Ananya Panday’s Morning drink Secret : अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या फिटनेस आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतेच तिने तिच्या निरोगी राहण्याचे सीक्रेट सांगितले आहे. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या सांगते की, ती दिवसाची सुरुवात एका ग्लास जिऱ्याच्या पाण्याने करते. हे आयुर्वेदिक पेय तिच्या निरोगी राहण्यामागचे कारण आहे. खरंच सकाळी जिरा पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदा होतो का?

याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने न्युट्रिशनिस्ट व वेलनेस कोच ईशा लॉल यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली आणि सलग दोन आठवडे सकाळी जिरा पाणी प्यायल्याने काय होते, हे समजून घेतले.

जिऱ्याचे पाणी

ईशा लॉल (Isha Lall) सांगतात की, आयुर्वेदात जिरे हे त्याच्या कार्मिनेटिव्ह गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे नैसर्गिकरीत्या पोटफुगी, गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करते.
ईशा लॉल पुढे सांगतात, “कोमट पाण्यात जिरे भिजवल्यावर ते थायमॉलसारखे तेल सोडते, जे क्लींजर म्हणून काम करते, ते पचनाशी संबंधित एंझाइम्सला प्रोत्साहन देते आणि आतड्यांचे तसेच यकृताचे आरोग्य सुधारते. त्यापासून तयार झालेले तेल आणि अँटीऑक्सिडंट्स डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी मदत करतात. तसेच पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता सुधारतात आणि पोटफुगीचा त्रास कमी करतात.”

दोन आठवडे सकाळी जिरा पाणी प्यायल्याने काय होते?

कृतातील विषारी घटकांना बाहेरचा रस्ता- जिऱ्यामध्ये अशी काही संयुगे असतात, जी यकृतातील एंझाइम्स सक्रिय करतात. ही संयुगे नैसर्गिक हानिकारक विषारी घटक यकृताच्या बाहेर काढतात. तसेच यामुळे पचन सुधारते आणि त्वचेचे आरोग्य जपले जाऊन त्वचा चांगली आणि चमकदार होते. कारण- जर आतडे व्यवस्थित असेल, तरच त्वचा चांगली राहते.

पोटाचा घेर घटणे- जिऱ्याचे कार्मिनेटिव्ह गुणधर्म पोटातील गॅस बाहेर काढण्यास आणि पाणी कमी करण्यास मदत करतात. अनेकांना दोन आठवडे जिरा पाण्याच्या सेवनामुळे पोट सपाट आणि निरोगी असल्याचे जाणवते.

ऊर्जा प्रदान करते – जिऱ्याचे पाणी आपल्याला अधिक ऊर्जा प्रदान करते. तसेच या पाण्याच्या सेवनाने चयापचय प्रक्रिया हळुवारपणे सुधारण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करते. एकंदरीत या सर्वांमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते.

जिऱ्याचे पाणी पिताना काळजी घ्या

जिऱ्याचे पाणी एका ठरावीक प्रमाणात घेणे महत्त्वाचे आहे. दिवसभर जिऱ्याचे पाणी पिणे टाळा. जिऱ्याचे पाणी आरोग्यासाठी चांगले असले तरी ते पाण्याची जागा घेऊ शकत नाही. तुम्ही जर गर्भवती असाल किंवा औषधी घेत असाल, तर याच्या सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या असेल, त्यांनी याचे कमी प्रमाणात सेवन करावे. एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाका आणि हळूहळू सुरुवात करा.

जर तुम्ही दररोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने कंटाळला असाल, तर त्याला पर्याय म्हणून पचनाशी संबंधित चांगल्या आरोग्यासाठी एक कप पाण्यात चिमूटभर बडीशेप, किसलेल्या आल्याची पावडर टाका आणि ते पाणी प्या. डिटॉक्सिफिकेशनसाठी त्यात थोडी हळद आणि काळी मिरी घाला. तसेच चवीसाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी, तसेच कोलेजन वाढवण्यासाठी त्यात अर्धा लिंबू पिळून टाका.