कुंद, काळोखे वातावरण हे मनाला उदास करते,जुन्या आठवणींनी मन चलबिचल होते,निराशा दाटून येते, आणि मनावरचा ताण वाढतो.त्यात सततच्या पावसामुळे शरीराची हालचाल थांबते.

मनाचा ताण आणि हालचालींचा अभाव याच्या परिणामी रक्तदाब वाढतो. वटपौर्णिमेच्या वडाभोवतीच्या प्रदक्षिणा, जन्माष्टमीला गोविंदा कसरती करायला लावणारा उत्सव, मंगळागौरीचे विविध खेळ हे सर्व पावसात आयोजित करताना आपल्या पूर्वजांनी हवामानाचा आरोग्यावरील परिणामांचा व त्यांच्या प्रतिबंधाचा केवढा खोलवर विचार केला होता,ते वाचकांच्या लक्षात आले असेलच.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood pressure can raise in rainy season hldc psp