Akshay Kumar reveals his weakness : अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो पहाटे चार वाजता उठतो, नियमित व्यायाम करतो, पौष्टिक आहार घेतो आणि झोपण्याची वेळसुद्धा पाळतो. संपूर्ण बॉलीवूडमध्ये अक्षय कुमारच्या निरोगी जीवनशैलीची प्रशंसा केली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का, अक्षय कुमारची एक कमजोरी आहे आणि त्याने ही गोष्ट मान्यसुद्धा केली आहे. २०२० मध्ये अभिनेते अनुपम खेर यांच्याशी संवाद साधताना तो याविषयी बोलला होता. “गोड पदार्थ ही माझी कमजोरी आहे, मला गोड पदार्थ खूप जास्त आवडतात. जेवणानंतर मला गोड खायची आवड आहे. अॅक्शन चित्रपटांसाठी मी काही दिवस गोड खाणे टाळतो, पण नंतर पुन्हा सुरू करतो, ही माझी खूप मोठी समस्या आहे.”

साखर खाण्याची जरी इच्छा होत असेल तरी तज्ज्ञांनी रिफाइन्ड आणि प्रक्रिया केलेल्या साखरेच्या सेवनाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे, कारण त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

साखर हे जगातील सर्वात मोठे व्यसन

झांड्रा हेल्थकेअरच्या मधुमेहशास्त्राचे प्रमुख आणि रंग दे नीला इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक डॉ. राजीव कोविल सांगतात, “साखर खाण्याची इच्छा होणे हे बायोलॉजी आणि सायकोलॉजीशी संबंधित आहे. बायोलॉजिकली, साखर डोपामाइन सोडण्यास उत्तेजित करते, ज्यामुळे साखरेचे सेवन केल्यावर आपल्याला चांगले वाटते, पण हे सातत्याने केल्याने आपल्या सवयीचे कारण बनू शकते.” डॉ. कोविल पुढे सांगतात की, साखर हे जगातील सर्वात मोठे व्यसन आहे.

साखरेचे सेवन कमी केल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

साखरेचे अति सेवन शरीरात जळजळ निर्माण करते. क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात, “साखर दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा निर्माण करते आणि भूक मिटवते. साखर पूर्णपणे कमी करणे अवघड असले तरी ऊर्जा आणि रक्तातील ग्लुकोज संतुलित ठेवण्यासाठी आहारात प्रोटिन्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेणे गरजेचे आहे.”

अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज सांगतात, “साखरेचे सेवन बंद केल्याने किंवा मर्यादित केल्याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. सुरुवातीला तुम्हाला माघार घेण्याची लक्षणे जाणवू शकतात, पण काही दिवसांनी तुमची ऊर्जा पातळी स्थिर होते आणि मूड स्विंग कमी होतात. तुमची चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि संबंधित आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो.”

विशेष म्हणजे साखरेचे व गोड पदार्थांचे सेवन कमी केल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते. कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार तुम्ही टाळू शकता. याशिवाय भारद्वाज सांगतात की, साखरेचे सेवन कमी केल्याने रक्तदाब कमी होतो, हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. भारद्वाज पुढे सांगतात, “इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी सुधारते, ज्यामुळे टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.”

साखर कमी करण्याचा अर्थ गुळाचे सेवन किंवा कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन करणे असा नाही. “साखर आणि गूळ दोन्हीमध्ये समान कॅलरीज असतात. एखाद्या गोड पदार्थातील साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन तो पदार्थ टाळला पाहिजे,” असे भारद्वाज सांगतात.