Alia Bhatt : आलिया भट्टचा नवीन चित्रपट ‘जिगरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्टनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन २ च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट ही करण जोहर, वासन बाला आणि वेदांग रैना यांच्याबरोबर दिसली.
या कार्यक्रमात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. पॅरिस फॅशन वीकदरम्यानचा तिने एक किस्सा सांगितला. तिने काही दिवसांपूर्वी पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. तिने मेट गाला कार्यक्रमात २३ फूट लांबीची साडी नेसली होती आणि साडीमुळे तिला कसे सहा तास वॉशरुमला जाता आले नाही, याविषयी सांगितले. तिने सांगितले, “अशी साडी नेसून मी वॉशरुमला जाऊ शकत नाही आणि मी सहा तास वॉशरुमला गेले नाही.”
जर तुम्ही खूप कालावधीसाठी वॉशरुमला गेला नाहीत तर काय होईल? या विषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.
हेही वाचा : महिलांनो गर्भधारणेदरम्यान अभिनेत्रींचे अनुकरण करत व्यायाम करताय? थांबा, आधी डॉक्टरांनी सांगितलेला धोका वाचा
- बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. विशाल सांगतात, “लघवी सहा तास रोखून ठेवल्याने अस्वस्थता वाढते आणि किडनीवर ताण येऊ शकतो. दीर्घकाळ लघवी रोखून ठेवल्याने दबाव वाढतो, ज्यामुळे मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) सुद्धा होऊ शकते. एवढंच काय तर अनेक गंभीर प्रकरणांमध्ये लघवीमधून रक्तसुद्धा येऊ शकते.”
- “प्रौढ वयातील लोक आठ ते बारा तास लघवी रोखून ठेवू शकतात, पण असे करू नये. किडनी आणि यूटीआयसारखा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही दर चार ते सहा तासांनी लघवीला जावे.” ते पुढे सांगतात, जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
- मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे नेफ्रोलॉजिस्ट सल्लागार डॉ. निखिल भसीन सांगतात, “एखादी व्यक्ती किती वेळ लघवी रोखू शकते हे त्या व्यक्तीच्या वय, हायड्रेशन आणि आरोग्य स्थितीवर अवलंबून आहे. अनेक लोक तीन ते सहा तास लघवी रोखतात, परंतु लघवी रोखल्याने संक्रमण होण्याचा धोका वाढतो. तसेच मूत्राशयामध्ये समस्या आणि किडनीचा आजार होऊ शकतो.
- जेव्हा तुम्ही सहा तास लघवीला जाणे टाळतात, तेव्हा तुमचे मूत्राशय लघवीने भरते आणि त्यावर दबाव निर्माण होतो, ज्यामुळे अस्वस्थता जाणवते. तसेच मूत्राशयावर ताण येतो, ज्यामुळे तुम्हाला वेदनासु्द्धा जाणवू शकतात.
- डॉ. भसीन सांगतात, “अशा वेळी ओटीपोटात अस्वस्थता निर्माण होते आणि शरीर आपल्याला सूचना देते की आता वॉशरुमला जाण्याची वेळ आली आहे.” लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीमध्ये स्टोन, रक्तप्रवाहात संसर्ग होऊ शकतो. गंभीर प्रकरणामध्ये किडनीसुद्धा खराब होऊ शकते.