Signs of High Blood Sugar: विविध वयोगटांतील लोकांमध्ये मधुमेह ही एक मोठी समस्या बनत आहे. हा जीवनशैलीचा आजार आहे; जो निष्काळजीपणामुळे बळावतो. मधुमेह हा चयापचयासंबंधीचा एक जुनाट आजार आहे. भारतातील अनेक जण मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने त्यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, की मग तुम्हाला त्याच्यासोबतच जगावे लागते.
मधुमेह होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्याची बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव होय. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मधुमेही व्यक्तींना त्यांच्या आहारावर विशेष लक्ष देत, आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आरोग्यतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, शरीरात शर्करा वाढण्याआधी शरीर आपल्याला अनेक संकेत देते; पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर वाढलेली शर्करा कायमस्वरूपी मधुमेहाचे रूप घेते. मधुमेह होण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देते, याबाबतचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
मधुमेह असल्यास शरीर देतात खालील संकेत
१. दृष्टी कमी होणे
जर अंधुक दिसू लागले असेल, तर त मधुमेहाचे लक्षण असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करेची पातळी खूप जास्त होते. त्यावेळी डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही.
२. पायांमध्ये वेदना
जेव्हा तुम्हाला मधुमेहाची लागण होते. तेव्हा पायांमध्ये प्रचंड वेदना निर्माण होऊ शकतात. तसेच पायांना सूजही येऊ शकते. काही वेळा तर या स्थितीमुळे पाय सुन्न पडू शकतात.
(हे ही वाचा : युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने होईल कमी; आहारात करा ‘या’ पाच पदार्थांचा समावेश)
३. जास्त तहान आणि लघवी लागणे
जर आपण नेहमीपेक्षा जास्त पाणी पीत असाल, तर हे मधुमेहाचे लक्षण आहे. अशा स्थितीत घसा वारंवार कोरडा पडतो आणि त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. त्याचप्रमाणे वारंवार लघवी लागते.
४. जास्त भूक
खाल्ल्यानंतरही तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्ही काही दिवसांपासून अन्नाला स्पर्शही केला नाही. असे वाटण्याचे कारण म्हणजे, साखर आपल्या पेशींद्वारे पुरेशा प्रमाणात शोषली जात नाही आणि त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळत नाही.
५. थकवा
सतत थकल्यासारखे वाटणे हे आणखी एक लक्षण आहे की, आपल्या शरीराला अन्नातून आवश्यक ऊर्जा मिळत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे शरीर ग्लुकोजचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
६. वजन कमी होणे
मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना पुरेसे अन्न खाल्ल्यानंतरही वजन कमी होण्याची समस्या असते.
७. त्वचेचा पोत बदलणे
जेव्हा मधुमेह होतो तेव्हा पायांची आणि तळव्यांची त्वचा कठीण होऊ लागते. तुम्हाला अचानक हा बदल जाणवल्यास त्वरित तपासण्या करा. त्यामुळे पुढील धोका तुम्हाला टाळता येऊ शकतो.